भारतीय संस्कृतीत जैन धर्माचे योगदान

*अरिहंत जागृती मंच पुणे*

*भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण निमित्त खुली निबंध स्पर्धा*
*भारतीय संस्कृतीत जैन धर्माचे योगदन*

*लेखन प्रा सुरेखा प्रकाश कटारिया राहणार बिजलीनगर चिंचवड पुणे 33*                     *सर्वे नंबर  60/1/अ*
*मो.नंबर. 9822745030*
----------------------------------------
       महावीर शापत नाहीत. महावीर कोपत नाहीत आणि महावीर आशीर्वाद ही देत नाहीत. महावीर कोंबडा , बकरा मागत नाहीत. नवसाला पावत नाहीत. महावीर चमत्कार करून दाखवत नाहीत. कारण महावीरांना जादूटोणा येत नाही. महावीर सांगतात. चांगलं कर्म करा म्हणजे तुमच्या आयुष्यात चमत्कार आपोआप घडतील. महावीरांना पूजा अर्चा नको आहे.  महावीरांना ढोल ताशे नको आहेत. महावीरांना हत्ती घोडे मिरवणूक काही नको. महावीर सांगतात आत्मचिंतन करा आत्मकल्याण साधा व स्वयंप्रकाशित व्हा...!
महावीर मोक्ष देणार नाही महावीर मोक्ष मार्गदाता आहेत. मोक्षावर जाण्यासाठी आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे. श्रद्धेला भक्तीला शक्तीला महत्त्व देऊन अंधश्रद्धेला फाटा देणाऱ्या भगवान महावीरांचा जीवन काल इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 असा 72 वर्षाचा होता.    
     तीर्थंकर भगवान महावीरांच्या जीवनातील  पाच कल्याणके केवळ त्यांच्याच जीवनासाठी नव्हे तर समग्र मानव जातीसाठी ,सृष्टीसाठी कल्याणपुरक ठरली आहेत. अशीच ग्वाही कल्याणक या शब्दप्रयोगातून मिळते.
  त्यांच्या महानिर्वाणानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून जी कालगणना सुरू झाली, ती वीर निर्वाण संवंत अर्थात वीर संवंत म्हणून संबोधली गेली.
भ. महावीर व महात्मा गौतम बुद्ध हे समकालीन  होते. मनुष्य जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो. हे भगवान महावीरांचे पुरुषार्थवादी दर्शन आपणास होते. असेल हरी तर देईल पलंगावरी असे काही घडत नसते. तर प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेल ही गळे. हे पुरुषार्थामुळेच...! पुरुषार्थ हा महाविरत्वाचा महाकळस तसाच तो महावीर विचारधारेचा महाकलश
सन पूर्व पाचव्या शतकात पतंजली ऋषींनी त्यांच्या योगसूत्र अर्थात पतंजल दर्शन या ग्रंथात अष्टांग योग सांगितलेल्या आहे.त्यातील पहिला यम या आयोगात त्यांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह याचा अंतर्भाव केलेला आहे. भ. महावीरांच्या विचारसरणीतील जो कार्यकारणभाव आहे; याचा अर्थ सत्यांश आणि तथ्यांश मानून  त्यांनी या पाचांचा स्वीकार केलेला आहे.
भ.महावीरांच्या विचारधारेतील सहिष्णुता अभ्यासताना  सत्य बोलावे, प्रिय बोलावे, मात्र अप्रिय सत्य बोलू नये. अशी भ. महावीरांची धारणा व शिकवण होती. आणि त्याप्रमाणे त्यांचे आचरणे होते. शस्त्रापेक्षा शब्द अधिक धारदार असतात व शस्त्रापेक्षा शब्दाने अधिक हिंसा होते .अशी त्यांची या मागची भूमिका  आहे. त्यांनी शारीरिक हिंसे पेक्षा मानसिक हिंसा अधिक भयानक, अधिक घातक मानलेली आहे. त्यामुळे भगवान महावीरांनी कधीही कोणाविषयी अप्रिय शब्द वापरल्याची नोंद जैन व जैनेतर ग्रंथातही सापडत नाही.अखिल मानव जातीने सहिष्णतेची ही पालखी गौरवानं अखंडपणे वाहण्यातच मानव समाजाचं खरं कल्याण आहे. 
दीनदुबळ्यांचे तारणहार भ. महावीर जन्माच्या अगोदरच धर्माचा संबंध जातीशी जोडला गेल्याने त्यांच्या आधीच्या काळापासून सर्व धार्मिक सत्ता ब्राह्मण वर्गाच्या हाती गेली होती. राजा बोले दल हाले. या  उक्तीला अर्थ उरला नव्हता .कारण राजा धर्म मार्तंडाच्या हातातील खेळण होऊन बसला होता. समाजात स्त्रियांची होणारी कुचंबना
तर पराकोटीची होती. स्त्रीला घराच्या उंबरठ्याच्या आत बंदिस्त करून ठेवण्यात येत होते .पायात मणामणाच्या साखळ्या ठोकल्या जात असल्याने समाजाचे अर्धांगच लुळे पांगळे झाले होते. एकीकडे वेदांमध्ये स्त्रीचा गृहलक्ष्मी, गृहसम्राज्ञ म्हणून गौरव होत होताच; तर दुसरीकडे  वेदप्रामाण्य मानणारेच तिला पराश्रीत, अबला, उपेक्षित समजून हिनपणे वागत होते. 'सुगरिणी' ने  अन्न रांधावे व 'सुहासिनी' ने  मुला बाळांना जन्म द्यावा. एवढीच तिची कामगिरी...! याला छेद देण्याचे काम केले  भगवान महावीरांनी केले. 
