, समकालीन जैन कथा अन्तानुबंधी कशाय
समकालीन मराठी जैन कथा
कथेचे नाव - अन्तानुबंधी कशाय
प्रा. सुरेखा कटारिया-
राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष-
श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नई दिल्ली.
मोबाईल नंबर 9822745030
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पिंपळे गुरवच्या जैन श्रावक संघाच्या अध्यक्षांनी जैन स्थानकातील सेवकां बरोबर गावातल्या घरोघरी निरोप धाडला. आज जळगाव निवासी जैन भगवती दिक्षार्थींचा सत्कार व भावाचा कार्यक्रम जैन स्थानकामध्ये आयोजला आहे. तरी सर्व श्रावक, श्राविकांनी वेळेवर यावे.
या निरोपाने भाभीसा निशब्द झाल्या .भाभीसांच्या मनाला देवरानी बिन्नीने जाणले.
मनात विचार चमकून गेला. खरोखरच "आर्थिक सुबत्ता असताना ही भौतिक सुखांचा त्याग करून,जैन भगवती दिक्षा घेऊन जिनवाणीची सेवा करणारे जळगाव निवासी बहिण भाऊ कुठं..? आणि आजची आपल्या घरातली ही तरुण पिढी कुठं... ..?" अशा विचारांच्या तंद्रीत असलेल्या देवराणीला भाभीसाने आवाज दिला.
"बरं का बिन्नी जैन स्थानकांत दीक्षार्थी भाऊ व बहीण येणार आहेत. विचाराच्या तंद्रीत असणाऱ्या बिन्नीला पुन्हा मोठ्याने आवाज दिला अहो ! बिन्नीssओ बिंन्नीsss माझी बेटक्याची पिशवी कुठं ठेवली ? मला जैन स्थानकात जायला उशीर होतोय."
जेठांनीचा मोठ्याने आलेला आवाज ऐकून देवराणीची तंद्री भंग पावली. परसबागेत चिमण्यांना,पाखरांना पिण्यासाठी पाण्यानं भरलेलं मडकं ठेवून व बाजरीचे दाणे टाकून बिन्नी घाईघाईने घरात आल्या.हे त्यांचं रोजचं काम होतं.
"काय हो भाभीसा?"
"अहो! आपल्याला जैन स्थानकात जायचं आहे. काल जळगावहून दीक्षा घेणारे सांडेचा परिवारातील दीक्षार्थी आपल्या जैन स्थानकामध्ये येणार असून त्यांचा सन्मान व सत्काराचा कार्यक्रम ,भावाचा कार्यक्रम ठेवला आहे.अध्यक्षांनी आपल्या चंदनबाला महिला मंडळावर ही जबाबदारी सोपवली आहे. मी जैन स्थानकामध्ये जाऊन येते . एवढं बोलून सामायिकची बेटक्याची पिशवी शोधू लागल्या. इकडे तिकडे पाहू लागल्या. पिशवी दिसे ना...! पुन्हा त्यांनी, आपल्या देवराणीला आवाज दिला. बिन्नी माझी सामायिकच्या बेटक्याची पिशवी दिसत नाही?"
देवराणीने इकडे तिकडे नजर फिरवली.अध्यात्मिक साधनेसाठी वापरली जाणारी बेटक्याची पिशवी शोधू लागल्या.त्यांना बेटक्याची पिशवी दिसेना. ती शोधण्यासाठी त्या ध्यान धारणेच्या ,सामायिकच्या खोलीमध्ये गेल्या. तिथं पिशवी दिसली. "भाभीसा! ती पहा.तुमची बेटक्याची पिशवी"
भाभीसा मनामध्ये पुटपुटत होत्या .कुणी उचकली बेटक्याची पिशवी.पुंजनी, जपाची माळ ,बत्तिसावे आवश्यक सूत्राचे- प्रतिक्रमणचे पुस्तक, स्तवनचे पुस्तक या बेटक्यामध्ये दिसत नाही."
