क्रांतीदर्शी भगवान महावीर- लेख
*भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त*
*प्रश्नांन घेरलेल्या वर्तमानाच्या उकलिस क्रांतीदर्शी भ.महावीर*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
जीवनामध्ये एक असते पुस्तकातील प्रश्नांची परीक्षा आणि दुसरी असते जगत असताना निर्माण होणाऱ्या प्रश्नांची परीक्षा. या दोन्ही प्रश्नांना आणि परीक्षांना जर योग्य रीतीने जोडलं तर खऱ्या अर्थानं आपलं जीवनाचं गाणं संगीतमय झाल्याशिवाय राहणार नाही असं भगवान महावीर स्वामींनी आपल्या आगमग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे.
परंतु आज सामाजिक परिस्थिती सामाजिक स्थित्यंतरा मध्ये स्वतःचा सूर स्वतःला सापडता कामा नये अशा विचित्र जाहिराती आणि अश्लील शब्दाची उधळण करणारी उथळ गाणी, हिडीस शारीरिक हालचाली,निसर्गाला ओरबडणं हे सार पाहत असताना आठवण येते ते संयम धारी मितभाषी आणि त्यागी अशा भगवान महावीरांची ...!
सध्या चाललेला ट्रेड म्हणजे ऑल इज वेल म्हणून अशुद्ध वातावरणास अधिक बेशुद्ध करण्यासाठी हे गुंगीच औषध तर नाही ना? असा विचार मनाला शिवून जातो. हे सगळं हिडीस चाललेल असताना सारं काही ठीक आहे. बरोबर आहे.ऑल इज वेल आहे. हे म्हणताना जेव्हा विद्यालयातील मुलं तरुण-तरुणी मोकाटपणे शाळा, कॉलेज, स्कूल सोडून मॉलमध्ये भटकतात, फुडमालमध्ये सतत अचरबचर खात असतात. डोळ्यासमोर मोबाईल घेऊन ऑल इज वेल हे ऐकताना त्रास होतो. विचार आणि आचारांचं नियमन करणारा कोणी ईश्वर नसतो तर हे माणसानेच कालमानाप्रमाणे घडवून आणले आहे. तेव्हा कालपरत्वे त्यामध्ये परिवर्तन होणे गरजेचे. यासाठी भ. महावीरांनी दिलेला जगण्याचा महामंत्र म्हणजे “अहिंसा परमो धर्म” व जगा आणि जगू द्या. वनस्पतीमध्ये सुद्धा जीव असतो याची जाण आणि भान देणारे त्यांचे हे निरीक्षणातून केलेले परीक्षण हे सद्यस्थितीला फार महत्त्वाचे वाटते.
भगवान महावीर स्वामींनी साडेबारा वर्ष निसर्गाच्या सानिध्यात राहून मौन साधना करून काढलेले निष्कर्ष विज्ञानाच्या कसोटीवर घासून पाहिले असता,त्यांनी काढलेले निष्कर्ष थक्क करायला लावतात.त्यावेळी न बोलता ही होणारा त्यांचा संवाद तो निसर्गातील प्रत्येक घटकाशी किती संवेदनात्मक होता. हे लक्षात येते. तो संवेदनाशील काळ मागे पडू लागला. आता खूप बोलूनही काळीज न हेलावणारा काळ आला आहे. माणसं कुठं ई-मेल,कुठे चॅटिंग, कुठे एसएमएस, कुठे फोनवरून बिन चेहऱ्याने बडबडताना दिसतात. बोटांनी बटनांचा खेळ म्हणजे संवाद असतो का? त्यांची सोबत होत नाही. साथही मिळत नाही .फक्त भरून उरलेले एकाकीपण आहे असं वाटतं. संवाद हरवत चालला आहे. कारण संवाद प्रेम ,माया, वात्सल्य यातून काय मिळणार? या भावनांवर जगता येणार का? असा प्रश्न विचारणारा बुद्धीवादी वर्ग निर्माण झाला.या वर्गाच्या हाती प्रसारमाध्यम,उद्योगधंदे. गुंठेवारीने पैसा कमावून अल्पकाळात गुंठापती होणं यामुळे कळसुत्री बाहुल्याप्रमाणे माणूस मिथ्या, पैसा सत्य वाटू लागला आहे.
भगवान महावीरांच्या काळातही दास दासींचे बाजार भरविले जात होते. या बाजारात निराश्रीत, बलात्कारीत,विधवा स्त्रिया पशु प्रमाणे विकल्या जात होत्या. जैन ग्रंथातली चंदन बालाची कथा खूप बोलकी आहे.
निराश्रीत, निरपराधी चंदनबालाला तिच्या सत्वशील वागणुकीने 36 हजार साध्वींचं प्रमुखा बनवून एक सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम भगवान महावीरांनी केलं.हा आदर्श आता या स्थितीला फार महत्त्वाचा आहे. भगवान महावीरांनी त्या काळातील दिनदुबळ्यांना सहृदयतेने कसा हात दिला हे या ऐतिहासिक सत्य घटनेतून स्पष्ट होते. स्त्रीला वस्तू न मानता तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. समाजातील पुरुषाच्या बरोबरीचे स्थान मिळावं हे त्यांनी आपल्या आचार विचारातून दाखवून दिले. स्त्री पुरुष विषयात समान भूमिका घेणारे भगवान महावीर क्रांतीदर्शी होते.
आजची स्त्री भावना व कर्तव्य त्याचवेळी अर्थार्जण,करिअर, व्यक्तिगत-कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक बांधिलकी अशा कोंडीत सापडली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी स्त्री स्वतंत्र्य, पुरुष स्वतंत्र्य अशा दोन वेगवेगळ्या धारणेपेक्षा विकासाचे व क्षमतांना पूर्ण संधीचे अवकाश महत्त्वाचे. कारण माणसाचे ती असणे व तो असणे हे बाह्य शारीरिक दृष्टिकोनातून विचार करण्याच्या पलीकडे व्यक्तीने स्व असणे महत्त्वाचे. ..!त्या स्वला जपणे म्हणजे समाजाचा संपूर्ण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून विकासाचे पाऊल उचलणे होय..!
तुम्हा सर्वांना ठाऊक आहे जमिनीत बीज लावताना आजूबाजूला तण उगवतेच ते तण काढून टाकत बीजाची चांगली रुजवण करणे, ही क्रिया सातत्याने करत गेल्यास, चांगल्या विचारांचे, चांगल्या आचारांचे,संस्कारक्षम बीज रुजल्याशिवाय राहणार नाही. आणि तणा सारख्या अनेक समस्या दूर करण्यासाठी सम्यक्त्व मग ते ज्ञान असो, दर्शन असो वा चारित्र्य असो प्रश्नांन घेरलेल्या वर्तमानाच्या उकलिस क्रांतीदर्शी भ.महावीरांची विचाराबरोबरच आचारांची कृती महत्त्वाची...!
प्रा. सुरेखा प्रकाश कटारिया मा. उपप्राचार्य
आनंद” सर्वे नंबर 60/ 1 /A बिजलीनगर, चिंचवड ,पुणे.
मोबाईल नं.9822745030 ,Email ID : katariyasurekha@gmail.com