समकालीन मराठी जैन कथा- दरवळ निशिगंधाचालेखिका-प्रा सुरेखा कटारिया
*8. समकालीन मराठी जैन कथा- दरवळ निशिगंधाचा
लेखिका-प्रा सुरेखा कटारिया
वयाच्या सोळाव्या वर्षी अकाली मातृत्वं परिस्थितीनं लादलं होतं त्रिशला भाभीसांवर, आता त्यांनी वयाची साठी ओलांडली होती.
भाभीसा सांगायच्या बरं का राजूल बिन्नी! "लग्न करून घरात आले आणि थोड्या दिवसांत जिनवाणी वर श्रद्धा असणाऱ्या मासांनी दीर्घ आजारा बरोबर संथारा व्रतानं जीवनाचं अंतिम ध्येय गाठलं.लहान रोप्या टोप्या तीन देवरचं संगोपन करता करता माझं तारुण्य हरपलं गं.”
त्यांची छोटी दिवरानी म्हणजे मी जणू त्यांच्या जीवा भावाची लहान बहीणच. आम्ही दोघी मनातल्या जायच्या. त्यांचं न बोलणंही मला ऐकू येत असे. इतक्या दोघी एकमेकींमध्ये गुंतून गेलो होतो . भाभीसांनी सोसलेलं आठवताना त्या स्तब्ध होऊन जायच्या.
लहान लहान देवरला मोठं करताना , संस्कार आणि संस्कृतीचं जतन करत ,रुजवतं मोठं केलं गं...! माधुकरी मागून उच्च पदावर पोचलेले धडपडणारे देवर कुठे? अगदी आर्थिक सुबत्ता नसताना सुद्धा माधुकरी मागताना या आर्थिक परिस्थितीच्या दुष्काळामध्ये भीती वाटली नाही गं कसली. तेवढी भीती आता अतिविलासी ओल्या दुष्काळाची वाटते राजूल....!आरामदायी सुखवस्तूला चटावलेली जीवनशैली बिन मणक्यांची वाटते गं! मुलं घरात फारसं बोलत नाहीत. संवाद हरवतं चाललाय. संवेदनाचे निरोप समारंभ आपल्याच घरात साजरे होताना दिसतात. घर,शाळा, पाठशाळा, दुकानातून केला जाणारा सचोटीचा व्यापार, जैन स्थानक, मंदिर ही आपली बलस्थाने! पण...!
वेगळंच चित्र दिसतंय गं हल्ली ! पोटच्या मुलां-मुलींच वागण पाहिलं, की आता असं वाटतं घर म्हणजे चार घटकांसाठी शोधलेला निवारा. पैशासाठी जगात स्वैर उडून थकल्यावर,भागल्यावर झोपायला एक लॉज म्हणून घरं उरलय असं वाटतं. ...! पूर्वीचा काळ आठवला, की एवढ्या जबाबदाऱ्या घेऊन ही त्या कधीच जबाबदाऱ्या वाटल्या नाहीत मला. अगदी सहजतेने सगळी काम केली. कारण शब्दाच्या बाहेर नव्हते माझे देवर ;पण आता स्वतःच्या मुलांवर विश्वास ठेवताना अनेक समस्या.....आss वासून उभ्या आहेत; राजुल बिन्नीं …..!
देवरानी व जेठांनी यांचा झालेला हा सारा संवाद राजुलबिन्नी आपल्या पतीला सांगत असतानाच, त्यांचं बोलणं मध्येच तोडत राजुलचे पती ,”बरं का राजूल ज्या वयात आम्ही त्यांच्या मुलांना रागवायचो तेव्हा आमच्यावरचं त्या ओरडायच्या...!अरे असं करू नका, म्हणण्याची पण सोय नव्हती त्यांच्या मुलांना. गौतमभाऊला व्यापार,धंद्या मधून वेळ नव्हता, मुलांना देण्यासाठी! 'असूनी नाथ मी अनाथ' अशी अवस्था..! धंद्याचा मोठा आवाका सांभाळता सांभाळता दमलेले गौतमभाऊ मुलाच्या भविष्यासाठी स्वतःचं वर्तमान हरवून सर्वांचेच गुंते वाढवताना दिसले गं..! भाभीसांनी मुलांचा केलेला अतिलाड!! हे सारं पाहून पुष्कळ जीव तुटायचा पण.....! इतकी टोकाची निराशा एकाएकी येत नाही ! त्याची पूर्वतयारी भाभीसांनी अगोदरच कळत नकळत केलेली होती.
सी. ए. होण्यासाठी हाताला प्रचंड पैसा उपलब्ध होता. जिनेश्वर तसा हुशार, बुद्धिमान होता! शिक्षणासाठी दूर गावी मी नको म्हणत असताना सुद्धा पाठवलं . तेव्हा ऐकलं नाही माझं . मग...काय.....?तारुण्यातल्या कुसंगती. प्रतिष्ठेच्या पाउल वाटेने आलेली व्यसने. जीवनातील हरवत चाललेली उद्दिष्टे. भविष्याचा नेमका अंदाज न आल्याने घेतलेली कर्जे.ही आज निर्माण होणाऱ्या परिस्थितीची कारणे आहेत.बीजं पेरलं की ते अंकुराव, त्याच रोप होऊन वृक्ष व्हावा. त्याला फळ फुल यावीत.ही सहज नैसर्गिक अपेक्षा असते हो राजूल…!. ती त्या संस्कार पेरणीच्या कृतीतंच असते. ते एकदा अंकुरले ,की प्रवास कसा सुरळीत होतो. जसा आपला मुलगा अभिनंदनच्या बाबतीत चालला आहे.