         भ.महावीरांच्या काळात दासदासींचे बाजार भरविले जात होती. या बाजारात निराश्री, बलात्कारीत, विधवा स्त्रिया पशु प्रमाणे विकल्या जात होत्या. जैन   आगम ग्रंथातील चंदनबालाची कथा खूप बोलकी आहे. 
कसलाही नातेसंबंध नसताना एक सत्शील राजकुमारीने जीवनात भोगलेल्या दुःखामुळे महावीरांना तिची कणव वाटली व त्यामुळे त्यांनी तिचा शिष्या म्हणून स्वीकार केला. एका अपहर्तेचा असा उद्धार केला. या चंदनबालाकडे पुढे भ. महावीरांच्या  मार्गावर चालणाऱ्या 36000 साध्वी   संघाच्या प्रमुखा केल्या.  अशा अपहृतेला जीवनात सुखाबरोबर पुन्हा प्रतिष्ठा लाभावी म्हणून या महापुरुषाने साध्वी संघाचे द्वारे तिच्यासाठी उघडली. ही मानवी जीवनाची सार्थकता नाही तर काय ...!भ. महावीरांनी त्या काळातील  दिन दुबळ्यांना सहृदयतेने कसा हात दिला. हे या ऐतिहासिक घटनेतून स्पष्ट होते.श्वेतांबर जैन ग्रंथात याचा सविस्तर विस्तार आलेला आहे.
         विश्वाच्या प्रयोगशाळेतील महान वैज्ञानिक भ.महावीर बारा वर्ष सहा महिने पंधरा दिवस या प्रदीर्घ कालावधीत ते अधिक काळ निसर्गाच्या सानिध्यात राहिले होते.त्यामुळे जीवसृष्टीशी त्यांचा निकटचा संबंध आला.त्यातून त्यांनी जे निरीक्षण, परीक्षण केले या अभ्यासातून त्यांनी जे प्रबोधन केले ते आजच्या विज्ञान युगात ही आश्चर्यचकित करणारे आहे.
भारतीय शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पती विषयक जे शोध लावले. त्याचे ही मूळ भ. महावीरांच्या पंचस्तिकाय मध्ये आढळते. भ. महावीरांनी पृथ्वी काय, जलकाय, तेजकाय,वायु काय व वनस्पती काय अशा पाच प्रकारच्या एकेंद्रयि जीवांना पंचास्तिकाय म्हटले आहे. 
       काय म्हणजे शरीरधारी. म्हणून अस्तित्व असलेले अस्तिकाय  जीव म्हणजे दगड, हिरा, कोळसा सारखे पृथ्वीकाय किंवा मेघासारखे जलाकाय ज्योती, धूप,निखाऱ्यासारखे अग्नीकाय. महावायू, शीतवायू, उष्णवायु सारखे वायुकाय आणि चैतन रूप असणाऱ्या सर्व वनस्पती हे वनस्पतीकाय जीव...!दगड हा पृथ्वी काय जीव एकेंद्रिय असतो,हे विधान तसे आश्चर्यकारक वाटावे असेच काहीसे...!वनस्पतींना जीव असतो हा सिद्धांत भगवान महावीरांनी 2600 वर्षापूर्वी जगाला दिला. ज्यावर फ्रेंच तत्त्वेता हेन्री वर्गसा यांचे वनस्पती शास्त्रातले काही सिद्धांत व डार्विनचा उत्क्रांतवाद  भ. महावीरांच्या विचारसरणीची आठवण करून देतो.  विश्वाच्या प्रयोग शाळेतील  ते पहिले महान वैज्ञानिक कसे होते, हे समजू शकते.  यावरून हे लक्षात येते की  भ.महावीरच्या विचारसरणीची  तत्व प्रणाली अधिक प्रत्ययास येते. 
एकीकडे माणूस अंतराळातील दूरवरच्या विश्वावर गरुडझेप घेऊन स्वामित्व प्रस्थापित करण्याचा अविरत प्रयत्न करीत आहे.  याचे उदाहरण म्हणजे सध्या चालू असलेले  रशिया  युक्रेन यामधील युद्धे तर दुसरीकडे वाढत्या चंगळवादासाठी स्वतःच्या विश्वातील नैसर्गिक साधन संपत्तीची गरुडझेप घेऊन अखंड उधळपट्टी करीत आहे. कंगाल होत आहे. अशा प्रकारचा पर्यावरणाचा, नैसर्गिक साधन संपत्तीची उधळण थांबविण्या साठी, प्रदूषण रोखण्यासाठी भ. महावीरांच्या विचारधारेकडे नव्या उमेदीने, नव्या उन्मेशाने बघितले पाहिजे. आता हे माणसाला जाणवू  लागले आहे. पशूंचे संरक्षण,संवर्धन व्हावे यासाठी तो प्रयत्न करू लागला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवली जावी असे त्याला वाटू लागले आहे. पाणी साठवा, पाणी जिरवा म्हणू लागला आहे. कारण  मला असं वाटतं पाणी  जे आजोबांनी पाहिले नदीमध्ये... वडिलांनी पाहिले विहिरीमध्ये....
आपण पाहतोय नळामध्ये.... आपली मुलं पाहतील बाटलीमध्ये.... आणि नातवंडं  कॅप्सूलमध्ये  पाहतील
जर आता आपण पाण्याकडे दुर्लक्ष करू तर पहावे लागेल फक्त अश्रूमध्ये...!! पाणी जपून वापरा व तसेच पाण्यात अनंत जीव असतात.त्यांची हिंसा करू नका. पर्यावरणाचे रक्षण करा. 
       स्वतः जगून दुसऱ्याला जगू देणं म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजे अनुभूती..!जगा आणि जगू द्या हा फार मोठे महत्त्वाचे योगदान जैन धर्माने भारतीय संस्कृतीला दिले आहे. 2600 वर्षांपूर्वी एका महामानवाला हे उमजले...! या 'पंचास्तिकाय' त ऊर्जा असते,चैतन्य असते, जीव असतो, हे या महामानवाने  2600 वर्षांपूर्वी आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेवर जगाला सांगितले. 
       
