समकालीन मराठी जैन कथा अस्वस्थ वर्तमान

समकालीन मराठी जैन कथा
कथेचे नाव- अस्वस्थ वर्तमान
 ----------------------------- 
लेखिका-प्रा सुरेखा कटारिया चिंचवड, पुणे.
राष्ट्रीय उपाध्यक्ष- श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली.
दि.17/8/2021
----------------------------- 
पहाटेचे पाच वाजून गेले होते. नेहमीप्रमाणे सुजाताबेन उठल्या होत्या. त्याची कित्येक वर्षांची सवय होती डोळे उघडताच आपले दोन्ही तळवे डोळ्यासमोर पकडून चोवीस तीर्थंकरांना, धरणी मातेला नमन करून , त्या सामायिक घेऊन पंच परमीष्टीचे स्मरण करायच्या. सामायिक होईपर्यंत नवकारसीचे पच्चकान येईपर्यंत आठ वाजून जायचे. मगच तोंडात पाणी घालत असत. आज ही तोच नियम! 
अवघ्या बारा वर्षाच्या असताना त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर वर्षाच्या आतच थोडासा ताप येऊन नवऱ्याला देवाज्ञा झाली. त्यानंतर तीन-चार वर्ष त्या सासरी राहिल्या. सासरच्या छळाला कंटाळून त्या माहेरी आल्या. विधवा स्त्रीचे लेबल घेऊन जगत असताना रखरखीत उन्हाळ्याचे चटके त्या सोसत होत्या .जीवन जगत होत्या. आता त्यांनी वयाची सत्तरी गाठली होती. सतत भूतकाळात रमणाऱ्या भूतकाळालाच गोंजरणाऱ्या सुजाताबेन, या श्वास तर वर्तमानात घ्यायच्या आणि आठवणी भूतकाळाच्या चघळायच्या...!अशा दुभंगलेल्या अवस्थेत जगत होत्या. स्वानंदी त्यांची नातसून त्यांना खूप समजावून सांगायची परंतु त्या त्यांचा हेका सोडत नसतं. 
"आमच्या वेळी असं नव्हतं बरं...!" 
हे त्यांचं ठरलेलं  वाक्य . मनानं दुभंगलेल्या सुजाताबेनला वर्तमानात धावणारी कर्तव्यनिष्ठ स्वानंदी चौवीस तास सहन करत होती. सासुबाईला दिलेल्या वचनाला जागून व जिवापाड प्रेम करणारी जिवलग म्हणून सुजाता बेनला दुखवत ही नव्हती. परंतु त्यांना सुखवण्याचा कुठलाच मार्ग तिच्याकडे नव्हता. ती मोठ्या कात्रीत सापडली होती. वर्षानुवर्ष सोसलेल्या दुःखद आठवणींच्या गाठोड्यांनी त्यांचं मन ओझवलेलं होतं. महात्मा गांधींच्या आदर्शवादाचे वेड असलेला एकुलता एक त्यांचा देशप्रेमी बंधू कर्नल बाहुबली भारत मातेच्या चरणी शहीद झाला.दुःखाचा डोंगर कोसळला. सुजाता बेनचा हेकट स्वभाव अधिकच तीरसट झाला. त्या अधिक विरक्तपणे वागू लागल्या. रोज सामायिक,कधी उपवास, कधी एकासण, कधी अयंबिल करायच्या तर कधी मौन व्रत धारण करून ही घर डोक्यावर घ्यायच्या. प्रेमा खातीर नातसून स्वानंदी सगळं प्रेमानं सोशिक पणे सहन करायची.
     आपल्या भारत मातेशी विशेष प्रेम असणाऱ्या देशप्रेमी कर्नल बाहुबली स्वानंदीचे सासरे सीमेवर लढता लढता शहीद झाल्यामुळे मन उद्विग्न झालेली सुजाता बेन वृद्धाश्रमात मन रमवण्या साठी जाऊ लागली. स्वानंदी तेथेच असणाऱ्या अनाथ आश्रमात अध्यापनाचे काम करायची आणि घर चालवायची. तिची खूप ससेहोलपट होत होती. शहीद सासऱ्यांचा संस्कार तिच्यावर संस्कारित झाला होता .महात्मा गांधी हे आदर्शवादाचे वेड असणाऱ्या कोट्यावधी मनांचं एक प्रतीक. याचंच आकर्षण शहीद कर्नल सासऱ्यांना होतं. उद्याचा स्वच्छ भारत, सुजलाम सुफलाम भारत भूमी, सुंदर राष्ट्राची निर्मिती, स्वतंत्र भारताचं असं स्वप्न पाहणारे शहीद कर्नल त्यांचं हे वेड स्वानंदीच्या नसानसात भिनलं होतं. जीवन मूल्यातील काही सुमंगल तत्त्वांची पूर्तता करण्यासाठी ध्येयवेडी आकांक्षा घेऊन ती काम करत होती .पण करणार काय? सुजाता बेन सारख्या व्यक्तिमत्त्वांना सांभाळताना तिला तारेवरची कसरत करावी लागत होती.
      यातून मार्ग काढण्यासाठी स्वानंदीने उपेक्षित आजी-आजोबा आणि उपेक्षित अनाथ नातवंड यांना एकत्र बोलविले.नातवंडांना आजी-आजोबांच प्रेम मिळावं म्हणून एक उपक्रम राबवला. आजी-आजोबांचा स्पर्श नातवंडाना होण्यासाठी व आजी-आजोबांना ही अनाथ नातवंडचा लडिवाळ स्पर्श अनुभवता यावा यासाठी सारा खटाटोप. समाजाची बधिर झालेली संवेदना ऊर्जित करण्यासाठी हा उपक्रम..! समाजामध्ये निर्माण झालेल्या सामाजिक समस्येवर समाधान शोधणार हा उपक्रम होता.आजी आजोबांकडून काही गोष्टी नातवांनी ऐकाव्यात. गाणी शिकावीत. आजी आजोबांची अनुभवाची शिदोरी या नातवंडांना मिळावी. अनाथ मुलांनाही आजी-आजोबा मिळावे व वत्सल कुटुंब तयार व्हावं. सामाजिक स्वास्थ्य सुदृढ राहावं. या उद्देशान अनाथ आश्रम व वृद्ध आश्रमामध्ये सेवा करण्यासाठी स्वानंदी आवर्जून वेळ देत असे.
परंतु स्वानंदीला वेगळाच अनुभव आला. घराघरातून नकोशी झालेली आजी-आजोबा मंडळी या वृद्धाश्रमात होते. नातवंडांना सामावून घ्यायला तयार नव्हते. अनाथ नातवंडाना सामावून घेण तर दूरच...!परंतू खोलीचे दारे बंद करून एकटेच खोलीत बसलेले. स्वानंदी काकुळतिला येऊन म्हणायची "अहो सुजाता बेन दार उघडा. मुलांना जवळ घ्या. ती तुमची नातवंड आहेत. त्यांना गोष्ट सांगा. पाढे म्हणायला शिकवा. त्यांच्या बरोबर गाणी म्हणा. सुजाता बेन दार उघडा.” तोच खोलीतून आवाज." काही नको... स्वानंदी!"
"अहो...! तुमचा आवाज किती छान आहे. मुलांना गाणी शिकवा." 
     सुजाताबेनच जग म्हणजे बंद खोली. कोणी दार उघडायला तयार नव्हतं. आजी आजोबा अनाथ व नातवंडही अनाथ...दोघं एकत्र राहून दोघांच्याही अपुऱ्या राहिलेल्या भावभावना संवादित करण्यासाठी व निर्माण झालेल्या सामाजिक समस्याचे समाधान शोधण्यासाठी हा सारा खटाटोप. पण कसलं काय...? 
हे आजी आजोबा म्हणजे स्वतःभोवतीच कोष विणण्यात तल्लीन झालेले. घर असून ही आजी आजोबांची उपेक्षा का होते. त्यामध्ये सुजाता बेन ही होत्या.चार वर्षाचा सुविध अनाथ आश्रमातून दत्तक घेतला तेव्हा त्या खुश होत्या.त्याचे लाड कोड करायच्या त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या सर्व भावभावना दत्तक घेतलेल्या सुविध बरोबर शेअर करायच्या .परंतु आजकाल त्या पुन्हा एकाएकी तिरसटपणे वागायला लागल्या होत्या.त्यांच्या वागण्यात बदल व्हावा म्हणून स्वानंदी सतत प्रयत्न करत होती. म्हणूनच हा अनाथ आजी-आजोबा व अनाथ नातवांचा स्नेह मेळावा तिने घेतला होता. 
