समकालीन मराठी जैन कथा नात्यांचा पोत

*समकालीन मराठी जैन कथा*-


 *नात्यांचा पोत...!*
                                                                                              लेखिका-प्रा सुरेखा  कटारिया-  मा. उपप्राचार्य भारतीय जैन संघटनेचे विद्यालय. पिंपरी, पुणे. 


             पहाटे तीन ते पाच या वेळेत रोज नवकार महामंत्राचा जप, प्राणायाम करून नित्यनियमानं दुर्गा टेकडी चढणारा रिटायर कर्नल सुनील जैन, नेहमी प्रमाणे आज ही पहाटे रपेटसाठी निघाला होता. ती पौर्णिमेची रात्र होती. चंद्राचा चंदेरी प्रकाश  हिरव्यागार घनदाट अशा दुर्गा टेकडी वर वर्षावत होती. त्यामुळे झाडांचा हिरवा पोपटी  रंग अधिकच उजळून निघाला होता. डोळे चमकवत होता.दिपवत होता. निगडी गावातून निघालेला हमरस्त्या वरील तो गाडीमार्ग रस्त्यावरून धावताना अनेक नागमोडी वळणे घेत उंच टेकडी चढून घोराडेश्वर गावाकडे उतरत होता. नेहमीप्रमाणे कर्नल सुनील दुर्गा टेकडीकडे निघाला होता. भन्नाट वेगानं चालणारी त्याची सायकल, आज शांततेत चालली होती. वाऱ्याच्या मंद झुळूकांनी त्याच्या मनाला प्रसन्नतेची झालर लागली होती. 
सुनीलचा धाडपाड देह त्याच्या अफाट देशसेवेच्या कृत्याला जणू साजेसा होता. उंच्चा पुरा गोरापान सुनील..! सुनिलचे मोठे मस्तक, रूंद कपाळ, हसरा चेहरा, निळेशार डोळे, पिळदार मिशा, पायात बूट, कमरेला रायफल आणि गळ्यात रेडिओ अडवून तो सायकल वरून रोज सैर करत असे .आज त्याची नजर त्याच्या पुढे पुढे धावत होती.
         दुर्गा टेकडी वरून एक मुलगी भराट्याने पलीकडच्या कड्याकडे धाव घेत होती."इतक्या पहाटे या उंच कड्याकडे जाणारी 'ती' कोण असेल?"
          या विचारात कर्नल सुनिलने सायकलीचा वेग वाढवला. तो वळणा पाठोपाठ वळणे ओलांडू लागला. भराट्याने कड्याकडे जाणारी ती मुलगी कोण...? या विचारात सुनिलला ती एका वळणावर दिसायची तर दुसऱ्या वळणावर दिसेनाशी व्हायची. आता ती पुढच्या वळणावर दिसणार.तिच्यामध्ये आणि रिटायर कर्नल सुनिलमध्ये एकाच वळणाचे अंतर राहिले. म्हणून सारा जोर एकवटून सायकला पेंडेल मारू लागला. पाहतो तर त्या वळनावर कोणीच नाही. कुठे गेली असेल ती? याचा विचार समाज सुधारक, राष्ट्र सेवक कर्नल सुनिल करू लागला. घामाघूम झालेला कर्नल सुनिल सायकल वरून खाली उतरला. तिनं ज्या ठिकाणी रस्ता सोडला, त्या पाऊलखुणा वरून तो दुर्गा टेकडीच्या किर्र झाडीत शिरला. परंतू ती कुठेचं दिसेना..? कुठं गेली असेल ती...? या विचारात तो इकडे तिकडे शोधत होता. सर्वत्र शांतता होती. परंतु दूरवर असणाऱ्या नांदुरकीच्या झाडावरील दोन फांद्या जोरजोराने हेलकावे घेत होत्या. घडतं असलेला सारा प्रकार सुनिलने जाणला. आणि त्याने आरोळी ठोकली. आवाज दिला."कोण आहे रे तिकडे...? खाली ये.".   