       हिंसेला हिंसा हे उत्तर नसून अहिंसा हाच  हिंसेवरील  उतारा आहे .सत्य उमगण्यासाठी अनेकांत आवश्यक आहे.  कोणत्याही गोष्टीचे यथार्थ दर्शन घडण्यासाठी कोणत्याही समस्येचे समाधानकारक सोडवणूक करण्यासाठी एकांत दृष्टी, एकांत विचार असून चालत नाही, यासाठी त्या वस्तूची अथवा समस्येची एक एक बाजू लक्षात घेऊन सर्वांगीण पाहणी होणे सर्व बाजूंनी सर्वार्थाने विचार होणे महत्त्वाचे असते. अशी सर्वांगीण विचारसरणी जैन दर्शनात अनेकांत म्हणून ओळखली जाते. याच्यात आजच्या लोकशाहीची बीजे आपणास आढळतात. 
मला सगळ्यातलंच सर्व कांही कळतं हा विचारच माणसाच्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा आहे... यासाठी भगवान महावीरांचा अनेकांत वाद महत्त्वाचा आहे. 
स्पष्ट बोला पण ते असे बोला की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत आणि  आपले त्याच्याशी असलेले नाते नष्ट होणार नाहीत. त्यासाठी  कधी कधी मौनव्रताचा स्वीकार करा.दगड मंदिरात एकदाच जातो माणूस नेहमी देवासमोर भिकारी व भिकाऱ्यासमोर देव असल्याचा देखावा करीत असतो. देव देवळात, मज्जिद , गुरुद्वार, देरासन,चर्च यामध्ये  जातो. त्याने माणसाशी ,प्राणीमात्राशी, पर्यावरणाशी माणुसकीने वागावे. 
 
        कर्म सिद्धांत भ.महावीरांनी सांगितला. अंधश्रद्धेला खूप मोठा फाटा दिला.कर्मबंधाचा विळखा घट्ट न होऊ देता,त्याला प्रतिबंध करण्यासाठी   सत्कर्म  सिद्धांत महत्त्वाचा...!बाभूळ पेरून आंबा कधीच येत नसतो. त्यासाठी आंबाच पेरायला हवा. जसे कराल तसेच भराल. हा कर्म सिद्धांत जगताना महत्त्वाचा...! भारतीय संस्कृतीत जैन धर्माचे मोलाचे योगदान आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात, असक्तीने बरबटलेल्या मानवी मनाला आगळ घालून पर्यावरण,  जनकल्याण  साधण्यासाठी   संस्कार व संस्कृतीचे जतन करण्यासाठी जैन धर्माचे भारतीय संस्कृतीमध्ये मोलाचे योगदान आहे. 

      प्रा सुरेखा प्रकाश कटारिया राहणार चिंचवड पुणे ते  33
मो नं. 9822745030

.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!