महाराष्ट्रातील स्त्रियांची प्रगती झाली आहे काय? लेख

"महाराष्ट्रातील स्त्रियांची प्रगती झाली आहे का?"

मला वाटते प्रगती ही थोडी सापेक्ष कल्पना आहे,कारण  प्रगती चे अर्थ पाश्चात्य देशांमध्ये कसे लावतात आणि भारतातल्या मातीत कसे आहेत हा सुद्धा एक चर्चेचा विषय होऊ शकतो. प्रगती म्हणजे काय? करिअर,पैशाने प्राप्त होणारी लौकिक श्रीमंती, शिक्षण, स्वातंत्र्य, जीवनाची सार्थकता, समाज म्हणून एक होऊन जगण्याची क्षमता असे अनेक पैलू 'प्रगती' मध्ये येतात.
महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्राला हुशार आणि कर्तबगार महिलांची उज्ज्वल परंपरा  लाभली आहे.  "ताटी उघडा ज्ञानेश्वरा" म्हणणाऱ्या मुक्ताईने आध्यात्मिक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे त्याच बरोबर"जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर " म्हणणाऱ्या बहिणाबाईने  मराठी लोकसाहित्याचे दालन भावसंपन्न केले आहे.कोणतेही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या ह्या स्त्रिया आपल्या आपल्या क्षेत्रात  खूप पुढे गेलेल्या होत्या.नंतरच्या काळातील उत्तम प्रशासक आणि माळवा साम्राज्याचे राज्य मोठ्या धडाडीने सांभाळणाऱ्या अहिल्याबाई होळकर ह्याही मुळात महाराष्ट्रात जन्मलेल्या.
ही सगळी प्रातिनिधिक उदाहरणे नाहीत तरी सुद्धा महाराष्ट्रात त्या काळातही स्त्रिया विभिन्न क्षेत्रात अग्रेसर होत्या हे निर्विवाद. 
आपल्याकडे अनेक कारणांनी पूर्वीची सामाजिक स्थिती अशी होती की स्त्रियांना शिक्षण देण्याची गरज आहे,असे मुळी सर्वसामान्य लोकांना वाटतच नव्हते. त्याचा परिणाम म्हणजे स्त्रिया पूर्णपणे पुरुषावर अवलंबून होत्या, आधी वडील किंवा भाऊ आणि लग्न झाल्यावर नवरा हेच त्यांचे आधार असत. त्यातून लग्न झाल्यावर जर पतीचे लवकर निधन झाले तर ह्या महिलांच्या दुर्दैवाला सीमाच नसे. ह्या  सगळ्याचे कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव. महाराष्ट्रात महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी  समाज प्रबोधन करून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि १८४८ ह्या वर्षी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. अर्थात् हे करताना त्यांना किती प्रचंड विरोध सहन करावा लागला हे आपण जाणतोच. पण कशालाही न जुमानता त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. आज महाराष्ट्राची कन्या सर्व क्षेत्रात पुढे आहे त्याचे श्रेय ह्या महान व्यक्तींना आहे. कारण स्त्रियांच्या प्रगतीचे शिक्षण हे महत्वपूर्ण अंग आहे.