       त्याची ही आरोळी ऐकून झाडावर चढलेली ती मुलगी घाई घाईने खाली उतरली. व मान खाली घालून गुन्हेगारा प्रमाणे थरथर कापत कर्नल सुनिलच्या समोर येऊन उभी राहिली. तरुण मुलगी होती. तिची पाचावर धारण बसली. कर्नल सुनिलने त्या मुलीला नखा पासून ते डोक्यापर्यंत न्याहळले.कमरेला लटकवलेली रायफल काढत तो गरजला...
" कोण  तू...? पौर्णिमेच्या रात्री कुठे चालली? नाव काय तुझं..?" 
        अंगाचा थरकाप झाला. तिची बोबडीच वळली.   गुन्हेगाराप्रमाणे ती कर्नल सुनील पुढे उभी राहीली. तिला कर्नल सुनीलचा आवाज ओळखीचा वाटला.  पाहते तो कर्नल काका अरे बापरे...!!!ती फारच घाबरली. आता आपल्या घरी सारं-
सारं कळणार...!तिच्या पाया खालची जमीनच सरकली...!काय करावे ते कळेना?  तिला वाटलं आता या ठिकाणीच शरीरातले प्राण निघून जावेत.  सुनील कर्नलच्या पराक्रमाच्या शौर्यगाथा तिने ऐकल्या होत्या...देशसेवेतून निवृत झाल्यापासून समजाची सेवा करणारा कर्नल सुनिल पंचक्रोशीमध्ये प्रसिध्द होता! समाजातील कोणती ही समस्या असो ती सोडवण्यासाठी धावणारा. या विचारात ती स्तब्ध होती. पुन्हा सुनीलने आवाज चढवून विचारले तुझं नाव काय?
        ती थरथरत्या ओठांनी,"सोनाली"
"कोणाची?"
बऱ्याच वेळानं अडखळत "मी s मीss बाबूशेठ मारवाड्याची", तू बाबुशेठ मारवाडयाची
"इतक्या पहाटे एकटी कुठे चाललीस? इकडे लोक या कड्यावरून जीव देण्यासाठी येतात."
असे म्हणताच, ती त्याच्याकडे डोळे विस्फरून पाहू लागली. तिचं अधिकच त-त-प-प झालं. तिला काय बोलावं सुचेना...! अगोदरच रडवेली झालेली ती धाय मोकलून रडू लागली.   
           कर्नल सुनीलने सायकल बाजूला ठेवली. व तिच्या जवळ गेला; पण जरा दूरूनच तिच्याशी बोलू लागला. काय झालं? " 
"का रडतेस?
 एकाच वेळी अनेक प्रश्नांनी ती भांबावून गेली. 
         कर्नल  बाबूशेठच्या आनंद किराणा स्टोअरच्या दुकानात जात असे.  बाबूशेटच्या दुकानातून किराणा माल घेत असे.त्यांचे घरोब्यांचे संबध होते. तिला असे पौर्णिमेच्या रात्री एकटी दुकटीला पाहून कर्नल विचारात पडला.व सोनलीला धीर देत कर्नल सुनीलन तिला विश्वासात घेत विचारलं. "तू इकडे इतक्या पहाटे का आलीस?"
        सोनली भीत भीत बोलत होती. सांगता सांगताच ती धाय मोकलून रडू लागली. कर्नल सुनील कथा कादंबरीतील कथानका प्रमाणे घडणारा अनोखा प्रसंग थक्क होऊन ऐकत होता.        
तिला धीर देत शांत करत कर्नल सुनीलन तिला विश्वासात घेत विचारले. "तू इकडे इतक्या पहाटे का आलीस?" आता जरा ती स्थिरावली...! मोठ्या मुश्कीलीन मनाचा एक एक पदर उलगडू लागला. 
"काय सांगू ...?" 
"सांग ,बोल काय झाल? तू, असा टोकाचा निर्णय..."


"तसं काही नाही..."
  "मी समजलो नाही?"
 ती काही तरी लपवतं होती.
"सांग, घाबरू नको."
“मला रात्र रात्र झोप येत नाही. डोक अगदी पिंजून जात. वेड लागायची पाळी आली आहे . हे जीवन संपवून टाकावं असं मला सारखं वाटू लागलं आहे.” बोलता बोलताच ती स्तब्ध झाली.
   "अगं, पण असं का वाटतं. तू बिनधास्त सांग.” कर्नल सुनील अवाक होऊन तिच्याकडे पाहू लागला. सोनालीची आणि त्यांची दुकानाच्या निमित्तानं नेहमी गाठ भेट होत असे.अगदी बालीश लाडिकपणे बोलणारी गोबऱ्या गालाची, टपोऱ्या डोळ्यांची, अटकर बांध्याची, तीक्ष्ण नाकाची, लांबसडक रेशमी केसांची, सैलसर वेणी, गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली ही सोनली तिच्या बोलण्याने खूपच मोठी वाटू लागली. बाबुशेठ नेहमी म्हणायचे "सोनलीला असं सासर पाहू ज्या ठिकाणी सोन्याचा धूर निघत असेल. अशी गुणी आहे.खूपच देखणी आहे आमची सोनली". हे बाबूशेटचे बोल आठवले.या विचारातचं कर्नल सोनलीच बोलणं कान देऊन ऐकत होते.
     "तो रोज माझ्या शाळेच्या जाण्याच्या रस्त्यावर उभा असायचा काही बोलत नव्हता. नजरा नजर झाली की फक्त हसायचा. तो हसला की त्याच्या चेहऱ्याचा रुबाब वाढायचा. आणि मला ते आवडायचं ही.चार महिने झाल्यावर एके दिवशी तो दिसलाच नाही. दुसऱ्या दिवशी नाही. दुसऱ्या दिवशी माझी नजर सतत त्याला शोधत होती. माझं बी ए च वर्ष..! अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. सारखा त्याचाच विचार करत होते.असं का होते माझं मलाही कळत नव्हतं. आणि मग अचानक दोन महिन्यांनी मला तो दिसला.
     मला पाहिल्यावर तो हसत पुढे आला . हातातलं गुलाबाचं फुल मला देत म्हणाला,"हॅपी बर्थ डे सोनू..! मला तुझी फ्रेंडशिप हवी आहे. मी त्याच्या हातातलं फुल अगदी आनंदाने हसत हसत घेतलं. त्यानंतर त्याच्या बरोबर चालायला लागले. वेळ घालवू लागले. ते सारं जणू स्वप्नासारखं होतं. एखाद्या हिंदी चित्रपटा सारखं घडत होतं. माझा बर्थडे याला कसा माहीत ? याचा विचारही मी केला नाही. मी माझी राहीलेच नव्हते. तो जे सांगेल ते ऐकत होते.तो जे सांगेल ते करत होते.
मध्येच सोनलीचे बोलणे तोडत कर्नल ,"हे सारं बाबूशेठला माहीत आहे?"
"हे सारं मम्मी, पप्पांच्या परस्पर चाललेलं होतं काका. त्यांना यातलं काहीही ठाऊक नाही ."
“ हे तू मम्मी पप्पांना का सांगितलं नाही?”
“पप्पा फार कडक स्वभावाचे; आम्ही सारे त्यांना घाबरून असतो.माझे मोठे बाबाजी ही त्यांना घाबरतात. 
          सोनलीचे डोळे विलक्षण भावूक झाले होते.आता ती जरा मनमोकळेपणाने बोलू लागली. मम्मी-पप्पानां माझ्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळचं नसे. परंतु शाळेतील चाचणी परीक्षेचा निकालावर पप्पांच बारीक लक्ष असे. प्रत्येक पेपर ते नीट वाचत आणि झालेल्या प्रत्येक चुकांकरीता मला शिक्षाही ठरलेली. 
           त्या नंतर खूप अभ्यास करून चांगले मार्क मिळवले तरी पप्पा कौतुक करीत नसत. त्यांना माझ्याकडून अपेक्षा 97 टक्क्यांची आणि मार्क मिळाले 92% सगळे नाराज..! मनात निराशा अगदी मी

पाचवी सहावी पासून फक्त पुस्तक, प्रश्नसंच, एक्स्ट्रा क्लास, व्हेकेशन बॅच एवढ्याच भोवती जगत आले आहे काका...! या साऱ्यांचा मला कंटाळा आलाय. एवढं करताना रात्री झोप लागू नये, म्हणून कधी चावळ खाल्ले नाहीत.  भुकेपेक्षा एक फुलका कमी खायचा. पप्पा म्हणायचे 'उनोदरी' तप कर. तर तुझी अभ्यासात अजून प्रगती होईल .कधी कोणाच्या घरी जायचं नाही. बाबाजीं, बडीमॉ बरोबर मला फारसे बोलू दिले नाही. रात्री उशिरापर्यंत अभ्यास आणि पहाटे चारला उठण्याचा गजर…! एवढं सगळं करुन त्यांच्या अपेक्षेपेक्षा थोडेसे मार्क कमी पडले की  नाराजी….!! कौतुक कसलेच नाही कारण ते म्हणतात, अशा कौतुकाने मुलं बिघडतात. असं त्यांचं ठाम मत होतं. या गोष्टींना मी कंटाळले होते.”
" पुढे काय झालं..?" 
“पप्पा सकाळी उठले की सामाईक करून नवकारसी  करून दुकान गाठायचे. एकदा माझ्या शाळेच्या बॅगेमध्ये अश्लील चित्रांचे पुस्तक कोणी तरी खोडसाळ पणे ठेवलं.ते मला माहीत नव्हतं.आणि ते पप्पांनी पाहिलं. मला खूप मारलं. मला खूप ओरडले.माझ रडणं थांबल्यावर पप्पा स्वतःला दोष देत मला म्हणाले, घराण्याला तू काळीमा फासत आहेस.हे मी सारं सहन करत होते.आता मला हे सारं सारं नको नको झालय कर्नल काका".
कर्नल, "अगं पण" 
पण कर्नलचं काहीही न ऐकता ती पुढे बोलतच राहिली.“बरं का काका, मम्मी  पप्पांचा डबा घेऊन दुकानात जायची. मी आपली शाळा, कॉलेज करत, कधी मधी पप्पांना ही दुकानात मदत करायचे. परंतु कामा शिवाय घरात संवाद नव्हता. फक्त  सोनाली जेवून घे, अभ्यास कर, टीव्ही फार पाहू नको. या सूचना...! आज किती गिऱ्हाईक झालं. किती पैसे मिळाले. दुकानात जाण्यापूर्वी, तेच दुकानातून आल्यावर तोच...संवाद! सारं जीवन, जगणं पैशा भोवती फिरत आहे असं मला वाटतं.    
मला शेअरिंग करणार, केअरिंग करणार असं हवं होतं . पण ते मला घरात मिळत नव्हत. त्याचवेळी नेमका  देखणा तरुण अहमद माझ्या जीवनात आला.आणि मला वेगळीचं अनुभूती आली. अल्प काळातच मी त्याच्या बरोबर त्याच्या सांगण्यानुसार वागू लागले. वाटलं नव्हतं असं काही घडेल. 
        हे सांगताना जेमतेम एकोणीस वर्षाची ती तरुणी भाव विवश होऊन कर्नल सुनीलला सांगत होती. बोलताना सुद्धा आता तिचा चेहरा लाल झाला होता.  सांगता सांगता एकदम ब्रेक लागावा. तशी ती थांबली चेहऱ्यावरचे ते सगळे भाव पुसट झाले. जखमी डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. तिने आपला चेहरा ओंजळीत लपवला  गदगदून रडू लागली. 
"काका तुम्ही दुकानात येता. तेव्हा पप्पांच्या बरोबर गप्पा मारताना बऱ्याच वेळा पाहिले तुम्हाला मी...!यातलं काही माझ्या पप्पांना सांगू नका. प्लीज... मला आता जगणंच नको झालंय."
"पण का...!तुझे पप्पा तर किती चांगले आहेत .!!"
“पप्पांच घरातलं वागण आणि बाहेरच्या लोकांबरोबरच वागणं यात खुप अंतर आहे.माझे दादाजी नेहमी त्यांना म्हणायचे,बाबू म्हणजे घरच्यांचा काळ आणि बाहेरच्या साठी प्रतिपाळ...!"
