जाईन विचारत रानफुला
काव्यबहर साहित्य मंच
जाईन विचारत रानफुला
जाईन विचारत रानफुला
कुठून आणतो सुगंध छान?
काट्यांच्या याच वाटांवरती
डोलताना हरवतोस भान?. १
नसे रे तुझी मखमली बाग
नसे कुणाचाच खास सहारा
उन्हातही हसत राहतोस
सांगे दुःखा तुम्ही सदा विसरा. २
झुळ झुळ झुळ वाऱ्या सोबत
डोलत असतो स्वच्छंदपणे
दवबिंदूंच्या मोत्यांनाही जणू
समजतोस तू दाग दागिने. ३
नसे तुला अपेक्षा कौतुकाची
रानफुला मानाची ना आस तुला
रानफुला म्हणुनी सुंदर वाटतो
तुझा निरागस भाव जगाला४
जाईन विचारत रानफुला
जीवनाचे गमक सांग मला
सुखदुःखात कसे जगावे
मंत्र शिकव जन मानसाला. ५
फुलता फुलता सांगून जातो
जगताना सुगंध देत रहावा
क्षणभंगुर या आयुष्यामध्ये
इतरांसाठी आनंद ही ध्यावा. ६
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे