मुलांचे संगोपन करताना संवादाचा संस्कार
मुलांचे संगोपन करताना संवादाचा संस्कार
फक्त चेहऱ्यावरील हावभाव डोळ्यांच्या हालचाली या पाहूनच संवाद होणारा तो संवेदनशील काळ मागे पडतोय काय?
असं सारखं वाटतं. कारण बोलून डोळ्यातील अश्रूधारांनी काळीज न ओलावणारा काळ आला आहे. त्याची कारण अनेक आहेत. माणूस मिथ्या आणि सोन सत्य हे जगण्याचं तत्त्वज्ञान आजकालच्या पिढीमध्ये बिंबत चाललंय. त्यांना वाटतं पैसा मिळाला की सगळी सुख मिळाली.संवाद, विसंवाद, सुसंवाद यातून मिळत असे ते प्रेम वात्सल्य कधी दुरावा तर कधी दुराव्यातही एक आपलेपणाची भावना महत्त्वाची; पण भावनेवर जगता येत नाही.असं म्हणणारा एक भ्रष्ट बुद्धीवादी वर्ग निर्माण झाला आहे. जेथे फक्त पैसा बोलतो. मन मात्र मुक राहतं.
आई-बाबांच्या वासल्याच्या स्पर्शातून उबदार असणारे घर आर्थिक सुबत्तेसाठी हव्यासापोटी भुईसपाट होऊ पाहतंय. कारण आम्ही बालकांचे पालक न होता मालक बनतोय. मुलाच्या संगोपनासाठी संस्कार आणि संस्कृती आणि तिचं भरण पोषण होणे हे पालकांवर अवलंबून आहे.
आज कालची स्थिती वेगळीच दिसते. संवादाचं मूल्य न जाणणाऱ्या या काळामध्ये संवेदनाचे निरोप समारंभ झालेले दिसतात.
जगताना संवाद गरजेचा..!मुलांशी संवाद साधनं,त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या मनाला जाणून घेणे, त्यांच्यातील विकासाच्या दृष्टिकोनातून सतत प्रयत्न करत राहणं. हे फार महत्त्वाचं...!!त्यांच्यातील उर्मी जागृत करणं आणि त्या उर्मिला प्रेरित करण्यासाठी सतत ऊर्जित राहणं .याच्यासाठी संवाद आवश्यक...!
मुलांला बोलू दिलं नाही; तर ते मोठ्यानं किंचाळे.ओरडेल.नीट त्याला गाऊ दिले नाही; तर तो बेसूर पणे ताना मारत राहील. त्याला नाचू दिलं नाही तर डीजे च्या समोर विभित्सक वेडं वाकडं अंग हलवून पावलं घसरत जातील. हे सार टाळायचं असेल मुलाशी संवाद व्हायला हवा.योग्य पद्धतीच्या संवादानं मुलांच्या उर्मीच लयबद्धतेनं विरेचन होणं आज गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्यातील असणारी अतिरिक्त ऊर्जा कारणी लागेल. तो सर्जनशील बनेल. त्याच्यातील माणूस विकसित होत असताना माणुसकी जपली जाईल.
आज काल घराघरात मुलांची अवस्था 'असून नाथ मी अनाथ' अशी दिसते. दिवसभराच्या कामाच्या रगड्यात बोलण्याच्या मनस्थितीत नसणारे आई-वडील मुलांना वेळ देत नाही. आणि नंतर मुलांना आई-बाबांसाठी वेळ नसतो; कारण एकमेकांना वेळ देण्याचा संस्कार हा पैसे मिळवण्याच्या नादात,भौतिक सुविधांच्या गदारोळात हरवत गेल्यामुळे, जे पेराल तेच उगवतं ना?'
मग हे असं का? हा प्रश्न आपण स्वतःच्या मनाशी विचारणं बरं..
*ओळखलंत का सर मी पावसात आलो भिजून पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा* हे फक्त शिक्षकांसाठी नव्हे तर पालकांनी ही हे व्रत अंगीकारले पाहिजे. शाळेत पुस्तकातून जीवनाला आकार देणारे जसे गुरु लागतात,तसेच घरातील आयुष्याचे पुस्तक समजावून देणारे गुरु म्हणजे पालक होय. मुलांच्या यशासाठी पालकांचा मुलावर असणारा विश्वास, जवळीक ही महत्त्वाची आहे.