अगोदरच वैतागलेल्या भाभीसा अधिकच वैतागून बडबडत होत्या. असं बडबडणं सध्या त्यांचं जास्तच वाढलं होते. त्यांचा मुलगा नेमीकुमारने, त्याच्याच बरोबर शिकत असलेल्या विजातीय मुलगी स्वप्नाली बरोबर रजिस्टर लग्न करून घरी घेऊन आल्या पासून....! त्यांचं डोकं सटकलं होतं.....!
स्वप्नाली जेठांणीच्या समोर गेली,की त्यांची तळपायाची आग मस्तकाला जाई. अशा प्रसंगी आम्ही सर्वजण परिस्थिती सावरून घेत असत . त्या स्वप्नालीचा तिरस्कारचं करायच्या.
त्यांना त्यांच्या घेतलेल्या वस्तू जागेवर ठेवल्या नाही;तर शिस्तबद्ध भाभीसांचे ताल जात असतं.
हा देवराणीचा, घरातल्या लोकांचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. पस्तीस वर्षाच्या सहवासात त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू ठाऊक होते. उच्चशिक्षित, अतिशय प्रेमळ, कनवाळू ; परंतु तेवढ्या शिस्तप्रिय असणाऱ्या भाभीसांची सर्वाना आदरयुक्त भीती होती. त्या नेहमी मला देवरानी म्हणून नव्हे; तर छोट्या बहिणी प्रमाणे प्रेम देत असतं. त्या मला नेहमी सांगायच्या, "बिन्नी तात्काळ समस्या सोडवणारे हात घरात असले, की घरातल्या लोकांना प्रश्नांची जाण राहत नाही. प्रश्न त्यांच्यापर्यंत जात नाही, म्हणून ते नाहीतच असं अनेकदा घरातल्या पुरुषांना वाटतं.तुम्ही, मी बिन तक्रार मिटल्या तोंडाने आपली संपूर्ण कार्यक्षमता ,छंद म्यानबंद करून, परिवारासाठी झोकून दिलं .जणू स्वतःच्या सर्व इच्छा, आकांक्षा पुसून कोर्र करकरीत करून या घरात पुन्हा स्वतःला नव्याने या घर प्रपंचात....! आपणाला सर्वजण गृहीत धरतात . तूम्ही लग्न करून आल्यापासून म्हणतात "आता काय एकीला दुसरी मदतीला आली आहे" .
आपआपले सर्व छंद, आवडीनिवडी सुख गुंडाळून मुलांना वाढवून त्यांचे संसार त्यांनी थाटले, खरे पण सुनांनी घर गुंफायला हवं त्यासाठी आपल्याच समाजातील मुलगी घरात येणं महत्त्वाचं.....!असं मला आपलं वाटतं बिन्नी...!!अहो यासाठी नाही....! आम्ही या घरासाठीच....!! पण घरही आमच्यासाठी ही जाणीव दिसायला हवी. हे भाभीसाच मूक आक्रंदन...!मला नेहमी विचार करायला लावतं. त्यात कोणाच्याही मनाचा विचार न करता. मुलाने केलेला आंतरजातीय विवाह त्यामुळे त्या पार खचून गेल्या होत्या. या विचारातच देवरानी घाईघाईने आत आल्या. भाभीसांची बेटक्याची पिशवी व्यवस्थित केली.त्यांच्या हाती देत उसण हसू आणत हसत म्हणाल्या,
"अहो भाभीसा आपला पोता , स्वानंदने धार्मिक पाठशाळेसाठी त्याला लागणार प्रतिक्रमणचे पुस्तक तो घेऊन गेला . तुम्हीच तर त्याला मुखोदगत करण्यासाठी प्रतिक्रमणचा गाथा दिला होता ना!"
हो ..हो ....मीच त्याला गाथा पाठ करण्यासाठी दिला होता. मी विसरलेच की, आज-काल विसरायला होतो हो बिन्नी . ...!
सुखदुःख मिश्रित भावनेन, बऱ्याच वेळानंतर तिरक्या नजरेनं स्वप्नालीकडं पहात,भाभीसांनी आपल्या देवराणीला विचारले," बिन्नी पर्युषण पर्वाची सर्व तयारी झाली का?"
