घटस्थापना नव्या संकल्पना कविता

उपक्रम-१
 कवितेचे पान
*घटस्थापना — नव्या संकल्पांची!*

घटस्थापना मंगल सोहळा
नव्या विचारां जागर व्हावा
देवी शक्तीचा आशिष घेत
मानवतेचा दीप उजळावा.१

*घटस्थापना वृक्षारोपणाची*

मातीच्या घटात बीज रुजावे
अंगणामध्ये रोपटे फुलावावे
वृक्षवल्लींच्या हिरव्या छायेत
धरतीचे वैभव पुन्ह खुलावावे.२

*घटस्थापना कचरा निर्मूलनाची*

कचऱ्याला आता दूर सारू
प्लास्टिकमुक्त परिसर घडवू
स्वच्छतेचा संकल्प तो करू
सुंदर पर्यावरण स्वप्न फुलवू.३

 *घटस्थापना शरीरस्वास्थ्याची*

योग-व्यायामाची धरू कास
संतुलित आहारा घालू घाट
निरोगी काया प्रसन्न मनाने
आनंदफुले जगण्याची वाट.४

. *घटस्थापना संवेदनशीलतेची*

दुःख पराचे आपुलेच मानू 
अश्रूंमधले मौन जाणून घेऊ
दीन-दुबळ्यांच्या मदतीसाठी
करुणेचे सदा दोन हात देऊ.५

.*घटस्थापना आपलेपणाची*

सदा रुसवे-फुगवे दूर सारू
प्रेमाने नाती पुन्हाच सावरू
माणुसकीचे नाते जपूनिया
जात-पात अन् भेद विसरु.६

*घटस्थापना ज्ञानज्योतीची*

अज्ञानाचा अंधार दूर सारुनी
ज्ञान दीप प्रत्येक घरी लावू
शिक्षणाच्या पवित्र वाटेवर
नव्या पिढीला पुढे पुढे नेऊ.७

 *घटस्थापना जलसंवर्धनाची*

थेंबा थेंबाचे मोल जाणूणी
पाणी वाचवण्या ध्यास घेऊ
जल संपत्तीचे रक्षण करून
उद्याच्या पिढीस अमृत देऊ.८

.*घटस्थापना अहिंसा-शांतीची*

द्वेष-मत्सराला दूर करूनीया
क्षमाशीलतेचा स्वीकार करू
जीव मात्रांवर दया दाखवून
विश्व शांतीचा तो मंत्र स्मरू.९

*घटस्थापना आत्मपरिवर्तनाची*

दोष कोणाचे शोधण्याआधी
स्वतःत डोकावू अंतर्मनात
विचार-वर्तन शुद्ध करुनी
नवचैतन्य आणू जीवनात.१०

*समारोप — संकल्पपूर्तीचा*

घटामध्ये केवळ धान्य नको
नऊ दिवसांचा नऊ संकल्प
विचारांमध्ये परिवर्तन हवे
नऊ दिशांनी नवा विकल्प.११

वृक्ष स्वच्छता आरोग्य प्रेम
देवीची पूजा तेव्हाच सार्थ
यातूनच घडेल सुंदर विश्व
जेव्हा सेवेला लाभेल अर्थ.१२

✍️ *प्रा. सुरेखा कटारिया चिंचवड, पुणे*
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता