निरामय जगण्याचा महामंत्र अनेकांत भगवान महावीर

महावीर जन्म कल्याण २०२४ निमित्त भगवान महावीरांची विचारधारा
         निरामय जगण्याचा महामंत्र…अनेकांत …! 
               निरामय जगण्याचा महामंत्र म्हणजे अनेकांन्तातील आत्मबोध...! 
जैन संप्रदायातील सर्व पंथ, उपपंथ तीर्थंकरांना वितरागी म्हणून संबोधतात,म्हणजेच ज्यांची क्रोध, मान, माया, लोभ कषायपासून मुक्त होऊन निर्विकारी झालेले असतात. अशा 23 तीर्थंकराची परंपरा घेऊन आलेले चौविसावे तीर्थंकर भगवान महावीरांचा  जीवन काल इसवी सन पूर्व ५९९ ते इसवी सन पूर्व ५२७ असा ७२ वर्षांचा होता. 
                दुधाचे दही लावून दह्याचं मंथन करता करता अवचित त्यात लोण्याचा गोळा  यावा. अगदी तसच यशाचं, पुरुषार्थाचा असतं. नुसतं दही कधीच लोणी नसतं. त्यात लोणी आहेच; परंतु ते मंथावं लागतं. हे दही मंथवत असताना त्यासाठी घेतले जाणारे श्रम खूप महत्त्वाचे.! ही भगवान महावीराच्या प्रणालीतील पुरुषार्थाची विशेषता होती. 

     अनेकांत हे भगवान महावीरांच्या विचारधनातील मौल्यवान रत्न आहे. भ. महावीरांनी मानवी कल्याणासाठी जगाला दिलेली ही एक अनमोल देणगी आहे. जगत असताना अनेक गुंतागुंतीच्या समस्येविषयी विधायक विचार करायला लावणारी अद्वितीय अशी ही जीवनशैली आहे. सक्षम, कुशल जीवन कसे जगावे, याचा वस्तू पाठ देणारी ही आदर्श विचार पद्धती होय. 
        पहिले तीर्थंकर ऋषभ देवापासून श्रमण परंपरा सुरू झाली. श्रमण परंपरा ही अति प्राचीन परंपरा या परंपरेचे अवसर्पिणी काळातले आद्य पुरुष प्रथम तीर्थंकर ऋषभदेव, यासाठीच त्यांना आदिनाथ म्हटले जाते. भोग भूमीचे रूपांतर कर्मभूमीत करणारे पहिले श्रमण त्यांचीच परंपरा पुढे तेवीस तीर्थंकरंनी चालविली. चोविसावे तीर्थंकर  महावीर स्वामी व त्यानंतर आचार्य, उपाध्याय, साधू,साध्वी यांच्या नेतृत्वाखाली आजही ती श्रमण परंपरा अखंडपणे चालत आहे. 
मानवतावादी विचारधारा, हिंसेचा त्याग, अहिंसेचा अंगीकार करणारी दया, क्षमा, सहिष्णुता, समता, बंधुता अशांना धर्म मानून त्याचा स्वीकार करणारी ,विपरीत प्रवृत्तींना अधर्म मानून नकार देणारी, श्रमधारा ही मानवतेला फुलवणारी विश्वधारा होय. 
भ. महावीरांचा पुरुषार्थावर म्हणजेच उद्यमशीलतेवर भर होता. 
       सन पूर्व पाचव्या शतकात पतंजली ऋषींनी त्यांनी लिहिलेल्या  पातंजल- दर्शन या ग्रंथात अष्टांग योग सांगितलेले आहे. त्यातील पहिल्या 'यम' या योगात  भगवान महावीरांच्या विचारसरणीतील तो कार्यकारण भाव अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य,अपरिग्रह याचा अंतर्भाव केलेला आहे.
चंदनासारख्या सत्शील  राजकुमारीला भोगावे लागलेल्या दुःखाची कणव वाटली  म्हणूनच चंदनाला भ. महावीरांनी शिष्याच्या स्वरूपात स्वीकार करून एक अपहरण झालेल्या राजकन्येचा उद्धार केला आणि चंदनबालांना भगवान महावीरांनी छत्तिस हजार साध्वी संघाची प्रमुखा बनवले.यावरून लक्षात येते दीनदुबळ्यांना सृदयतेने भ. महावीरांनी मदतीचा कसा हात दिला. 
        युवा पिढी सतत प्रश्न विचारत असताना ,प्रामुख्याने विचारला जाणारा प्रश्न म्हणजे  स्त्री साध्वींचा आचार्य पदासाठी विचार का केला जात नाही? आचार्य पदासाठी साध्वींचा अभ्यास झालेला असताना सुद्धा, क्षमता असताना सुद्धा त्यांना आचार्य पद दिले जात नाही. ती खूप मोठी जबाबदारी असते असं उत्तर त्यांना दिला असता त्या युवा पिढीचा आलेले हे प्रतिउत्तर; राजकारणामध्ये स्त्री महिला पंतप्रधान होऊ शकते. राष्ट्रपती होऊ शकते, मग ती धार्मिक क्षेत्रातील आचार्य पद का सांभाळू शकत नाही  या प्रश्नानं समाज व्यवस्थेची विषमता लक्षात येते . कारण त्या काळामध्ये भ. महावीरांनी छत्तिस हजार साध्वींचं प्रमुख पद चंदनबालाला दिलं होत.अशा अपहृतेला जीवनात सुखाबरोबर पुन्हा प्रतिष्ठा लाभावी  म्हणून या महापुरुषांनी साध्वी संघाची द्वारे तिच्यासाठी खुली केली. ही मानव जीवनाची सार्थकताच नव्हे का? या मुद्द्याचं चिंतन होणं खूप महत्त्वाचं. ..! 
               भ. महावीरांची विचारधारा परिवर्तनवादी होती. जगत असताना  निर्माण केलेले विचार, आचार, नियम कोणी परमेश्वराने बनवले नाहीत. तर कालमान लक्षात घेऊन ते माणसांनीच केले आहेत.तेव्हा काल परत्वे त्यात बदल करणे महत्त्वाचे...!स्त्रीला वस्तू मानू नये. तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. समाजात तिला पुरुषाच्या बरोबरीने स्थान असावे.साधुनी स्त्रीसंग व साध्वीनीं पुरुषसंग निषिद्ध मानावा. तसे समसमान सत्वशील आणि स्वत्वशील आचरण ठेवावे. संसारी  स्त्री- पुरुषांनी उपभोगात संयम पाळावा .अशी स्त्री- पुरुष विषयात समान भूमिका घेणारे क्रांतीकारी भ. महावीर होते.