कर्नल सुनील विचार करु लागला, 'अरे चांगल्या घरातले बाबूशेठ कोणाच्याही मदतीसाठी धावून जाणारे;परंतु घरात ही स्थिती जगण्यातले एकांगी आचार जेव्हा सर्वां च्या मनाचा विचार करत नाही, तेव्हा या  वयामध्ये सुन्न रितेपणा  व्यापतो.! मनातील कोवळीक मरते. ही कडवट निराशा मनात घर करते. विषण्णता, राग, भीती, संताप आणि या ही पलीकडे जाऊन आपण एकटे पडल्याची भीती मनामध्ये व्यापून छोट्या ठिणगीची ज्वाला कशी होऊ शकते...! याचे हे उदाहरण याचा विचार करत करत सुनिल कर्नल तिच्याशी बोलत होता. 
         "तू घाबरू नको.  तुझ्या पप्पांची एकुलती एक मुलगी तू ,तुझ्यासाठी लाखो रुपये खर्च करून तुला उच्च पद्धतीचं जीवन जगता यावं यासाठी सतत प्रयत्न करणारे बाबुशेठ मला ठाऊक आहेत. हा संवाद चालू,असतानाच तिचा आवेग ओसरल्यावर भानावर आली. जरा थांबली आणि पुन्हा सांगू लागली.               
          “अहो..! तो असं काही करेल असं मला कधीच वाटलं नाही. असा का वागला तो माझ्याशी...?मी त्या अहमदचा काय गुन्हा केला होता?”
         तिला बोलवेना, नव्या उमाळ्यांन पुन्हा रडू लागली. 
“मला नीट सांग सोनली अगं परीक्षेतील यश अपयश म्हणजे जीवनाच अंतिम ध्येय नाही.खरं तर आनंदी जगण्याचं शिखर त्यापुढे आहे.”
"तेच तर सांगते".
मी माझ्या जीवनात अहमदला वेगळ स्थान दिलं होतं.आता सारं सारं संपलं...!ती पुन्हा रडू लागली.
           कर्नल, तू रडू नको मला नीट सांग,  अहमदला शेवटची केव्हा भेटली होती.?
  थोडं थांबून, "परवाचं मला  हॉटेलमध्ये घेऊन गेला होता ."
 " कोणत्या हॉटेलमध्ये" "सावली"
 पुन्हा तिचे डोळे भरून आले, "नाही नाही मी असलं अघोर कृत्य कधीच करणार नाही.मी डॉ. मंजूश्रीजी गुरु महाराज साहेबांकडून सप्त कुव्यसनांची शपथ घेतली आहे. 
 नाही.. नाही... असली हिंसा मी कधीच करणार नाही.माझ्याच वाट्याला हे काय..! असलं...!!मी काहीही करणार नाही ?"
   "काय करणार नाही सोनाली?"
    बऱ्याच वेळानं मान खाली घालून उभी असणारी सोनली अगदी क्षीण आवाजात ,”मी आई होणार आहे. हे मी त्याला सांगताच त्यांने मला नाकारलं व मला नॉनव्हेज खाण्यास  प्रेरित केलं. तू नॉनव्हेज खात असशील तरच मी तुझ्याशी लग्न करेल. मी मोठ्या पेचप्रसंगात सापडले हो...हे सांगता सांगताच तिला बोहळ आली आणि ती खाली पडणार हे कर्नलच्या लक्षात आलं, तो गोंधळला.आणि पळत जाऊन तिला त्यांन अलगद हातावर झेललं.
दुर्गा टेकडी वरील सिक्युरिटीला फोन केला. तुरंत ॲम्बुलन्स  मागवली. बेशुद्धावस्थेत असणाऱ्या सोनलीला वाय सी एम हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले.तिच्यावर उपचार सुरू झाले.

मग घरी फोन केला.   सकाळी सकाळी कोणाचा फोन ह्या विचारातचं सोनालीच्या मम्मीने गडबडीने फोन घेतला. कर्नल सुनीलने सोनाली दवाखान्यात ऍडमिट केल्याची बातमी तिच्या मम्मीला सांगितली नेहमी प्रमाणे बाबुशेठ सामायिकला बसले होते. आनंद श्रावका प्रमाणे ऐकाग्रतेन ते नेहमी सामायिक करत. त्याचं भक्ताम्बर स्तोत्र पठण चाललं होतं.
सोनालीची मम्मी खूप घाबरली होती. पती बाबुशेठला ही गोष्ट सांगण्यासाठी सरसावली, परंतु ध्यान साधनेत बसलेल्या बाबुशेठ अगदी एकाग्र होऊन भक्ताम्बर पठण करत होते. सोनलीच्या मम्मीची तगमग चालली होती. तिला काही सुचत नव्हते. सोनली दवाखान्यात गेली कशी? रात्री तर ती तिच्या बेडरूम मध्ये होती? काय झालं असेल...? हे सारे जाणून घेण्यासाठी, तिला पाहण्यासाठी तिच्या जीवाची तगमग चालली होती;परंतु ध्यानमग्न बाबू सेठ सामायिक झाल्याशिवाय उठणार नव्हते. हे सोनलीच्या मम्मीला ठाऊक होते. काय करावं तिला कळेना... तिने मोठे जेठजीसा कांतीलालजीना फोन केला. 
सोनलीच्या पप्पाची वाट न बघता जेठजीसां बरोबर दवाखान्यात गेली .
सोनलीची अवस्था पाहून त्यांच आंतरिक मन हेलावून गेलं. आर्त डोळ्यातील कडांवरून ओघळणाऱ्या संवेदनांनी सोनालीला कुरवाळत आपल्या स्पर्शाने जपलेल्या माय-लेकीच्या नात्याच्या ऊबेमुळे हलके हलकेच सोनाली हळू हळू शुद्धीवर येऊ लागली . आणि मध्येच बडबडत होती. "मम्मीss-पप्पां-आ--ना काय --? मधेच ओरडत होती नाsही नाssही . पुन्हा शांत...!"
 काय झाले ते कळायला मार्ग नव्हता.
" बोल..सोनाली  मी तुझी मम्मी बोलते."
सोनाली पुन्हा शांत झाली.
सर्वत्र निशब्द शांतता पसरली.
कर्नल बाहेरच व्हराड्यात बसले होते.
सोनालीची मम्मी बाहेर आली.कर्नल व कांतिशेठचा म्हणजे तिच्या बाबाजीचा संवाद चालला होता त्याचा सोनालीच्या मम्मीने कानोसा घेतला,
        " सोनाली मला सांगत होती, सोनाली ची मम्मी ऐकत होती.
सोनाली, "त्याला मी सांगितलं होतं माझ्या बरोबर राहायचं असेल, तर तुला मांसाहार सोडावा लागेल.तेव्हा तो हो म्हंटला...!आणि आता...तो मला हे जमणार नाही असं म्हणतोय .
           मला नाही जगायचं...!,मम्मी-पप्पां सारखे भांडत असतात. माझ्यासाठी वेळ नाही त्याच्याकडे.माझी काळजी घेणाऱ्या दादीजीना दादाजीना ही बाबाजीच्या इथे ठेवल.म्हणे दुकानत जाव लागतं मम्मीला...! हे दोघ ही म्हातारे असल्यामुळे थकले आहेत.त्याना त्याचं काम होत नाही ,मी करत होते त्याची कामे पण...!तिला परत भरून आलं. मला जगावस वाटत नाही. मला सर्वाची भिती वाटते.
हे ऐकून हाताश झालेले कांती शेठ,”आमच्या बाबून कोणाचं कधी ऐकल का? मी तर त्याच्या स्वभावाला कदरलो आहे ."
 हा सारा संवाद सोनालीची मम्मी  ऐकत होती..!           
" कर्नल, अहो कांतीशेठ! पैसा म्हणजे सर्वस्व नसतं. बॕकेच्या बॕलन्सनं उतम जगण्याचा बॕलन्स सावरता येत नसतो..! अंधारमय परिस्थितीमध्ये आधार देण्याचे काम घरातले बुजुर्ग करत असतात. परंतु पैसा कमावण्याच्या मागे धावणाऱ्या बाबुशेठचं हे वागणं जीवनाला एकाएकी बनवतय. असं मला वाटतं बरं का.”
विचार मग्न असणाऱ्या कांतीशेठची तंद्री भंग करत कर्नल जैन, “अहो ऐकतय ना, कांतीशेठ.”
“हो ना अगदी लहानपणापासून  हे आमचे छोटे बंधू बाबूशेठ, या बाबून सर्वानाचं नको नको केलयं.तेच आता सोनालीच्या बाबतीत...!आज सोनाली जगण्या मरण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे....!"
“कर्नल सुनील ,हे सार माझ्या लक्षात आलं आहे.आपण यातून मार्ग काढू, अगोदर तिला सावरायला हवं.बाबुला विश्वासात घेऊन सांगायला हवं. तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या सोनालीला आपण परमपूज्य डॉ मंजुश्रीजी महाराज साहेबांकडे घेऊन जाऊ. त्यांच्यावर आम्हा सर्वाची अगाध श्रद्धा आहे. ते योग्य मार्ग दाखवतील.
        “ खरोखर वयात येताना, वयात आल्यावर प्रत्येकाच्या मनात एक राजकुमारी ,एक राजकुमार आकाराला येत असते. तारुण्याच्या श्वासाचा रंग,गंध त्या वेळेला असतो. दैनंदिन वाटचालीत पैशाच्या मागे धावणाऱ्या परिवारामध्ये एखाद्या मुलीला,अनोळखी व्यक्ती भेटते व ती व्यक्ती आपल्या मनातील राजकुमार..! त्या व्यक्तीसाठी आता आपलं सगळं जीवन...!!! याची मनोमन खात्री वाटायला लागते. परंतु जेव्हा या परिकथेतील राजकुमार स्वप्नांच्या रंगाऐवजी त्याच्या जगण्यांतले  अनैतिकतेचे रंग दाखवू लागतो. तेव्हा पायाखालची जमीन हादरू लागते. कांतीशेठ..!कुठे आहात तुम्ही..? जर मी वेळेत पोहोचलो नसतो तर आज काय झालं असतं...?” 
हे सारं सोनालीची मम्मी रूमच्या बाहेरून ऐकत होती.
        कर्नल जैन, “ कांतीशेठ ही तुमची दौलत..!अहो..!कांतीशेठ आपण मुलांच्या बाह्य गरजा पूर्ण करू  शकतो. त्यांच्या आतल्या उर्मीचं काय? पोरीकडून  तुमच्या अपेक्षापूर्ण करण्यासाठी , संपत्ती कमवण्याच्या नादात  काय घडणारं होतं ...! तुमच्या अपेक्षेपेक्षा मिळालेले कमी गुण असोत किंवा नापास होत म्हणून का जीवन संपवण्या चे विचार डोक्यामध्ये यावेत घरातील विवाद आपण सुसंवादाने जगणं सुसह्य करू शकतो समजूतदार पालकांचा मित्र स्पर्श या मनस्थितीमध्ये खूप महत्त्वाचा ठरतो.
सैरभैर झालेले बाबूशेट निशब्द होत पुटपुटत होते "काय सांगू  
धरलं तर चावतयं सोडलं तर पळतयं ...!"
-------------------------------------
जैन श्वेतांबर  समाजातील काही विशिष्ट शब्दांचे अर्थ--------------------
* भक्तामर स्तोत्र : यामध्ये 24 तीर्थंकर यांच्या गुणांची स्तुती केली आहे .
* चावळ:  भात 
* उनोदरी  तप :  तपाचे बारा प्रकार आहेत. अंतरिक तप व बाह्य तप यातील एक उनोदरी तप आहे. म्हणजेच भुके पेक्षा दोन घास कमी खाणे.
* सामायिक : समता भाव ठेवून 48 मिनिटे एकाग्रपणे  आराधना करणे.
* नवकारशी : सूर्योदयानंतर  48 मिनिटांनी अन्न जल ग्रहण करणे.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!