तिला सांगा ....! उद्यापासून लीलोती, हिरव्या पालेभाज्या आणायच्या नाहीत. दळण आजच दळून आणा. अनेक समस्यांचं मोहळ आणि त्यावरील विचाराच्या मधमाशांनी त्या भांबावल्या होत्या. त्या भांबावलेल्या मनस्थितीत जैन स्थानकांत दीक्षार्थीच्या स्वागतासाठी निघून गेल्या.
जैन स्थानकामध्ये परमपूज्य, पुण्यस्मिताजी व परमपूज्य प्रणितीजी महाराज साहेब पाटावर विराजमान होत्या. आज 32 आगम मधील बृहतकल्पसूत्रातील अन्तानुबंधी, या विषयावर प्रवचन देत होत्या. आज धर्म सभेमध्ये दीक्षा घेणारे भाऊ-बहीण ही आले होते. आपल्या पहाडी आवाजात नवकार महामंत्राने प्रवचनाची सुरुवात केली.
"मेरे धर्मप्रेमी भाई और बहनों, लोभ, राग ,द्वेष, मोह ,माया ये कशाय हर एक के जीवन को कैसे परिवर्तित करते है...! इससे कैसे छुटकारा पाये...? इसके बारे मे हम सोचेंगे और अपना जीवन सफल बनाने हेतू के लिये सतर्क रहेंगे l
"ये कहानी भगवान महावीर स्वामी के वक्त घटी हुई ,प्रसन्नचंद्र नाम का राजा था l उस राजा की उम्र होने के बाद उन्होने आपणा राज्य आपने बेटे को सोपकर दीक्षा ग्रहण की l और साधना करने हेतू स्मशानभूमी मे जाकर ध्यानधारणा को बैठे l
उसी वक्त उनके स्नेही दोस्तने कहा अरे ये कैसा बाप है? छोटे उम्र वाले बेटे को राज्य सोपाकर दीक्षा लेने के लिए चला गया l और दुश्मनों ने उसके बेटे को घेर लिया है l अब बेटा कैसा करेगा? ये बोलते हुए ये भयंकर शब्द दीक्षा लिये हुए प्रसन्नचंद्र के कानो मे पडे l शब्द कान मे पडते ही उनके भाव परिवर्तित हुये ,वह सोच मे पडा, मेरा बेटा, मेरा राज्य और मेरे राज्य को, बेटे को शत्रु ने घेर लिया l इस सोच मे दीक्षा लेने के बाद ही ध्यान मे बैठे हुए प्रसन्नचंद्र काल्पनिक युद्ध शत्रु के साथ करने लगे l कल्पना मे ही घोर युद्ध हो रहा था l
उसी वक्त श्रेणिक महाराज भगवान महावीर स्वामी को वंदन करणे हेतू आयेl तभी उन्होने भगवान को वंदन करते, हुए बोले "भगवंत प्रसन्नचंद्र राजाने दीक्षा ली, अभी उनकी मृत्यू हो गयी तो वे कहा जायेंगे l"
" भगवान महावीर बोले सातवा नर्क मे...l "
"भगवंत ऐसे कैसे? उन्होने तो दीक्षा . .."
प्रसन्नचंद्र राजा कल्पना मे युद्ध कर रहे ,उनके हाथ के सभी शस्त्र खतम हो गयेl और फिर अंत मे शत्रु को मारने के लिये आपने सिरपर का मुकुट निकालने हेतू सिर को हात लगाया, तो सर मुंडन किया हुआ पाया l उनको उनके साधुत्वका ध्यान आ गया
"अरे....! मैने तो दीक्षा ली है, साधू बन गया l
फिर वो समज गये अरे मैं क्या कर रहा हू? कौन मेरा शत्रु? मै तो साधू बन गया हू l मेरा शत्रू तो मेरे अंदर है l मद, क्रोध, मोह, माया, लोभ मेरे शत्रू है l कोई मेरा बेटा नही, मेरा शत्रू नही,कोई मेरा राज्य नही और काम, क्रोध, मोह, माया के बंधन से मुक्त होके शुद्धिकरण भाव से पश्चाताप करने लगे l सातो नारकी के बंधन तोड के केवलज्ञानके धनी हो गये l देवदुंदूभी बजने लगी और, श्रेणिक राजाने तात्काल कहा भगवंत आप तो कहते थे "प्रसन्नचंद्र सातवे नरक मे जायेंगे और उनको तो केवलग्यान प्राप्त हुआ l ये कैसे?"
तभी भगवंत बोले
"अपने अंदर के भाव बदलो भव बदल जायेगा इसीलिए बृहतकल्पसूत्र हमको कहता है कि जीवन के अंदर आगे बढने की कोशिश करो l आपने पसंत की चीज नही की तो एक दुःख से आप बार बार दुखी हो जाते हो...! इस भाव को बदलो आप अन्तानुबंधी कशाय से दूर रहो l इसीलिए तो कहते है भावना भावीये भावे तिजे ज्ञान इस भावनाओंके साथ
ओम शांती...!
सारा धर्मसभा मंडप व्याख्यानान मंत्रमुग्ध झाला होता. जणू प्रत्येकाच्या घरामध्ये सुख, शांती, व समस्याच समाधान त्यांच्या प्रवचनातून मिळत होतं. प्रवचनाने सारे भारावून गेले होते. परमपूज्य महाराज साहेबनी व्याख्यानाला पूर्णविराम दिला. आणि त्या ध्यान धारणेसाठी निघून गेल्या.
भाभीसा त्या विचारातच घरी आल्या, सतत सोनालीचा तिरस्कार करणाऱ्या भाभीसांच्या डोक्यात प्रकाश पडला; पण तरीसुद्धा मनातील अढी ...... ! ही अढी काढण्याचा सतत प्रयत्न करत होत्या.पण....!
**
इकडे घरी मात्र प्रेमविवाह करून आलेली डॉक्टर स्वप्नाली सून मात्र गोंधळून गेली. तिला काहीच कळेनासे झाले.
मोठी हिंमत करून ती काकीसांना विचारू लागली."काकीसा मला समजलं नाही.काय सांगत होत्या सासुमॉ?"
"अगं !स्वप्नाली पर्युषण पर्वाचा अध्यात्मिक सण साजरा करताना हिंसा होऊ नये. त्यासाठी भाभीसा सांगत होत्या.
"काकीसा मला कळालं नाही.दळण करताना कसली हो हिंसा? आणि दीक्षार्थी जैन स्थानकात येणार आहेत म्हणजे कोण हो? "
नवीन लग्न करून आलेल्या स्वप्नालीला या जैन परिवारा बद्दल त्यांच्या चालीरीती बद्दल अनेक प्रश्न भंडावून सोडत. ती आपल्या प्रत्येक शंकेचं निरसन तिच्या काकीसासूकडून करून घेत असे.
अगं स्वप्नाली दळण करताना सोन किडे, आळ्या इ. एकेंद्रीय, बेइंद्रिय जीवाची हत्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही गं...!ती हिंसा होऊ नये. आपणाला पूर्ण वेळ धर्म आराधनेसाठी मिळावा. म्हणून हे सारं प्रयोजन !
स्वप्नाली जरा गोंधळलेल्या स्थितीत "काकीसा!एकेन्द्रिय, बेंइन्द्रिय जीव म्हणजे.....! मी नाही हो समजले..!!"
"अंग!स्वप्नाली तू डॉक्टर आहेस ना तुला कळायला हवं .ज्यांना फक्त , स्पर्श इंद्रियचं आहेत.उदाहरणार्थ- पृथ्वीकाय,अपकाय, तेउकाय,वायूकाय, वनस्पतीकाय या सर्व जीवांचा त्यामध्ये समावेश होतो. पृथ्वीतलावरील जीवांचे वर्णन उत्तराध्यायन सूत्रामध्ये आपल्याला आढळते. शास्त्रज्ञ डार्विननी मांडलेला सिद्धांत २६०० शे वर्षांपूर्वी भगवान महावीरांनी सांगितलेल्या उत्तराध्ययन सूत्रांमध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतो.हे जीवांचे केलेलं वर्गीकरण आहे.बेइन्द्रिंय म्हणजे ज्यांना स्पर्श आणि रसना ही दोन इंद्रिये असतात. त्या जीवांना बेइंद्रिय म्हणतात.त्यामध्ये कृमी, आळी,शंक,शिंपले, सोनकिडे इत्यादी मोडतात. दळण करताना याची हिंसा होऊ नये स्वप्नाली; म्हणून हे सारं पर्युषण पर्व सुरू होण्या अगोदर करणं महत्त्वाचं !
तोच काहीतरी आठवत स्वप्नाली, "बरं का काकीसा,नेमीबरोबर काॕलेजमध्ये शिकत असताना जैन धर्मातील तत्वज्ञानाच्या संदर्भात आमची खूप चर्चा होत होती.
हा संवाद चालू असतानाच जैन स्थानकातून दिक्षार्थीचं स्वागत करून आलेल्या भाभीसा जेठजीसा ओसरीवर उभे राहून सारा संवाद ऐकत होते.
ते ऐकून जेठजीसा गौतमचंजी आपल्या पत्नीला म्हणाले,"तुम्ही काही म्हणा , स्वप्नालीबिन्नीं अगदी चौकस बुद्धीनं सारं करतात आणि विचारतात ही....!हो...ना...?"
"पुरे झालं कौतुक...!
त्या विचारतात खऱ्या; पण ती श्रद्धाबिद्धा नव्हे बरं त्यांची? एवढी गोष्ट मात्र खरी बुद्धीच्या पटलावर त्या घासून पाहतात.पण... अहो!श्रद्धा हवी मग विश्वास बसतो ना..! या नव्या पिढीतल्या विजातीय मुलीचं कसं होणार कोण जाणं? कसा करेल माझ्या मुलाचा संसार... कोण जाणे?अरिsहंत! अरिssहंत!!"
"अगं, तू असं का बोलतेस? गेली आठ महिने झाले,आपण तिला अनुभवतोय, पाहतोय .ती हुशार आहे. साधी आहे.लाघवी आहे. सरळमार्गी आहे.धीट आहे. जगात दोन घेणारी आणि दोन देणारी आहे. होईल सगळं ठीक...!काळजी करू नकोस."
अधीरपणे त्या आपल्या पतिराजांना म्हणाल्या, "होऊ द्या ओss..!व्हायलाच हवं. सगळं ठीक..!व्हायलाच हवं..!! हेच मागण आहे पंचपरमेष्टी चरणी...! जगण्यांसाठी एवढंच हवं असतं का हो? श्रद्धा...! हवी का नको. जेव्हा झाडाची मुळं जमिनीत घुसतात, तेव्हाच वाढतं ना झाड ...आभाळात ? शेकडो वर्ष जगतात झाडं, ती कशानं हो?"
"परवा म्हणत होती, गणपती बसतायेत आम्ही दोघे जातो गणपती बघायला...!आता तुम्हीच सांगा पर्युषण पर्व महत्त्वाचे की, गणपती बघायला जाणे महत्त्वाचे... ? तुम्हाला खरं सांगू का ..? "
"सांगा ना"
"पूर्वीचं घड्याळ आम्ही बदललंय सातच्या आत घरात येण्याचं ...! मुलांचे शाळा, कॉलेज, क्लास त्यांच्या वेळा याचा विचार करून केव्हा ,किती वाजता घरी येतात हे सार सोडलं आम्ही .. मुलांवर! सगळं मुलांच्या सोयीनुसार...!मुलांनी बदललेले घड्याळाचे काटे खरोखरच विकासाच्या दिशेने सुरू आहेत का...?हे पाहण्याची जबाबदारी मुलांचीच ना ..?"
जेव्हा ते काटे घसरतात तेव्हा घड्याळाचे नव्हे जगण्यांचे बारा वाजतात. तसे बारा वाजू नयेत.
त्यासाठी वेड्या मनाला शहाणं ठेवणार एक मन आपल्या स्वतःच्या मनातच असायला हवं. तेव्हा आपल्या कर्तव्याची जाण येते बरं. .
"अहो ..! आज पर्यंत ती, तिच्या माहेरी गणपतीचं, गौराई यांचं करत आली .मग तिला गणपती महत्त्वाचेच वाटणारच ना...? त्या संस्कारात ती वाढलेली. तिला आपलं सारं जाणून घ्यायला, बदलायला थोडा वेळ द्या. ती आपल्या मुलावर नितांत प्रेम करते.तिच्या प्रेमा खातिर व आपल्या मुलाच्या इच्छे खातिर आपण हे सारं स्वीकारलं ना. .? "
आत्ताच तुम्ही तर म्हणत होता तिची श्रद्धा नाही. मग ही श्रद्धा असल्याशिवाय ती गणपतीला जायचं म्हंटली का..?
जरा सबुरीने घ्या, सारं ठीक होईल.
हे बोलत बोलतच जेठजीसा खाssकरण्याचा आवाज करत माजघरातून, स्वयंपाक घरात पाण्याच्या माठाकडे पाणी घेण्यासाठी वळाले.
घरात येताना जेठजीसां मोठ्याने खाकरत घरात येत असत. ही त्यांची ते आल्याची जणू सांकेतिक घंटाच होती .
खाकरण्याचा आवाज काकीसांनी ऐकला आणि डोक्यावरचा पदर सावरत काकीसा व स्वप्नाली दोघी चौक्यात गेल्या . घाई घाईने जेठजीसांना पाण्याचा ग्लास आणून दिला.
संध्याकाळचे पाच वाजायला आले होते. काकीसाने सांगितल्याप्रमाणे तिने फ्रिजमधील उरलेला सर्व भाजीपाला कामवाल्या मावशीला देण्यासाठी काढून ठेवला.
काकीसा, " स्वप्नाली
त्या हिरव्या मिरच्या इकडे माझ्याकडे दे बरं. तुला त्या भाजी टाकण्यासाठी सुधारून देते. दाळीला जिरे,मोहरी घालून बगार दे. घोटलेली मुगाच्या डाळीची खिचडी कर. उद्यापासून पर्युषण पर्व सुरू. ते संपेपर्यंत लिलोती वर्ज बंर...!"
तोच तिचा प्रतिप्रश्न "काकीसा सुधारून म्हणजे....?"
"अगंs! मिरची चिरणे हा शब्द हिंसाकारी! म्हणून आपण त्याला सुधारण, किंवा वधारण असा म्हणतो समजलं..?"
स्वप्नालीच्या डोक्यात अनेक विचारांचे काहूर माजले, विचार करू लागली अरे,घरात एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा केवढा विचार! आणि विचारानुसार आचार ही!!
विद्यालयात नेमीबरोबर शिकत असताना ,बोलत असताना हे प्रखरतेनं जाणवायचं. जैन धर्म हा त्याग, समताभाव, सौम्यता, सुचिता,साधेपणा,तप, जप या भक्कम पांयावर उभ्या असलेल्या या घरात सासुमॉच माझ्याबरोबर असं तिरस्काराचं वागणं ...! हे संयुक्तिक वाटतं नाही.कारण एवढ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करणाऱ्या धर्मव्यासंगी सासुमॉ माझ्याबरोबर अशा का वागतात? या प्रश्नानं ती गांगरून गेली.
सर्वांनी चौविहार केले. उद्यापासून पर्यूषण पर्वामध्ये भाभीसांच्या आठईचं उपवासाचं व्रत सुरू होईल. या विचारातच दिवरानी चौक्याचं घर आवरता आवरता माहेश्वरी समाजातून आलेल्या स्वप्नालीशी बोलू लागली. "स्वप्नाली, पर्युषण पर्वामध्ये आठ दिवस तुझ्या सासूमॉ निरंकार उपवास करतात बरं! त्याला आठई म्हणतात"
" आठ दिवस निरंकार उपवास हे कसं शक्य ?"
"हो, स्वप्नाली, हे अगदी खरं आहे. "
"हो! फक्त गरम पाणी ग्रहण करतात. त्यांची ही तपश्चर्या मी गेले पस्तीस वर्षापासून अनुभवत आहे."
" स्वप्नाली आश्चर्याने, एक विचारू का काकीसा?"
"विचार ना !"
"काकीसा आठ दिवस उपवास करण्यांपेक्षा, उपाशी असणाऱ्यां आठ जणांना जेवू घातलं तर...? केवढा मोठा पुण्याचा कर्मबंध बांधला जाईल, नाही का...!"
"तुझं अगदी बरोबर आहे .आठच लोकांना नव्हे, शहरातल्या सर्व भुकेल्या लोकांना आपण अन्नदान करत असतो. त्याचा रसोडा पंचायती वाड्यामध्ये लावला जातो."
स्वप्नाली आssवासूनच काकीसासूमाकडे पाहत, ऐकत होत्या ."
"खरंच...!"
"हो ,अगदी खरं सांगते गं तुला. ही पिढ्या आणि पिढ्याची आपली परंपरा आहे. जैनांचे पर्युषण पर्व तुमच्याकडे गणपती गौराई हे सारे पर्व अध्यात्मिकतेचे...!जैनांच्या पर्युषण पर्वमध्ये अन्न, पाण्याच्या त्यागाला महत्त्व दिलेला आहे.
त्याग हा शब्द कानी स्वप्नाली
काकीसा," सासुमॉकडे मोजक्या दहा साड्या, झोपायला चटई आणि त्यांच्या खोलीमध्ये फक्त जैन तत्त्वज्ञानाचे, आगमांचे ग्रंथ!बस एवढेच! मी आल्यापासून पाहते. सकाळी त्या एकदा जेवतात.एकासन व्रत करतात. आणि आत्ता आठ दिवस निरंकार उपवास! त्यांची प्रकृती किती कृश झाली आहे. अहो,हे पर्व साजरा करण्यासाठी एवढा त्याग करावा लागतो ...? एवढी तयारी...!
आमच्याकडे गणपती मध्ये, आम्ही उपवास करतो, परंतु साबुदाण्याची खिचडी, फळ ,दूध घेऊन आम्ही उपवास करतो." इतका त्याग सासुमा का करतात ? "
"आत्म कल्याणासाठी हे सारं करायला हवं.हे पर्वच आहे मुळी त्यागाचे !"
"आणि काकीसा , सासुमॉनं तोंडाला लावण्याच्या मुहपत्या गरम पाण्यात स्वच्छ धुऊन त्यांच्या आठ घड्या करून ताटावरचं वाळवत ठेवल्या होत्या .मला समजत नाही. नेमक मुहपतीच्या आठच घड्या का?"
काकी सासूमॉ विचारात गढल्या होत्या. स्वप्नालीच्या प्रश्नानं त्या मौन झाल्या होत्या. त्यांच्या मौनानं स्वप्नालीचा जणू श्वास कोंडला. कॉलेजमध्ये शिकत असताना नेमीने सांगितलेला अनेकांतवाद तिला तिच्या बुद्धीला आव्हान देणारा वाटला होता. पण सासुमॉचं असं तिरकस वागणं....! तत्वज्ञान वेगळं आणि धर्म वेगळा. विचार वेगळा आचार वेगळा असाच वाटतं होतं. कुठंतरी पाणी मुरतंय. या विचारातच स्वप्नाली , "काकीसा प्लीज " पर्युषण पर्वा बद्दल, सामायिक बद्दल सांगा ना!.
"स्वप्नाली , सामायिक करण्यानं, जप करण्यानं, उपवास करण्यानं अंतर्मनात समतेचे भाव निर्माण होतात. मनाची एकाग्रता वाढते. तोंडाला मुहपती बांधून सामायिक केल्याने वायुकाय जीवांना संरक्षण ही मिळतं बरं. ..!
"ते कसं बरं..?"
"अगं, म्हणून तर या कोरोना काळामध्ये कोरोनाच्या विषाणूला जीवदान देण्यासाठी व स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तोंडाला मास्क बांधला जातो. लक्षात येते ना तुझ्या...? मुहपती किती महत्त्वाचे आहे...? अख्या जगानं जैन धर्मामध्ये अंगीकारलेल्या या मुहपतीचा अंगीकार मास्क म्हणून केला आहे"
"काकीसा, मी बोलू का ...?आपण रागे तर भरणार नाही ना? "
" तू बोल तुझ्या मनात जे असेल ते बोल. मला नाही राग येणार. कशासाठी तुझा राग धरायचा? बिनधास्त बोल ".
जरा भीत भीतच स्वप्नाली बोलू लागली.
"काकीसा, आपल्या घरात एकें द्रिय जिवापासून प्रत्येक जीवाचा विचार केला जातो. परंतु परजातीय घरातून आलेल्या पंच इंद्रिय जिवाचा विचार होताना दिसत नाही."
स्पष्ट बोलणारी स्वप्नाली ,काकी सासूला विनयाने परंतु परखडपणे बोलून गेली.
तिच्या या बोलण्याने काकीसासूमा गांगारून गेल्या.
स्वप्नाली तू काय म्हणते ते मला कळलं नाही . "
" आपल्या घरातील आचार मला खूप आवडला. परंतु विजातीय घरातील , सून म्हणून आलेल्या पर घरातील पंच इंद्रिय असलेल्या मुलीला अशी वागणूक. ... ! माझं नेमी वर प्रेम होतं. आहे .म्हणून मी माझ्या आई-वडिलांना सोडून तुमच्या घरामध्ये आले. मला फक्त प्रेम हवय तुमचं ...! स्वप्नालीचे हे सांगता सांगताच तिचे डोळे पाणावले. तिला भरून आलं आणि काकीसासूला ती बिलगली..! माजघरात तिच्या सासुमा हे सार ऐकत होत्या. त्यांच्या मनात गुरु महाराजांच्या प्रवचनाने ,सत्तविचाराने मनातली पोकळी कमी झाली.आणि समभाव ठेवून भगवान महावीरांनी सांगितलेल्या अनेकांतवादांने प्रेम, आपुलकी, माणुसकी या शब्दातून व्यक्त होत असलेल्या भावना....!दोघीमधील निखळ उत्कंठांचे नाते... उमळून आले. हे नाते जेथे असते तेथे प्रीती असते. समभाव असतो. गुरु महाराजांच्या सतत सांगण्याने. प्रवचनातून समस्यांचा समाधान होत असतानाच. नकाराचे कप्पे उजळूण विश्वास जागृत करण्याची खूप मोठी प्रेरणा मिळाली. प्रत्येक प्रवचनात नव चैतन्याची कारंजी भरून जगण्यासाठी संयम धारा, जगण्याच्या तत्त्वाची निष्ठा दृढ करते. खरोखरच आज मी धन्य झाले विवेक शून्य दुबळ्या संघर्षामुळे हे सार घडलं. या विचारातच धार्मिक वृत्तीच्या असणाऱ्या या सासूमाने आत येऊन तिला, जवळ घेतले. आलिंगन देत देत अश्रूधारांनी दोघी ही नाहून निघाल्या. जणू बृहत्कल्पसूत्रा मध्ये सांगितलेला अन्तानुबंधी
कशायाचा जणू क्षयच करून गुरु महाराजांनी दिलेला उपदेशाने हे सारे घडलं. आमच्या सर्वांच्या मनाला आनंदाची झालर लावून घरात हर्ष भरा जल्लोष झाला.
या साऱ्या आठवणी काकीसा बिन्नी पर्युषण पर्वात स्वाध्याय वाचण्यासाठी जाऊन आलेल्या आपल्या पतीला हे सारं सांगत होत्या.
शब्दांचे अर्थ
जैन भगवती दीक्षा
बेटक्याची पिशवी-, सामायिक व्रत करण्याची साधने ठेवण्याची पिशवी
* पुंजनी- सामायिक करताना सुती दोऱ्याने तयार केलेली कुंचल्यासारखी
* 32 वे आवश्यक सूत्र -बत्तीसावे आगमसूत्र प्रतिक्रमण ग्रंथ
* पाठशाळा -धार्मिक आध्यात्मिक शिक्षणासाठी स्थापन केलेली
* पर्युषण पर्व - आठ दिवस साजरे केले जाणारे अध्यात्मिक पर्व
* लीलोती- हिरव्या पालेभाज्या
* बगार देणे - फोडणी देणे
* आठई - आठ दिवसाचा निरंकार उपवास
* बृहकल्पसूत्र - 32 आगम मधील एक आगमाचे नाव
* अन्तानुबंधी कर्म-, अंत न होणाऱ्या कर्मांचे बंध बांधणे, अनंत भावाचे बंध