भ महावीरांनी श्रुती, मती, अवधी, मन:पर्याय व केवळ ज्ञान असे ज्ञानाचे पाच प्रकार विशद केले आहेत. शब्दाच्या सहाय्याने मनाच्या द्वाराचे ज्ञान होते ते श्रुती ज्ञान. इंद्रिय आणि मन यांच्या साह्याने होणारे ते मती ज्ञान.इंद्रिय व मन यांच्या  शिवाय आत्म्याद्वारे होणारे ज्ञान ते अवधी ज्ञान. दुसऱ्याच्या मनातील जाणणे म्हणजे मन:पर्याय ज्ञान या चार प्रकारचे ज्ञान महावीरांना जन्मताच होते असे मानले जाते सर्व कोष ज्ञान म्हणजे केवल ज्ञान हे ज्ञान त्यांना ऋजूबालिका नदीच्या किनारी प्राप्त झाले.

        विश्वाच्या प्रयोग शाळेतील महान वैज्ञानिक भ. महावीर होते. कारण बारा वर्षे, सहा महिने, पंधरा दिवस या प्रदीर्घ कालावधीत भ. महावीर अधिक काळ निसर्गाच्या सान्निध्यात होते. त्यामुळे जीवसृष्टीशी त्यांचा जो संबंध आला त्यातून जे निरीक्षण केले.परीक्षण केले आणि याच अभ्यासातून त्यांनी जे प्रबोधन केले ते आजच्या विज्ञान युगातही आश्चर्यकारक करणारे आहे. भारतीय शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पती विषयी जे शोध लावले. ते भगवान महावीरांनी त्याच वेळी सांगितले. "वनस्पतीत जीव असतो. पाण्याच्या एका थेंबात अनंत जीव असतात" डार्विनच्या उत्क्रांतवादाच्या सिद्धांताचे विचार बीज भ. महावीरांनी विश्वरचनेच्या मुळाशी जीव, अजीव, धर्म ,अधर्म, काल आणि आकाश ही जी षड्द्रव्य आहेत. या एक नव्हे आशा अनेक गोष्टी त्यांनी त्या काळात नमूद केल्या आहेत. भ. महावीरांच्या शोध दृष्टीची व आगाढ विचारशक्तीची प्रचिती येते. 
स्वमतांचा दुराग्रह न धरणारे भ. महावीर यांनी" जगा आणि जगू द्या".हा महामंत्र जगाला दिला.  शांततेचा संदेश देण्यासाठी हा फार महत्त्वाचा आहे. 
आज त्यांच्या जन्म कल्याण दिनानिमित्त भ. महावीरांचा अनेकांत निरामय जीवनाचा महामंत्र  सर्वांसाठीच मौल्यवान ... ! 
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
                       प्रा. सुरेखा  कटारिया
राष्ट्रीय उपाध्यक्ष- श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स 
                                 महिला शाखा, नवी दिल्ली
                         मो नं. 9822745030

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!