तारुण्याच्या वृक्षाला फक्त पुस्तके, परीक्षा याची पालवी नसते; तर ज्ञान, विज्ञानाची, कलांची, खेळाची पालवी तारुण्यातील विद्यार्थी वृक्षाला पल्लवीत करत असते.
मुलांना किल्ले दाखवा. किल्ल्यावरील घडणाऱ्या त्या शौर्याच्या गाथा त्यांना ऐकून त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्याशी सलगी निर्माण करणं हा संस्कार फार महत्त्वाचा. शाळेतील होणारे स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पर्वणीच...!विविध गुणदर्शनाच्या निमित्ताने आत्मशोधाची संधी मिळते. त्यानेच भविष्यातील जगण्याचे रंग कोणते असावे. हे पालकांच्याही आणि मुलांच्या शिक्षकांच्या ही लक्षात येते. जगण्याच्या कॅनव्हासवर कोणता आणि कसा रंग भरावा याचा रियाज या स्नेह संमेलनाच्या संस्कारातून होत असतो.
शेतकरी आपल्या शेतामध्ये कुठल्याही ऋतूमध्ये पेरणी करत नाही. पेरणी करण्यासाठी विशिष्ट ऋतू तो निवडतो. ऋतू हुकला की तो सुगीला मुकला. अगदी तद्वत अरुणकाळ म्हणजे पेरणीचा ऋतू यात कोणते संस्कार पेरायचे हे पालक, बालक, शिक्षक यांच्या समन्वयाने ठरवायला हवे.
पाणी म्हणजे जीवन. हे पाणी जीवनाचं प्रतीकात्मक आहे. पाण्याला रंग नसतो .आपण जसा रंग देऊ तो त्याचा रंग दिसतो.आपल्या जीवनाचे सुद्धा असेच आहे. आपल्या जगण्याला जीवनाला आयुष्याला रंग देणारे चित्रकार आपणच आहोत.जर विचारलं पाण्याला रंग नाही आणि विचार जर केला;तर पाण्याला चव काय?उसात पाणी गोड होऊन जातं.मिरचीत पाणी तिखट होऊन जातं.लिंबाच्या झाडाला घातलेलं पाणी लिंबात आंबट होऊन जातं.स्वतःला हवी ती चव शोषून घेतात त्या त्या झाडाची मुळे .आपल्या जीवनाचे असंच आहे .आपल्या जीवनाला मधुर,कडवटपणा, रागीटपणा हा त्या त्या काळातील झालेल्या कृतीतील संस्कारानुसार होत असतो. तारुण्य म्हणजे स्वभावाचा रंग, स्वभावाचा सूर, स्वभावाची चव संस्कारीत करत निश्चित करण्याचा काळ ;त्यासाठी सतर्क राहून आपल्याकडे जे आहे ते आजमावून जो आपला कल आहे, त्या कलानुसार होत जाणाऱ्या संस्काराचे संस्करण होणे महत्त्वाचे.
एकदा स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांना प्रश्न विचारला, "आपण गायिका झाला नसता तर आपण कोण झाला असता?"
तेव्हा त्यांनी दिलेलं समर्पक उत्तर विचार करायला लावणार त्या म्हणाल्या ,"मी कोणत्याही क्षेत्रात गेले असते तरी मी त्या क्षेत्रात लता मंगेशकरच झाले असते."
जे क्षेत्र निवडाल ते सर्वोच्च होईल, हा आत्मविश्वासाचा संस्कार संस्कारीत होणं महत्त्वाचं...!
ही ऊर्जा प्रत्येकामध्ये असते. फक्त त्या ऊर्जेला प्रेरित करून संस्कारित करून मुलांच्या विकासासाठी त्यांना योग्य वेळी, योग्य मार्गदर्शन करणे समाज, शिक्षक ,पालक त्याचबरोबर कृतीतून त्यांना दिलेला संस्कार महत्त्वाचा. ...!
प्रा सुरेखा कटारिया.
आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्ट बिजलीनगर चिंचवड पुणे ते 33 सर्वे नंबर 60/1/अ