“अहो…! अभिनंदनला भाभीसांनीच वळण लावलं आहे ना ? पण...!! त्यांच्याच मुलाचं जिनेश्वरचं विपरीत वागणं .त्यामुळे भाभीसांच्या होणाऱ्या अपेक्षा भंगानं घरातील तप्त झालेलं वातावरण.. ! सर्वांचे जगणं बेचैन करत आहे .काय बरं करावं...? सुचत नाही मला... !”
हे बोलत असताना राजूलबिन्नीच्या डोळ्यांसमोर स्वतःचा मुलगा अभिनंदन व जिनेश्वर आला. “तरणी ताठी मुलं घरात असली की जगण्यांला कधी विधायक, तर कधी विघातक कलाटणी देणारे अनेक प्रसंग घराघरातून कसे घडतात . हे इतक्या दिवस आपण समाजात पहात होतो, ऐकत होतो, परंतु आता याचा अनुभव आपल्या घरातच आपण घेत आहोत.. तेच झाले सी. ए. होणाऱ्या जिनेश्वरच्या बाबतीत....!”
पण हा अचानक इतका बदल त्याच्यामध्ये होईल असं वाटलं नव्हतं गं ….!
ब्यानजीसा मनोमन विचार करू लागल्या. मग काय झालं अचानकच राजूल विहीणबाई.
त्याचं असं झालं." जिनेश्वरने एकदा त्याच्याचं बरोबर शिकायला असणाऱ्या माहेश्वरी समाजातील तुमच्या अक्षदाला घरी आणलं; हे त्रिशला भाभीसांना आवडलं नाही. तेव्हा त्या काही बोलल्या नाहीत.त्यांचे डोळे भरून आले . त्यावेळी त्यांचं मौनव्रत चाललेलं होतं. आठ दिवस आयंबिल ओली मध्ये त्या मौन ठेवून आयंबील ओली करत असायच्या, जिनेश्वर ही काही न बोलता निघून गेला. जिनेश्वरच्या मनावर ताण आला. त्याने ही सारी हकीकत आपली प्रिय मैत्रीण अक्षदाच्या कानावर घालून मलाही सांगितलं बरं..!
काय बरं सांगितलं जिनेश्वराने .
“अहो !सुरुवातीला बोलतच नव्हता. खूपदा विचारल्यानंतर, बऱ्याच वेळाने ‘काकी माझं प्रेम आहे अक्षदावर….!’
"अरे! पण..!! पण...!!! ती माहेश्वरी समाजातली आहे ना?"
"म्हणून काय झालं? भगवान महावीरांचा अनेकांतवाद काय सांगतो काकी? तो आपल्या जीवनात उतरवण्याच्या प्रयत्न करणार आहोत की नाही ?."
त्याच्या या बोलण्याने मी आsवासून त्याच्याकडे पाहू लागले.
काहीस आठवत पुढे तो बोलतच होता, " काकी, सुमती प्रकाशजी महाराज साहेब जैन भगवती दिक्षा घेण्यापूर्वी कोणत्या समाजाचे होते गं?"
"अरे! हे काय विचारतोस? तुला ठाऊक आहे ना, ते सिंधी समाजातून आलेले होते ."
"काकी! सिंधी समाजातून आलेले अध्ययनानं,तपानं, जपानं, साधनेनं ते जैन भगवती दिक्षा घेऊ शकतात. जिनवाणीचं अध्ययन करू शकतात. मग माहेश्वरी समाजातून आलेली मुलगी आपल्या जैन समाजात,घरात का चालत नाही.अक्षदा तर शाकाहारी आहे?"
मी क्षणभर अबोल झाले. काय बोलावे ते मला सुचेना. मी गप्प होते, ते पाहून जिनेश्वर म्हणाला, “काकी मला ती मनापासून आवडली आहे. तिचा वाचनाचा व्यासंग, जिद्द, संस्कार, संस्कृती असे अनेक रंग या अक्षदा नावाच्या इंद्रधनू मध्ये मी पाहिले आहेत. माणसाची जगण्यात सतर्कता असावी. वर्ण, जाती, धर्म यांचे अंगरखे व बुरके फेकून द्यावेत. लग्न करेल तर याच मुलीशी करेल.” हे सांगून तावा तावाने जिनेश्वर निघून चालला असताना , मी "अरे..!पण..!! आपले रीतीरिवाज, आपल्या चालीरीती कसं तिला समजणार? भाभीसांना काय वाटेल?
माझ्या मनावर ताण आला एका बाजूला भाभीसा तर दुसर्या बाजूला त्यांचा मुलगा जिनेश्वर या दोघांमध्ये समन्वय कसा साधावा? ही मोठी समस्या माझ्या समोर होती.
मनात विचारांचं काहूर माजलं आणि भाभीसांच्या मौनव्रताची सांगता होताच सैरभैर झालेल्या भाभीसांनी माझ्याशी संवाद साधला , "राजूल बिन्नी विचारातून परावर्तित होणाऱ्या अनेक नैसर्गिक प्रेरणा मनाला चिंतन करायला लावतात. भूतकाळाशी धागा जोडतात. भविष्याची स्वप्न रंगवतात. सुप्त असणारी ऊर्जा जागृत करून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनवे प्रयोग करत असतात.हे सारं मान्य आहे गं मला, परंतु 'असं तरुण मुलां मुलींचं एकत्र राहणं' बिलकुल मान्य नाही."
शिक्षणाच्या पंखांनी जवळ आलेलं जग त्याच पंखांनी घरातून केव्हा बाहेर पडतं हे कळतही नाही. आणि असं वाटतं घरातलं घरपणच संपलं. निरंजनाची जागा विजेच्या दिव्याने घेतली तरी तिन्ही सांजाच्या वेळेला देवासमोर लावलेला दिवा मनाला एक वेगळीच शांती, अनुभूती देत असतो. परंतु त्या शांतीचा कसलाही विचार न करता जिनेश्वरने अक्षदाला रीतसर रजिस्टर लग्न करून घरी आणलं.
भोवताली घोंगावणाऱ्या वादळात ही मूल्यांची निरांजने तेवती ठेवण्यासाठी त्रिशला भाभीसांची केविलवाणी धडपड चाललेली होती. जिनेश्वराचं असं वागणं घरात सर्वांनाच असाहाय्य करत होत.
दुकानातून आलेल्या जिनेश्वरच्या काकांनी मला आवाज दिला. "अहो कुठे आहात आपण?”
मी व त्रिशला भाभीसा मागच्या अंगणात कबुतरांना तांदळाचे दाणे टाकत बोलत होतो . आवाजाचा कानोसा घेत राजुल बिन्नी पुढे आल्या.”काय हो..?आपण आवाज दिलात का?”
हो ... ! अस्वस्थ झालेले पती मोठ्या चिंतेन ग्रासल्यासारखे बोलत होते, “बरं का राजुल, भाभीसाच आजच मौन व्रत संपल आहे. त्रिशला भाभीसा उद्यापासून जैन स्थानकांतच 'पौषधव्रत' घेतील. घरातलं सर्व करून, तुम्हांला त्यांच्या सेवेमध्ये जावं लागेल. त्यांची तपस्या सोरी जावी यासाठी त्यांना प्रतिक्रमण ऐकवणं हे तुमचं कर्तव्य आहे. हे लक्षात असू द्या.जैन स्थानकात आलेल्या स्वाध्यायजींची ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. त्यांना हवं नको पाहायला हवं. कारण आठ दिवस ब्रह्मचारी निर्मलजी छाजेड ,मनोजजी पटेरिया हे स्वाध्यायजी साधुसंतां सारखे कडक नियमांचे पालन करतात.ते स्वाध्याय ऐकवण्यासाठी जैन स्थानकामध्ये येणार आहेत. त्यांचं त्यागी जगणं आपली सर्वांची ऊर्जा वाढविणार आहे हे लक्षात असू द्या. “
"हो ! करू हो सगळं आम्ही …! नव्याने सहा महिन्यापूर्वी लग्न करून घरात आलेल्या अक्षदालां ही मला साऱ्या गोष्टी सांगाव्या लागतील. शिकवाव्या लागतील.भाभीसा आठ दिवस जैन स्थानकातच असतील."
बेडरूम मध्ये गेलेल्या अक्षदाला आवाज देत ,"अगं अक्षदा इकडं ये. पर्युषण पर्व उद्या पासून सुरू होणार आहेत. भाभीसांनी करून ठेवलेली ती कामाची यादी घे बरं ! काय काय करायचं राहिले ते पाहू."
तेवढ्यात जिनेश्वरने बाहेरून येताना हे ऐकले.” काकी कसली यादी म्हणतेस ?"
“अरे जिनेश्वर ! पर्युषण पर्व आलेत ना? भाभीसांनी सगळ्यां गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. पुन्हा घाई गडबड नको.म्हटलं जरा यादीवर नजर फिरवावी.”
अक्षदाने माजघरातील काचेचा दरवाजा लावत पुन्हा विचारले, "काकीसा सांगा ना मला पर्युषण पर्वाची महती, पर्युषण पर्व म्हणजे काय हो?
काकीसांच मनं तडतडलं. अक्षदा बिन्नीवर राग धरून ठेवणं, त्यांना अवघड जात होतं. गोड आणि साधी परंतु तत्वनिष्ठ होती त्यांची सून! अगदी त्यांच्या मनाजोगती. पण.... घरातल्यांचा विरोध पत्करून!! जेठूता जिनेश्वरच्या मनात भरली; म्हणून घरी घेऊन आला आणि ती घरातलीच झाली! जिनेश्वर, अक्षदा आणि त्रिशला भाभीसा या तिघांमधील समन्वय साधण्याचं काम मी करत होते .
परंतु तिच्या सासुमॉ त्रिशला काही केल्या;तिच्याशी जमवून घेत नव्हत्या. ती ही चिंतेत होती. म्हणून ती सारखी आगेमागे फिरायची आणि जगणं सुसह्य करण्याचा प्रयत्न करायची.
हे करत असताना माझ्या डोक्यात अनेक विचार यायचे " नव्याने येणाऱ्या सुनबाईंमुळे घरातं नवे प्रवाह धावण्याचा प्रयत्न करतात;पण भाभीसां सारख्या भूतकाळात रमणाऱ्यांना अशा प्रवाहांना कुठलाचं आनंद अनुभवता येतं नाही. भाभीसानी अनेक वर्षापूर्वी सोसलेल्या अनेक क्षणांच्या आठवणींनी त्यांचं मन उगबलेलं होतं. त्रासलं होतं.त्यामुळे इतर समाजातून आलेली मुलगी सून म्हणून स्वीकारताना सतत मान- अवमानाच्या गुंत्यात त्रिशाला भाभीसा गुंतल्यामुळे तिरस्कार, दुःख त्यांच्या समोर येत होतं. हे सारं मला समजत होतं;परंतु त्यांची आदर युक्त अशी भीती मला होती.
*******
लग्न करून घरात अक्षदाला आणल्यानंतरही सुलभाने आपल्या बाईला खूप समजविण्याचा प्रयत्न केला होता. "अगं बाई त्याला योग्य वाटलेली लाईफ पार्टनर त्यांन निवडली. आता उगाच घडलेल्या गोष्टींचा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे."
बाई कातवली,"काही ही बोलतेस, म्हणे त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आम्हाला काही समजत नाही का? आम्हीच वाढवलं ना त्याला ताडमाडा सारख ? आणि काय गं त्याचं चांगलं भलं व्हावं अशीच घरातल्यांची इच्छा असणार ना !"
गरम झालेले वातावरण सावरण्यासाठी सुलभा समजवण्याच्या सुरात , "बाई तिला बोलू नको. तिच्या आई वडिलांना सोडून ती तिकडून आपल्याकडे आली आहे. तिकडची आहे म्हणजे इंग्लिश- बिंग्लिश परदेशी आहे का?
“अगं बाई गं ss!बाईनं कपाळाला हात लावला. "आपल्या समाजात काय कमी पोरी होत्या का?"
अभिनंदनने सुलभाकडे पहात डोळे मिचकावले. अभिनंदन ,"बडीमॉ , सगळ्या परदेशी मुली इंग्लिश नसतात बरं...! अभिनंदनं बडीमॉला समजावलं.
"इंग्लिश काय ? आणि अमेरिका काय ? मुलगी आपल्या समाजाची नाही, हे खरं आहे ना?"
सुलभा अवंढा गिळत , "बाई..! जग पूर्वीच राहिल नाही.आताची ही पिढी जे शिकतायत, जे पाहतायत, तसं जगतायत; त्यात जात, धर्म काही काही नाही. संबंधच नाही त्यांचा."
"म्हणजे गं काय,सुलभा ? तिला पर्यूषण पर्वामध्ये आगम ग्रंथांना हात लावता येईल का ? मंदिरात, जैन स्थानकात जाता येईल का ?घरातलं आगम शास्त्र वाचन कुणी करायचं गं ?
बाईचं हे सारं ऐकताच जरासं काही आठवत सुलभा , "बाई तू आजारी होती ना तेव्हा तुला रक्ताची गरज होती. तुझ्या शरीरात भरलेले रक्त कुणाचं होतं माहिती आहे तुला?
"कुणाचं गं ?"
"अगं...! आपल्या इथे काम करणाऱ्या सुताराच्या सखु मावशीनं तुला रक्त दिलं होतं. म्हणून तू वाचलीस . हे विसरू नकोस. अन् तू सांगायची ना आपल्या पडत्या काळात विठोबा माळ्यानं आपल्याला मदत केली. आठवत ना, बाई?"
बाईनं मान डोलावली. "फार हलाक्याचे दिवस काढलेत बघ आम्ही." त्या सुस्कारा टाकत म्हणाल्या.
" तेव्हा कुठल्या जातीचा, धर्माचा विचार ही मनात आला नाही. आपल्याला त्यांचं रक्त चाललं....! मग आत्ताच असं का ? सुलभा तळमळून बोलत होती.
अरिssहंत अरिssहंत करतच बाई बडबडू लागली.
मी सुलभाला डोळे मिचकावत दटावले."अगं सुलभा, आता कुठं भाभीसांच्या जगण्यांला समाधानाचे, आनंदाचे दिवस आले. मुलगा सी. ए. जिनेश्वरला अनेक चांगली- चांगली घरंदाज , स्थळे सांगून येत होती. परंतु ........! जिनेश्वरकडून मिळालेला अनपेक्षित धक्का!त्यांना सहन होत नाही. त्यांच्या मनाचा जरा विचार करा. जरा आम्हाला समजून घ्या ना."
दिवरानी म्हणून माझ्यावर खूप मोठी जबाबदारी होती. इकडे सून व तिकडे जीठाणी या दोघींना सावरताना मात्र ससेहोलपट होऊ लागली माझी" या विचारातच मी बाहेर अंगणात गेलेल्या अक्षदा बिन्नीला सांगू लागले, "पर्युषण पर्व हे जैन धर्मातील महत्त्वाचे अध्यात्मिक पर्व मानलं जातं अक्षदा."
"काकीसा परवा सासुमॉ जिनेश्वरला सांगत होत्या,"जिनेश्वर मटकी,मुग,चवळी, हुलगे,उडीद, गव्हाचा दलिया, केरसांग-या, आणून ठेव."
"अगं !जिनेश्वर काय म्हणतेस? नव-याला असे एकेरी बोलवणं... शोभतं का तुला? तो तुझा नवरा आहे ना ?"
"म्हणून काय झालं ? आम्ही दोघे ही बरोबर शिकत होतो.मला सवय लागली आहे.नावानं बोलवण्याची"
मी डोक्यालाच हात लावला."असं उरमट बोलन तुझ्या सासुमॉला आवडत नाही अक्षदा."
अक्षदा अगदी गप्प झाली.
मी सुलभाला ,"सुलभा खरंच काळ बदलला,की शब्दांचे संदर्भ ही कसे बदलतात. नीतिमूल्य, त्यांच्या संकल्पना यामध्ये अमुलाग्र झालेले बदल अनुभवास येतात. एकीकडे वापरलेल्या शब्द संदर्भांना सहजतेनं घेणारी ही नवी पिढी;तर दुसरीकडे आमच्या सारखी असल्या शब्द संदर्भाने अंतर्मुख होऊन विचार करणारी वयोवृध्द पिढी ! कसा ताळमेळ बसणार गं ?"
तेवढ्यात अक्षदा, "काकीसाssओss काकीssसा! मी काय म्हणते."
"मला काय म्हणालीस का अक्षदा ?" तंद्रीत असणाऱ्या काकीसांची तंद्री मोडली .
" हो काकीसा ! हे कडधान्य कशासाठी ?"
"अगं! आपण पर्यूषण पर्वामध्ये आठ दिवस लीलोती खात नाही."
"लीलोती म्हणजे काय हो?"
" अक्षदा...! लीलोती म्हणजे हिरव्या पालेभाज्या, सचेत वस्तू पर्युषण पर्वात वर्ज्य केल्या जातात."
अक्षदा ,"का बरं?"
"अगं! आपली पचनक्षमता ही पावसाळ्यात मंदावत असते. पावसाळ्यात पुरेसा सूर्य प्रकाश उपलब्ध नसल्यामुळे पालेभाज्यांवरती किटाणूंचा प्रादुर्भाव जास्त होतो. ही हिंसा आपल्या हातून होऊ नये व आपले शारीरिक स्वास्थ्य बिघडू नये म्हणून लीलोती न खाण्याचा व्रत घेतलं जातं.कुणी आठ दिवस हे व्रत पाळत. तुझ्या सासूमॉ हे व्रत चातुर्मास बसल्यांपासून संवत्सरीपर्वा पर्यंत पाळतात बरं....!" आपण सर्वांनी हे व्रत किमान आठ दिवस तरी पाळावं .हा आपल्या घरातील सर्वांनी गुरुमहाराजांकडून घेतलेला नियम आहे. अक्षदा, या पर्युषण पर्वा मध्ये कषाया पासून दूर राहण्यासाठी, समता भाव ठेवण्यासाठी घरातले प्रत्येक जण जागृत असतात. सतर्क असतात बरं...!अक्षदा आपल्या जीवनाच संगीत रुणझुणायला हवं यासाठी जीवनात नियम महत्त्वाचे. नदीला काठाचं बंधन असतं. म्हणून ती नदी राहते. आपल्या जगण्याला नदीचे महत्व प्राप्त व्हावं आणि ही नदी सागरामध्ये विलीन व्हावी. अगं, जीवनाला सुद्धा आपल्या नीती मूल्याच्या बंधनाने उर्जित करायचे असते. म्हणून हे चातुर्मासाचे आयोजन केलेले असते .पर्युषण पर्व व्रत आहे. म्हणून भाभीसां जिनेश्वरला सांगत असतील."
अक्षदा यावर चिंतन करत...करत...काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. जिनेश्वर पलंगावरील चादरीला पडलेल्या सुरकुत्या,सळ नीट करत अक्षदाला सांगू लागला. "अक्षदा उद्या लवकर ऊठ हं. गजर लाव. उशीर झाला तर बाई आणखी नाराज व्हायला नको."
अक्षदा , "तुझ्यापेक्षा मीच लक्ष ठेवून करते हो सगळं. पण त्यांच्या इतकी श्रद्धा- बिध्दा माझ्या जवळ नाही हो ! अन् ती तुझ्या जवळ तरी कुठे आहे ?कुठून आणायचं उगीचं सोंग ? आणि कशासाठी ? ---------- तिच्या या बोलण्याने जिनेश्वर वैतागला.
लग्नानंतर काही दिवसातच सगळी समीकरणे बदलू लागली. एकमेकाशिवाय क्षणभरही राहू न शकणारे ते दोघे सतत भांडू लागले .अगदी शुल्लक शुल्लक कारणावरून वाद होऊ लागले. अगोदर सासू सुने मधील अबोला आणि आता अक्षदा व जिनेश्वर या दोघांमधील मतभेद ,वाद सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नऊ येऊ लागले. घरात जिनेश्वरचं उशिरा येणे. घरात कोणासाठी कोणाला वेळ नसणं. हा या नव्या पिढीच्या मागे लागलेला जणू नागच आहे. सीए झालेला जिनेश्वर आपला व्यवसाय आणि करियर यामध्येच आपलं भवितव्य शोधण्यासाठी धावू लागला. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद होऊ लागले. एकाच घरात राहून दोघे परस्परांना अनोळखी होऊ लागले.
लग्ना अगोदर प्रेमात असताना दिलेल्या अनाभाका कुठे गेल्या . एकदा शुल्लक कारणावरून वाद होऊन तो रागा रागातच घरातून निघून गेला. आणि घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण होऊ लागले. एकीकडे बाईच्या मनाची होणारी घुसमट व एकीकडे अक्षदाच असं वागणं आणि पैसा, करिअर, भौतिक सुखांसाठी चाललेली जिनेश्वरची कसरत. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची उदासीनता वाढत होती. याच विचारात कोणालाही काहीही न सांगता डोक्यात राग घेऊन तो निघून गेला होता.
रात्री उशिरापर्यंत तो आलाच नाही. या बदललेल्या वातावरणाचा पश्चाताप दोघांनाही होत होता. त्यामुळे जिनेश्वर घरातून रागात निघून गेला तरी अक्षदा त्याची आतुरतेने वाट पाहत होती. तो फोनही उचलत नव्हता .रात्री एक दीडच्या सुमारास तो मद्यधुंद अवस्थेतच हेलकावे खातच घरी आला. त्यावेळी घरातील सर्वजण जागेच होते. तो घरात येताच घरातील सर्वजण त्याच्या अवतीभोवती जमा झाले.
“जिनेश्वरा हे काय?” मी हतबल होऊन विचारले .
तेव्हा “काही नाही, काही नाही” असं म्हणून तो बेडरूम मध्ये निघून गेला. त्याची ती अवस्था पाहून घरातील कोणाला काय बोलावे हेच सुचत नव्हते. तरीही अक्षदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. आणि जिनेश्वर मद्यधुंद अवस्थेत बरळत होता, “बाई नाही राहणार आम्ही वेगळं, नाही राहणार आम्ही वेगळं”. हे शब्द बाईच्या कानावर पडले आणि ती अधिकच अस्वस्थ झाली. जणू विषारी वायूचे सिलेंडर फुटावे आणि त्यात साऱ्यांचीच घुसमट व्हावी.. जीव गुदमरावा. अशी अवस्था सर्वांचीच झाली होती. कारण जिनेश्वराने गुरु महाराजांकडून सप्त कूव्यसनाचा त्याग हा नियम डावलून त्याचं हे विपरीत वागणं घरातील प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायला लावणार होतं. बाई नवकार मंत्राचा जप करत सामायिक घेऊन बसली होती. तिला झोपच लागेना. बाकीचे घरातील कसेबसे झोपी गेले.
घड्याळाचा गजर झाला आणि मी जागी झाले.पर्युषण पर्वाचा आजचा पहिला दिवस होता.घरातील अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा धर्मावर आगाध श्रद्धा असणाऱ्या भाभीसा जैन स्थानकामध्ये निर्जली उपवास करण्यासाठी निघून गेल्या. घरात विचित्र शांतता होती. गलका होता पण शब्द नव्हते. गोंगाट होता पण सूर नव्हते. घरातलं वातावरण धुमसत राहिलं. असेचं दिवसा मागून दिवस जात राहिले.
बाईचं व्रत चालूच होतं. अक्षदाला वेगळं राहायचं होतं. आणि त्यामुळे घरातील ताणतणाव वाढत होता. बाई मात्र जैन स्थानकामध्ये पूर्ण मनोभावे वितराग सेवा करत होती. पहाटे उठून सामायिक अंतगड सूत्राचे वाचन .दुपारी कल्पसूत्राचे वाचन .सायंकाळी प्रतिक्रमण. असा दिवसभर निर्जली उपवास करून निर्माण झालेल्या समस्येला सोडवण्यासाठी मनोभावे जिनशासनाची आराधना करत होती.
घरातलं मात्र समीकरणच बदलून गेलं होतं. पुन्हा असाच एके दिवशी जिनेश्वर कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेला.त्याच्या अशा वागण्याने अक्षदाही हतबल होती. अक्षदा माझ्याकडे येऊन स्वतःच्या चुकीबद्दल पश्चाताप करू लागली. आज लग्नाला सहा महिने झाले होते. दर महिन्याला या दिवशी आठवणीने जिनेश्वर तिच्यासाठी निशिगंधाची फुले घेऊन येत असे .म्हणून ती रडवेली होत स्वतःला दोष देत आतुरतेने नवऱ्याची वाट पाहत होती. तो परत सुखरूप घरी यावा म्हणून मी शिकविलेल्या नवकार महामंत्राचा जप अक्षदा करत होती.
जिनेश्वर आणि अक्षदाच्या वैवाहिक जीवनातील हा गुंता सोडवण्यासाठी मी अक्षदाला समजावू लागले.” अक्षदा व्यवहारी जीवनात बुद्धीला आव्हान देताना, हृदयाच्या तारा जोडण्यासाठी कधी दोन पाऊल पुढे जावे लागते, तर कधी दोन पाऊल मागे यावे लागते. संवाद म्हणजे फक्त बोलणं नसतं. अनेकदा भेटीतील अबोल्यातूनही तो संवाद समोरच्यापर्यंत पोहोचत असतो . आर्त डोळ्यातील कडांवरून ही तो ओघळतो .यातूनच घरपण जपणं ,एकमेकांची मन जपणं महत्त्वाचं असतं. हे अवघड असलं तरी अशक्य नाही. अक्षदा जर हे साधलं नाही तर भौतिक सुखाच्या घरात, चंदेरी दुनियेत, नोटांच्या पावसात सुद्धा आपण कोरडेच राहू. “ रात्री न जेवलेल्या अक्षदाच्या हाती दुधाचा ग्लास देऊन गोठ्यात असणाऱ्या गाईला गोग्रास देण्यासाठी मी मागे गेले. त्याचं वेळी दारावरची बेल वाजली. अक्षदाने धावत जाऊनच दार उघडलं तर बाहेर पावसाने चिंब भिजलेला जिनेश्वर आणि त्याच्या हातात निशिगंधाची फुले.
तिने मनोमन ठरवलं नवऱ्याशी भांडायचं नाही. तो आत गेला. निशिगंधाच्या फुलांच्या सुगंधाने तिचे भान हरपून गेले. तोच फोनची रिंग खणानली. त्या आवाजाने ती भानावर आली. फोन घेण्यासाठी ती पुढे सरसावली .गोठ्यातून फोनच्या रिंगचा आवाज ऐकून मी ही पुढे आले. फोन रिसीव्ह करताच पलीकडून आवाज आला, “हॅलो मॅम, मी रेल्वे पोलीस स्टेशन मधून बोलतोय, हा नंबर जिनेश्वर मेहता यांचाच आहे ना?”
हे ऐकताच अक्षदाचे काळीज धडधडू लागले. धडधडत्या हृदयानेच तिने उत्तर दिले, “हो हो त्यांचाच नंबर आहे हा” पलीकडून आवाज आला. “क्षमा करा मॅडम इथे अपघात झाला आहे. त्यात एक व्यक्ती मृत्युमुखी पडली आहे. आणि त्यांच्या खिशातून आम्हाला हे पाकीट मिळाले आहे. त्या पाकिटात हा नंबर होता. तुम्ही त्यांना ओळखत असाल तर इथे येऊन मृतदेहाची खातरजमा करून घेण्यासाठी आपण ताबडतोब शिवाजीनगर रेल्वे पोलीस स्टेशनला यावे .”हे ऐकून अक्षदाची बोबडीच वळाली. हातापायांना कंप सुटला. तशाच अवस्थेत नवकार मंत्राचा मनातल्या मनात जप करत करत ,” इन्स्पेक्टर साहेब अहो…! जिनेश्वर मेहता तर आत्ता घरातच आहेत.” समोरून प्रतिउत्तर आले. पहाटे तीन वाजता ट्रेनमध्ये चढताना हा अपघात झालेला आहे. हे ऐकताच तिला भोहळ आली, असं कसं घडू शकत ?त्यावेळी गाणं कोकिळा परमपूज्य मधुस्मिताजी महाराज साहेबांनी सांगितलेलं अक्षदाला आठवलं ‘आत्मा अजरामर आहे .मृत्यू झालेल्या व्यक्तीचा आत्मा लगेचच आपल्या प्रिय व्यक्तींना शेवटचं भेटण्यासाठी येत असतो. तो अजर अमर अविनाशी असतो.’
हे अक्षदाने अनेक वेळा गुरु महाराजांच्या तोंडून ऐकले होते . असाहाय्यपणेच भरल्या डोळ्यांनी ती जिनेश्वर ला शोधण्यासाठीच आत धावली; पण तो घरात नव्हताच. हे सार मी पहात होते . तिच्या पाठोपाठ मी ही तिच्या मागे गेले .अक्षदा स्वतःशीच बडबडत होती. गुरु महाराजांनी सांगितलेलं खर आहे का ?जिनेश्वर खरंच गेलाय का ?मी त्याच्याशी सतत भांडत राहिले. वेगळं राहायचं म्हणून सांगत राहिले. आता मी त्याची क्षमा कशी मागू? हे बोलत असतानाच मोठ्या हुंदक्यानं ती जमिनीवर कोसळणाऱ तोच अक्षदाला सावरण्यासाठी मी पुढे धावले.त्याच वेळी बाथरूमचं दार उघडण्याचा आवाज आला. आणि पावसाने भिजलेलं अंग पुसत बाथरूम मधून जिनेश्वर बाहेर आला.आणि मला बघून , “काकी मी तुम्हाला सांगायचं विसरलोच, काल रात्री ट्रेनमध्ये चढत असताना कोणीतरी माझं पाकीट मारलं हो..!” हे ऐकून अक्षदाने सुटकेचा निश्वास टाकला.
जिनेश्वर जिवंत आहे, पाहून अक्षदाच्या अश्रूचा बांध फुटला. आणि ती त्याच्या पायावर नतमस्तक झाली. त्यावेळी जिनेश्वराने तिचे दोन्ही खांदे धरून तिला उभं केलं आणि म्हणाला,” काळानुसार आपण बदलत आहोत. जैनेतर समाजातून आलेलं असतानाही आपल्या प्रेमाखातर घरातल्या लोकांची इच्छा नसताना सुद्धा त्यांनी आपल्या सहजीवनाला मान्यता दिली. आणि तू म्हणतेस वेगळं राहायचं …! कोणामधून वेगळं राहायचं? ज्या आईने जन्म दिला, मोठं केलं. ज्या काका काकीन लाडकोड करून सांभाळलं त्यांच्यापासून वेगळे राहायचं…! ही कल्पनाच मला करवत नाही.” जिनेश्वर बोलत असतानाच अक्षदाने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याला मध्येच थांबवत आता मी असा कधी अविचारही करणार नाही.
जुन्या कालबाह्य झालेल्या चालीरीती, सुख- दुःखाची जुनी परिमाणे काळाच्या ओघात वाहून जाणारच. काळाचा ओघ आधीचे वाहून नेण्यासाठीच असतो. पण आधीची मूल्य व्यवस्था वाहून गेल्यानंतर त्या जागी नव्याने अधिक सक्षम पणे नीती मूल्याची प्रतिष्ठापणा करणे महत्त्वाचे नाही का हो ब्यानजीसा ? आणि हे आपण सर्व मिळून करूया हे सांगत असताना सर्वांचेच डोळे पाणावले.
ही सारीकृपा भगवान जिनेश्वराचीच बरं…! हे जैन स्थानकातून आलेले जिनेश्वरचे काकासा व बाई दूरवरूनच ऐकत होते .बाईची आठ दिवसांची तपश्चर्या आणि आठ दिवसात घडलेल्या या घडामोडी, आपल्या आपल्या कर्माची फळेच होय . की उत्तर अध्ययन सूत्रातील सांगितलेल्या अंतराय कर्मबंधाचीच फळे होय.
मौनव्रतधारी बाई बोलू लागली, “बरं का मुलांनो शिखरावरून एखादा गोटा गडगडताना वाटेत असणार एखादे दुबळ वाटणार झाड ही त्या गोट्याला अडवू शकते व अनर्थ टळू शकतो. त्याप्रमाणे घराघरात निर्माण झालेली ही वैचारिक घुसमट बाहेर काढणे महत्त्वाचं त्यासाठी संवाद हवा. हे सारं खूप दिवसांनी बाईच्या पारण्यासाठी आलेल्या सुलभाला व अक्षदाच्या मम्मीला राजूल काकीसा सांगत होत्या.
जैन श्वेतांबर स्थानकवासी समाजातील काही विशिष्ट शब्दांचे अर्थ
*देवरानी- छोटी जाऊबाई
*जेठाणी- मोठी जाऊबाई
*मुहपत्ती- वायुकाय जीवांची विराधना टाळण्यासाठी तोंडाला बांधलेली कपड्याची घडी.
*एकेंद्रिया,बेंद्रीया- सृष्टीतील जीवाचे केलेले वर्गीकरण. एक इंद्रिय असणारे जीव व दोन इंद्रिय असणारे जीव.
*अरिहंत- अरी म्हणजे शत्रू व हंत-काम, क्रोध, मोह, माया याचा नाश करणारे. ज्यांनी अंतरिक शत्रूचा नाश केला ते अरिहंत.
*भोजाई- वहिनी, भाभी.
*बडीमॉ - मोठी आई
*तपस्या सोरी जाणे- तपसाधना सुखवाह होण्यासाठी. तप साधना निर्विघ्न रूपाने पार पाडण्यासाठी दिलेला आशीर्वाद.
*पौषधव्रत- निरंकार उपवास करून धर्मा आराधना करण्याचे व्रत. 24 तास पाणी सुद्धा न वापरणे. आत्म गुणांचे पोषण करणारे व्रत.
*प्रतिक्रमण- केलेल्या पाप कर्माची क्षमायाचना करण्यासाठी केलेली साधना. मागं येणे परत येणे .
*संवत्सरी-पर्युषण पर्वाचा शेवटचा दिवस.
*लीलोती- सचित वस्तू, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या.