१९६०-७० या दशकापर्यंत स्त्रिया शिक्षण घेऊन आर्थिक स्वातंत्र्य मिळवू पहात होत्या. पण  बँक किंवा सरकारी नोकरी मध्ये क्लार्कच्या पदावर काम करणे व घर सांभाळून संसाराला हातभार लावणे एव्हढा मर्यादित विचार त्यामागे होता. ह्याला सुधा मूर्तींसारखी अपवादात्मक उदाहरणे होती,पण स्त्रियांच्या बाबतीत सर्वसामान्य विचारसरणी फार पुढारलेली नव्हती.त्यापुढील काही वर्षात मात्र  एकूणच मानसिकतेत आमूलाग्र बदल होऊ लागला. महिलांनी झपाट्याने प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळवले व सिद्ध केले की स्त्री व पुरुष दोघांनाही समान संधी उपलब्ध करून दिल्यास स्त्रियाही उंच भरारी घेऊ शकतात. इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रात तर महिलांनी केव्हाच बाजी मारली आहे. पण केवळ पुरुषांचे समजले जाणारे ड्रायव्हिंग क्षेत्र ही महिलांना वर्ज्य राहिले नाही. अनेक पायलट महिला अत्यंत आत्मविश्वास पूर्वक आपले कर्तव्य पार पाडताना आपल्याला दिसतात.
सुरेखा यादव ह्या तर पहिल्या लोकोमोटिव ड्रायव्हर आहेत, अत्यंत आव्हानात्मक रूट वर त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. त्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार ही देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आता Pink रिक्षा सुरू करण्यात येऊन  त्याची जबाबदारी  महिलांना देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील स्त्रियांच्या प्रगतीचे हे पुढचे पाऊल आहे. सुलज्जा फिरोदिया ह्यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ट्रान्सपोर्टेशनच्या व्यवसायात भरारी घेतली आहे असेच एक क्षेत्र म्हणजे फायर फायटरचे. ह्या क्षेत्रात स्त्री कसे काय काम करू शकेल, असे वाटत असतानाच हर्षिणी कान्हेकर ह्यांनी फायर फायटरचे काम करून अनेक महिलांना अशा प्रकारचे काम करायला प्रेरणा दिली आहे. खरेच ह्या महिला महाराष्ट्राची शान आहेत.
क्रीडा क्षेत्रात ही महाराष्ट्रातील स्त्रिया अग्रेसर आहेत. भाग्यश्री ठिपसेने तर महाराष्ट्राचे नाव देशातच नाही तर जगात उंचावले आहे. बुद्धिबळपटू म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने आपले स्थान निर्माण केले आहे.कला क्षेत्रातही महाराष्ट्रातील महिलांनी खूप प्रगती केली आहे. माधुरी दीक्षित हे एक नाव  महाराष्ट्रातील अभिनय क्षेत्रात महिलांचे योगदान दर्शवण्यास पुरेसे आहे. ही यादी किती तरी मोठी होऊ शकते.अर्थात  ह्याचा अर्थच असा आहे की स्त्रियांना ज्या ठिकाणी आपले कौशल्य, आपली कला, आपले ज्ञान प्रदर्शित करण्याची इच्छा आहे त्या प्रत्येक ठिकाणी तिला ती संधी उपलब्ध करून देण्या इतका आपला महाराष्ट्र  पुरोगामी आहे आणि त्यामुळे त्या संधीचे सोने करून स्त्रिया आपापल्या विषयात प्रगती करत आहेत असे आपण सार्थ अभिमानाने सांगू शकतो. स्त्रीला तिच्या भरारी साठी मिळणारे प्रोत्साहन आणि प्राप्त होणारी अनुकूल परिस्थिती हे आपल्या महाराष्ट्राचे खूप मोठे वैभव आहे.

अर्थात महाराष्ट्रातही शहरी भाग व ग्रामीण भाग ह्यामध्ये तफावत आहेच. अजूनही काही ग्रामीण भागात मुलींना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. केवळ प्रजोत्पादनाचे साधन म्हणून तिच्याकडे पाहिले जाते, अशा स्थितीत तिचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. काही कळ्या तर जन्माच्या आधीच खुडल्या जातात. अशा लोकांच्या मानसिकतेत बदल करणे हे फार मोठे आव्हान आहे. अनेक सामाजिक संस्था हे आव्हान स्वीकारून समाज सुधारणेचे काम करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन त्या स्त्रिया सुद्धा आगामी काळात प्रगतीकडे वाटचाल करतील असे वाटते.
 महाराष्ट्र सरकार कडूनही दुर्बल गटातील महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. बचत गट हा त्याचाच एक भाग आहे. अनेक महिला ह्यातून आपल्या पायावर उभे राहत आहेत तर काही स्वतः उद्योजक बनत आहेत. आर्थिक दृष्टीने निम्न वर्गातील स्त्रियांना पुढे आणण्यासाठी सरकार वर अवलंबून न राहता आपण सर्वांनी ही त्याला हातभार लावला पाहिजे तरच ह्या स्तरातील महिलांची प्रगती होईल असे वाटते. मग ते आपल्या घरी काम करणाऱ्या मावशी का असेनात. महिन्याचा पगार दिला की आपले काम झाले असे न करता त्यांना आपल्या परिवारातील सदस्य मानून त्यांच्या प्रगतीचा आणि आरोग्याचा विचार करायला सुरुवात केली तर मग खरेच ह्या वर्गातील स्त्रिया ही प्रगतीकडे वाटचाल करू लागतील.
एकूण विचार करता आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वतंत्र निर्णय क्षमता ह्या  दृष्टीने महाराष्ट्रातील स्त्री पूर्वी पेक्षा अधिक स्वतंत्र झालेली दिसते आहे आणि विद्यार्जन, अनेक क्षेत्रातील उच्च पदे, कला व सांस्कृतिक क्षेत्र, क्रीडा, आदी विविध क्षेत्रात तिने प्रयत्न करून  दैदिप्यमान यश मिळवले आहे. म्हणूनच आपण निःसंशयपणे म्हणू शकतो की महाराष्ट्रातील स्त्रियांनी विभिन्न क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे हे नक्की.

  डॉ छाया यार्दी.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!