सकारात्मकता ठेवत जगणारे जगविणारे क्रियाशील मुख्याध्यापक*-*श्रीकांत पांडुरंग चौगुले*

*सकारात्मकता ठेवत जगणारे जगविणारे क्रियाशील मुख्याध्यापक*-
*श्रीकांत पांडुरंग चौगुले*

आमचे मानस सुपुत्र श्रीकांत बरोबर बऱ्याच वेळा अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र येण्याचा, बोलण्याचा योग येतो. त्यांच्या सहवासातून उलगडत गेलेले माणुसकीचे दर्शन घडविणारे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांसाठी नवनवीन प्रयोग राबवणारे असे विद्यार्थी प्रेमी शिक्षकापासून ते मुख्याध्यापकापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखरच मानवता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून, मनुष्याची घडण करण्याच्या दृष्टिकोनातून आजच्या या युगात फार मोलाचा महत्त्वाचा आहे. अनेक प्रसंगातून अनेक विचारधारातून विद्यार्थी शाळा,पालक,बालक, संस्थाचालक व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी  त्यांचं बोलणं सकारात्मक दृष्टिकोन आणि मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या शहरासाठी, माझ्या राष्ट्रासाठी काय करता येईल याचा सतत विचार करून विवेकाने वागणारे आमचे स्नेही श्रीकांत...!
    मला सांगायला आनंद वाटतो, रोज नव्याने जगण्यासाठी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणारे हा श्रीकांत मुलांना नेहमी सांगतो, "या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा जिंकण्यासाठी स्वतः तंदुरुस्त असणे आणि त्याच तंदुरुस्ती बरोबर मानसिक स्वास्थ्य असणं महत्त्वाचं ...!
हे विद्यार्थ्यांवर बिंबवताना त्यांन सांगितलेलं बोललेलं,आठवतं "कोणत्याही स्पर्धेमध्ये अटीतटीचा सामना खेळणारे स्पर्धक हे खरं तर खेळाच्या कौशल्याच्या बाबतीत तुल्यबळ असतात; परंतु जिंकतो तो स्पर्धक अगदी शेवटपर्यंत मनाने टिकून राहतो. टिकून राहणं ही एक मानसिक शक्ती असते. मुलांनी अनुकूल परिस्थितीमध्ये टिकून राहणं सोपं असतं; परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकणं फार महत्त्वाचं असतं.कारण दूरचित्रवाणीवर तसेच आकाशवाणीवर  विद्यार्थ्यांशी जवळीक साधताना विद्यार्थी प्रेमी राहून अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी जी स्पोर्ट्समन शिप केली. ती खरोखरच वाखण्याजोगी आहे. 
अनेक पुस्तकांचे लिखाण करणारे पिंपरी चिंचवडचा गावापासून ते शहरापर्यंतचा इतिहास अभ्यासपूर्ण लिहून पुढील पिढीसाठी सुपूर्त करणारे हे लेखक समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे...! 
सतत विद्यार्थ्यांना,"का चिंता करिसी ?" म्हणणारे विद्यार्थी प्रेमी शिक्षक फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर पालकांना सुद्धा पालक सभेतून उद्बोधन करताना म्हणतात, "पालकांनो बालकांचे मालक न बनता पालक बना. बालकांची चिंता करू नका. त्यांच्या रोजच्या जगण्याचं चिंतन करा. मुलं ऐकत असतात परंतु जे बघतात तेच करत असतात. त्यासाठी स्वतःकडे बघा निश्चितच स्वतःमध्ये असणाऱ्या वाईट सवयी बदलून चांगल्या सवयी आत्मसात करत असताना आपलं स्वतःचं चिंतन खूप महत्त्वाचं...!भविष्याची चिंता करण्यापेक्षा कल्पना शक्तीचा वापर करून भविष्य काळात घडणारे घातक प्रसंग रंगविण्यापेक्षा वर्तमानात आनंददायी रचनात्मक सकारात्मक घटनांचे चित्र मनावर रंगवायचं आणि वर्तमानात जगायचं"
 असे सतत सांगणारा  व स्वतःही तशीच कृती करणारा हा अवलिया...!खरोखरच पिंपरी चिंचवड साठी मिळालेला हिरा आहे. कोल्हापूर  जिल्ह्यातील चिखली गावातून ज्यांचा जीवन प्रवास सुरू झाला व तो पिंपरी चिंचवड सारख्या मेट्रो शहरांमध्ये विस्तारीत झाला. स्वतःसाठी तर कुणी जगत असतं परंतु समाजासाठी, देशासाठी,राष्ट्रासाठी जगणं हे खऱ्या अर्थाने जगणं ..! 
