रविवारचा उपक्रम*मराठीचा शृंगार*
रविवारचा उपक्रम
*मराठीचा शृंगार*
मराठी भाषेचा शृंगार भारी
भरजरी कपडे घालून फिरी.. १
विविध अलंकाराने सजली
आमुची मराठी ही मायबोली.. २
'अनुस्वार' येई कुंकुमात गोल
असे भाषेच्या भाळी अनमोल..३
मराठमोळ्या या सुवासिनीला
'वेलांटी' पदर शोभे डोक्याला..४
'स्वल्पविराम' नाकावर उभे
जसा नथीचा आकडा शोभे..५
'काना' ने वाढविला सदा मान
ठेवे सौदामिनी भाषेचे भाण.. ६
'उ कारांचे' पैंजण तिच्या पायी
छुम छुम छुम छुम करीत येयी..७
'उद्गार चिन्ह' चा लटके छल्ला
आश्चर्याचा सदाही देई सल्ला..८
'प्रश्नचिन्ह' जणू कानात झुमके
प्रश्न येता वाक्यापुढे ठुमके.. ९
'अवतरणाच्या' जणू केस जटा
तरुणीच्या कपाळी उडे बटा.१०
'पूर्णविरामाचे' जणू गोल तीट
अर्थबोध देत देत थांबे नीट.११
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे