सामाजिक काव्य-मुक्त छंद**विषय-शाळेचा पहिला दिवस*
*💐 काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित 💐*
मंगळवार दिनांक २४-६-२०२५
*सामाजिक काव्य-मुक्त छंद*
*विषय-शाळेचा पहिला दिवस*
दीडशे वर्षा पूर्वीचा माझ्या
आजीचा शाळेचा पहिला
दिवस तिला आठवला
आरडा ओरडा करत
शाळा शिकून काय करणार?
चुलीचं लाकूड चुलीत जाणार
म्हणत माझ्या पणजीन
कान धरत जीवनाच्या
शाळेचा पहिला दिवस
आजीला भाकऱ्या थापत
साजरा करायला सांगितला
काळ बदलला गरजा
बदलल्या रूढी बदलल्या
ऐंशी वर्षांपूर्वीचा माझ्या
आईचा शाळेचा पहिला
दिवस तिला आठवला
तीनं पिशवीत दप्तर
भरत मनात साठवला
माझी आजी आईला म्हणायची
पोरी घरकाम विणकाम करायचं
शाळा शिकत रांधा वाढा
उष्टी काढा करत करत
सगळं काही शिकायचं
आता काळ बदलला
रूढी ही बदलल्या
गरजा ही बदलल्या आत्ता
माझी आई मला शाळेच्या
पहिल्याच दिवशी म्हणाली
पोरी शिकून सवरून मोठं
व्हायचं घरातलं करत करत
पोरा बाळांना शिकून
सवरून मोठं करायचं
सातच्या आत घरात यायचं
आता रूढी परंपरा
पार बदलल्या गरजाही
वाढल्या माझी आई
शाळेच्या पहिल्या दिवशी
पुटपुटत म्हणाली होती
पोरी घाबरू नको एका
पंखात मी बळ भरते
दुसऱ्या पंखात तू बळभर
सातच्या आत नाही जमलं
तरी सावध राहून काम कर
आता रुढी बदलल्या परंपरा
बदलल्या गरजा वाढल्या
आता मी माझ्या मुलीकडे
पाहत शाळेच्या पहिल्याच
दिवशी म्हणते नजरेला नजर
भिडवत मुली तू दामिनी
तू कामिनी तू सौदामिनी
पोरी जगण्याच्या शाळेत
दिवसें दिवसा पासून
आत्तापर्यंत आम्ही खूप सोसलं
आता तू घे उंच उंच भरारी
पादाक्रांत कर सारी अवनी
असं म्हणत शाळेच्या पहिल्या
दिवसापासून आत्तापर्यंत
अनेक वार सहन करत
माझं कर्तुत्व दाखवताना
बोटाला धरून शाळेचा तो
पहिला दिवस ......! शाळेत
सोडणाऱ्या माझ्या आईमध्ये
सावित्री जिजाऊ अहिल्याबाई
मला दिसली हो मला दिसली
प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे ते 33.