      स्वानंद महिला संस्थेनं, श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली यांनी केलेल्या अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलनामध्ये परिसंवाद, मुलाखती घेण्यासाठी त्यांना  नेहमी आमंत्रित केलं जातं. सरस्वतीच्या साधनेने, शब्दांच्या किमयेन हा सारस्वत सभांना, साहित्य संमेलनात, विद्यार्थी मेळाव्यात, पालक मेळाव्यात, शिक्षक मिळाव्यात , रसिक श्रोत्यांना सकारात्मक जगण्याची मेजवानीच देतात. श्रीकांतनं  वयात येणाऱ्या मुला-मुलींसाठी उद्बोधनात्मक असे कार्य केले. प्रत्येक तरुण तरुणीला वाटतं माझ्या जीवनात राजकुमारी, राजकुमार यावा. त्या तारुण्याच्या श्वासाचा गंध त्या आकृतीला असतो. रोजच्या जीवनात एखाद्या क्षणी एखादी व्यक्ती भेटते आणि ती व्यक्ती मनात असते; परंतु वास्तव जेव्हा डोळ्यासमोर येतं  तेव्हा परीकथेतील राजकुमार, राजकुमारी स्वप्नांच्या रंग ऐवजी सत्याचे रंग दाखवू लागतात आणि  तारुण्याचे पंख फुटलेली मुलं- मुली  हादरतात .अशा मुला-मुलींना सावरण्याचं काम श्रीकांतनं केलेला आहे.असे कितीतरी प्रसंग मी अगदी जवळून अनुभवलेलेआहेत. 
त्यांच्याही जीवनामध्ये अर्धांगिनी म्हणून आलेली धनश्री खरोखरच त्यांच्या या जीवन प्रवासामध्ये सहभागी होऊन मनुष्य घडणीचंच काम ती करत आहे. धनश्री बद्दल बोलायचं झालं तर  नवऱ्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सतत त्याच्या पाठीशी असणारी धनश्री एक शिक्षिका, एक सुजाण पालकत्व जपणारी माता, एक सासूच्या भूमिकेतून सर्वांना सावरून धरणारी ही त्रिशलामाता माई रमा असं म्हटल्यास  वावग होणार नाही . 
श्रीकांत बद्दल मला सांगावसं वाटतं माजी राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अब्दुल  कलाम यांचे प्रसिद्ध वाक्य *झोपेत पडतात ती स्वप्न नव्हेत, जी झोपू देत नाही ती स्वप्न* किती सुंदर..!छोटसं बीज वृक्ष होण्याचं स्वप्न पाहतो. तेव्हा ते बी सुद्धा जमिनीमध्ये त्या काळोख्या अंधारात स्वतःला गाडून घेत असतं. तेव्हा कुठे मातीत आपली मुळ पसरवत, आकाशाशी सलगी करतं. सर्व ऋतू पिऊन घेत. मग  आपण म्हणतो  हा महावृक्ष झाला. तसा हा *पिंपरी चिंचवडचा महावृक्ष.. श्रीकांत चौगुले* ! अनेक विद्यार्थ्यांची स्वप्न साकार करण्यासाठी बिजातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी कृतीच्या अवकाशाशी संबंध सांधण्यासाठी त्यांनी कार्य केले आहे. त्याच्या वृक्षाखाली अनेक विद्यार्थी घडले. अनेकांचे जीवन सफल झाले.
जीवन हे सुंदर आहे. हे सुंदर जगण्याच्या सहस्त्र शक्यतांची प्रचंड ऊर्जा घेऊन आलेले  श्रीकांत आपला सेवानिवृत्तीचा अभिनंदन सोहळा साजरा होत असताना, या कल्पवृक्षामध्ये धनसंचय, मनसंचय करणाऱ्या या आपल्या विचारांच्या बँकाच होय. जीवनाच्या पास बुकातील खऱ्या अर्थाने बॅलन्स सांभाळत आहेत. गुंतवणुकी बरोबर मानसिक गुंतवणूक ही महत्त्वाची. लाखो लोकांना जोडणारे आणि ज्ञानार्जनाच्या ध्यासाने सतत कार्य मग्न राहणारे असे  श्रीकांत चौगुले विद्यार्थ्यांमध्ये नवनव्या स्वप्नांच्या बिया  पेरून पुस्तकातील प्रश्नांच्या परीक्षेबरोबरच जगण्यातील प्रश्नांच्या परीक्षा या दोन्हींचा समन्वय साधून स्वतःच्या जीवन गाण्याबरोबर इतरांचे जीवन गाणे सुरेल करणारे असे हरहुन्नरी, अष्टपैलू, कर्तुत्ववान, आदर्श शिक्षक, कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक,  माणुसकीचा झरा सतत झिरपणारे आमचे  मानस चिरंजीव हे सेवानिवृत्त होत नसून अधिक सेवा करण्यासाठी त्यांना मिळणारा वेळ निश्चितच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे. पुढील कार्यास खूप खूप आशीर्वाद


प्रा सुरेखा प्रा प्रकाश कटारिया- राष्ट्रीय उपाध्यक्ष- श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली व अध्यक्षा -स्वानंद महिला संस्था.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!