          घरातील नव्या पिढीच्या नव्या प्रवाहात नव्या विचारात मिसळून जाण्याची त्यांची तयारी नसल्यामुळे या स्पर्धेच्या युगात धाव धाव करणाऱ्या पिढीच्या वाटेतील या सुजाताबेन सारख्या आजी कसा अडथळा बनतात याच जणू हे प्रात्यक्षिक स्वानंदी अनुभवत होती. त्यांच्या हेकेखोर स्वभावामुळेच स्वपरिवारापासून हे ज्येष्ठ नागरिक उपेक्षित राहात आहेत. जीवनात अनेक समस्यांना तोंड देऊन अडथळे दूर करत करत ज्येष्ठ झालेल्या, अनुभवाने लबालब भारलेल्या आजी आजोबांनी आपल्या स्वभावाचे काही कंगोरे सोडावे. स्वभावाचे काही कोपरे दुमडावेत. मी म्हणेल तेच खरं नसून,जी वास्तवता आहे ती वास्तवता स्वीकारावी. हे त्यांना कळतंय पण वळत नाही. हे न वळल्यामुळे, घर असून ही घराचा, नातवंडांचा आजी आजोबां आनंद  घेऊ शकत नाही. आपलेपणाचे स्पर्श देखील या स्पर्धेच्या युगात व्यवहारी रस्सी खेचेत धुडकावले जातात. आजी-आजोबांना जपायचं तर नातवांचं नुकसान आणि नातवांना घडविताना त्यांच्या मनासारखं वागताना आजी आजोबा दुखावणार ही ओढाताण मधल्या पिढीत असणाऱ्या तिच्या सासूमाची ससेहोलपट स्वानंदीला आठवली. तिचं सारं शरीर शाहरल .या विचारात  असतानाच सुजाता बेनचा आवाज कानी पडला. ती भानावर आली.
 "अगं स्वानंदी कुठे आहेस?"
हो हो आले आले असे म्हणणारी स्वानंदी आज खूप विचाराधीन होती.  ती काहीच बोलत नव्हती.
   आतून आवाजाला प्रत्युत्तर न आल्यामुळे सामाईक ठिकाणी करून तोंडाचा पट्टा सुरू केला. सामायिक ठिकाने केली की तोंड धुवेपर्यंत, स्वानंदी चहाचा कप सुजाताबेन समोर आणून ठेवी. पण आज स्वानंदीचे चित्त थाऱ्यावर नव्हते. चेहरा त्रासलेला होता. दरवाजात उभी राहून सारखी दूर वर काहीतरी पाहत होती.
      "आज काही दूध पाणी मिळणार आहे का नाही? अगं! दिवस उगवताच कोणाच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहेस स्वानंदी? तुझ्या  मुलानं एवढ्या विनंत्या केल्या आजिजी केली. तेव्हा गेली नाहीस त्यांच्याबरोबर…! आणि हो…! भारत माता… भारत माता... करत सासरा ही सीमेवर लढता लढता गेला.  सासूला ही घालवली आता एक मी आत्या सासू उरली आहे तुझ्या सोबतीला.... मला ही अशीच मारून टाक. म्हणजे झालं.....  ठेव उपाशी...."सुजाताबेनने तोंडाचा पट्टा चालूच ठेवला. 
पण स्वानंदीने एक शब्द न बोलता तशीच दाराच्या समोर उभी राहिली होती. डोक्यात विचारांचं काहूर होतं.  या आत्या सासू अशा का वागतात? याला का धर्म म्हणायचा?
 घराघरात प्रत्येक जण करिअर साठी धावताना, करिअर या समांतर रुळावरून धावणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांना संवादाचा सांधाच नाही आणि विरामाचं जंक्शन ही नाही म्हणूनच जगत असताना मरणापर्यंत न पोहोचलेल्या परंतु मृतवत जगणाऱ्या या शव पेटीकाच नाहीत का?... अशी घुसमटून टाकणारी घरातील परिस्थिती जणू गॅसचा चेंबरच झाला आहे.
 इतक्या टोकाची निराशा एकाएकी येत नाही. सुजाताबेन नेहमी नकारात्मकच बोलायच्या. या निराशेची पूर्वतयारी पूर्वीपासूनच त्यांनी आपल्याच हाताने केलेली आहे. असं सारखं  समताधारी असणाऱ्या स्वर्गीय सासूबाईंच्या बोलण्यातून जाणवायचं. आता त्या नाहीत. सारी जबाबदारी माझ्यावर सोडून, शेवटचा श्वास घेताना माझा हात हातात घेऊन, सुजाताबेन ला कधी दुःख देणार नाही. याचे वचन माझ्याकडून घेतले आणि मी पूर्ण त्या वचनाला बांधील राहिले आहे! या विचारात स्वानंदी गढून गेली होती. ती काहीच बोलत नव्हती.     
                तिच्या अशा या थंड वागण्यानं सुजाताबेनच्या रागाचा पारा अधिकच चढला.  तळपायाची आग मस्तकाला पोहोचली. तशातच पहिल्या दिवशी केलेला चौविहार व आता नवकारसी केव्हाच येऊन गेलेली. गेली 15 तास झाले पोटात पाण्याचा थेंब नव्हता. भुकेनं त्या अधिकच तडतडल्या. आणि तिच्यावर कडाडल्या, 
"स्वानंदी तुझ्याशी बोलते मी?अगं कान फुटले  का? बहिरी झाली आहेस. कुठला तो अनाथ पोटाSsss.......! त्याच्यासाठी जीव कासावीस करतेस? आणि तुझ्या रक्ताच्या नात्याच्या सुजाता बेनला दूध पाण्यावाचून तडफडायला लावते. त्याचं काही कसं वाटत नाही गं तुला? काय संबंध तुझा त्याच्याशी ssबोल ना?अनाथ पोटाSsss...! त्याच्यासाठी वाटेल ते करायची तुझी तयारी.... त्याचे लाड.... त्यासाठी गोड-धोड करणार. त्याच्या आवडीचं बनवणार. त्यांन कधीही रात्री-अपरात्री यावं. धडाडधूम दार उघडावं. सारा झोपेचा सत्यानाश. पण तु त्याला जेवण गरम करून देतेस. रात्री अपरात्री खायला काय घालतेस. आपल्याकडं दिवस मावळल्या  नंतर  रसोईचा चौका बंद असतो. तरी सुद्धा सगळे नियम बाजूला ठेवून त्याच्या साठी काहीही करायला तयार असतेस. बरेच दिवस झाले तो आलाच नाही. म्हणे सीमेवर गेला आहे? कोण जाणे...!कुठे तडफडला आहे...? कोणास ठाऊक? "
"नका हो असं बोलू…!  भगवान महावीरांच्या तत्त्वावर जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील असता आपण.! त्याला मी जन्म दिला नसला म्हणून काय झालं? तो एक जीवच आहे ना त्याच्या बाल क्रीडांचा आनंद तुम्ही घेतला आणि आत्ता असं बोलता. असं बोलणं म्हणजे सुद्धा भाव हत्या होय.  तुम्ही तुमच्या तोंडाने असं काहीतरी बोलून माझ्या मनाला डागण्या देत आहात. हे बोलता बोलताच तिचे डोळे डबडबले अगदी धीर गंभीर होऊन ती पुढे बोलू लागली
 "सुजाता बेन तो सीमेवर ....!"
हे सांगता सांगताच स्वानंदीचे डोळे भरून आले. रस्त्याला डोळे लावून बसलेली स्वानंदी बरसली. ओक्साबोक्शी रडू लागली. भारत मातेच्या चरणी हुतात्म आलं हो माझ्या सुविध ला. ..!"
तेवढ्यात मिलेक्ट्री च्या गाडीमध्ये त्याचं पार्थिव समोर आलं आणि स्वानंदीने  दत्तक घेतलेल्या अनाथ मुलाच्या पार्थिवा समोर शपथ घेतली.
 "  सुविध इथून पुढे मी  भारत मातेसाठी जगेल व शहीद झालेले  तुझे दादाजी कर्नल बाहुबली यांचं अपूर्ण राहिलेलं काम मी पुर्ण करेल. देशासाठी, भारत मातेसाठी, तिच्या रक्षणासाठी सज्ज राहील. आणि ती लष्करामध्ये भरती झाली. हे सारं अवाकपणे पाहणाऱ्या सुजाता बेनच्या तोंडातून  नकळत शब्द बाहेर पडले." धन्य ती स्वानंदी व धन्य तिचा त्याग...! म्हणतच सुजाता बेनने ही स्वतःला देश सेवेसाठी समर्पित केले. म्हणतात ना फुला सवे मातीसगंध"  
-----------------------------
समकालीन मराठी जैन कथेतील शब्दांचे अर्थ
सामायिक -अट्ठेचाळीस मिनिटे ध्यानधारणा करून संसारापासून विरक्त जीवन जगणे. 
नवकार महामंत्र- जैन  धर्मातील मंत्र 
नवकारसी- सूर्योदयानंतर 48 मिनिटांनी आहार घेणे. 
उपवास -  एक दिवसाचा निरंकार अन्न पाण्याविनाचा उपवास. 
 एकासन- एका आसनावर बसून 48 मिनिटात जेवण पूर्ण करणे. अयंबिल- पाच विगयचा त्याग करून दूध ,साखर, मीठ, मैदा, तूप हे पाच विगय वर्ज करून  आहार घेणे. एकाच वेळी एकाच असनावर बसून 48 मिनिटेच मर्यादा आहार घेण्यासाठी. 
चोविहार - सूर्यास्तानंतर काहीही न सेवन करणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!