धनत्रयोदशी – धनतेरस
धनत्रयोदशी – धनतेरस
धनत्रयोदश मंगल दिवस
आनंद घेऊन येई खास
धन्वंतरीची कृपा लाभो
आरोग्य संपदा सहवास.१
सोन्याचांदीचे मोल नको
मना मनांत प्रेम पाझरावे
समाधानाच्या धनसंपत्तीत
जीवन आपुले फुलत जावे.२
धन केवळ पैसा नसतो
हवे ज्ञान संस्कार सद्वाचार
सेवा त्याग माणुसकीतून
समृद्ध होतो जीवनसंसार.३
आरोग्याचे धन अनमोल
जगणे निर्व्यसनीच ठेवा
निरोगीच तन प्रसन्न मन
शुभ लाभाचा लाभो मेवा.४
बांधा दारोदारी मंगल तोरण
अंगणात रांगोळी सजली.
दीप ज्योत शुभप्रकाशात
आशेची पहाट अवतरली.५
लोभ मत्सर दूर सारुनी
स्नेहा भरे नाते जपू या
सत्य अहिंसा परोपकारे
जीवन आपले सजवूया.६
धनतेरसचा पवित्र सण
देई सुख समृद्धीचे दान
आरोग्य हर्ष शांती लाभो
सदा ठेवू परोकाराचे भान
प्रा. सुरेखा कटारिया, चिंचवड पुणे