अनुभव कथन भूकंपग्रस्त शिक्षण संक्रमणासाठी
भाग-2
अनुभव कथन- लेख- शिक्षण संक्रमण
हे अनुभव कथन भूकंपग्रस्त वर्गातील सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या शैक्षणिक प्रयोग शाळेतले आहेत.
सौ.सुरेखा कटारिया
मा उपप्राचार्य भारतीय जैन संघटनेचे विद्यालय
'आनंद सर्व्हे नं. ६०,१ अ विजलीनगर चिंचवड पुणे ३३
Email ID : katariyasurekha@gmail.com / मो.न.९८२२७४५०३०
आता भूकंपग्रस्त मुले चांगली रूळली होती. कार्यानुभव या विषयांतर्गत मेंहदीचे कोन तयार करण्याचे प्रशिक्षण मुलांना दिले. टाकाऊ प्लास्टिकच्या कागदापासून टिकाऊ आणि उपयुक्त असे मेंहदीच कोन तयार करत असताना मुलाचा उत्साह मी माझ्या डोळ्यांनी अनुभवला होता. मुलांना मेंहदीचे कोन शिकवले. मेंहदीच्या डिझाईन शिकवल्या आणि हा तुमच्या उत्पन्नाचा मार्ग कसा बनू शकतो हे समजावून सांगितले असता,इ. ९वीच्या वर्गातील उत्साही विद्यार्थ्यांनी कोन तयार करून नागपंचमीला वर्गातल्याच मुलीना विकले. बाजारातील कोनाच्या तुलनेने उत्कृष्ट असणारा जास्त मेंहदीचा कोन कमी किंमतीला आपल्या विद्यालयातच मिळाला. त्यामुळे मुली ही खूश होत्या. व मुलांनाही त्यामध्ये चार पैसे मिळाले. पुढे प्रतिवर्षी वर्गातील मुले आणि मुली स्वतः कोन बनवून आपल्या आजुबाजूच्या राहणा-या लोकाना देऊ लागले.त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन कृतीचा आनंद मिळालाच पण आर्थिक फायदाही झाला.गांधीजींच्या मूलोद्योग शिक्षण पध्दतीविषयी शिक्षण तज्ज्ञ जॉन डुई यांनी काढलेले उद्गार मला आठतात. ते म्हणतात,"गांधीजीची शिक्षण पध्दती ही इतर सर्व शिक्षण पध्दतीच्या पुढचे पाऊल आहे." हे मला खात्रीने वाटते. तिच्यात प्रचंड सुप्त सामर्थ्य आहे. हाच धागा भारतातील काही राज्यांनी अचूकपणे हेरला. मद्रासमध्ये याच धर्तीवर कृतीयुक्त अध्ययन कार्यकम महाराष्ट्रात मुंबईसारख्या काही ठिकाणी, पुणे जिल्हयात भोर तालुक्यात व पिंपरी चिंचवड येथील ज्ञानप्रवोधिनी विद्यालय, भारतीय जैन संघटनेचे विद्यालय यांनीही कृतीयुक्त अध्ययन कार्यक्रमाची प्रायोगिक तत्त्वावर सुरूवात केली असून त्याची अंमलवजावणी यशस्वी होत असताना दिसते. आणि म्हणूनच समाजामध्ये सुद्धा अशा उपक्रमादिष्टित शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा व पालकांचा जास्त ओढा दिसतो. अशा प्रकारच्या कृतीशील अध्ययनाने विद्यार्थ्यांचे अध्ययन समृध्द होऊन ते ज्ञान चिरकाल टिकते.
अशाच प्रकारचा दुसरा उपक्रम राखी बनविणे, पणत्या बनविणे, जुन्या कपडयाच्या पायपुसण्या बनविणे, भेटकार्ड बनविणे, भेट पाकिटे तयार करणे, रांगोळीचे छाप बनविणे, रूमाल तयार करणे, तोरण बनविणे, भिंतीवरील शोपिस बनविणे, ऑरगंडीच्या फुलांचे बुके बनविणे, पुष्परचना शिकविणे इ. विविध उपक्रमातून कार्यानुभव,मूल्यवर्धन,व्यक्तिमत्त्व विकास,पर्यावरण,विज्ञान,भूगोल या विषयाच्या अंतर्गत राहून मुलांना कृतिशील शिक्षण देण्याचा आमचा नेहमीच मनोदय असतो. या विविध उपक्रमांतुन विद्यार्थ्यांना आर्थिक सोर्स निर्माण होऊन त्याच्या व्यवहार ज्ञानामध्ये भर पडून शिकणे ही क्रिया उत्साहवर्धक होते.
आज विद्यालयाचे किती तरी विद्यार्थी राखी, मेंदीचे कोन, रांगोळीचे छाप, रांगोळी विकून आपला दैनिक खर्च भागवण्याचा प्रयल करत आहेत. 'पुष्पा माळी' या विद्यार्थिनीने आपले शिक्षणसुध्दा अशा आर्थिक सोर्सच्या जोरावर पूर्ण केले आहे. विद्यार्थी सतत कार्यमग्न राहिल्यास तो सकारात्मक दृष्टीनेच विचार करतो. जीवन अतिशय सुंदर आहे.आणि ती सुंदरता प्राप्त करण्यासाठी धडपड करणे. नितांत गरजेचे आहे. हे विद्यार्थ्याच्या लक्षात येते आणि ती नकारात्मक दृष्टीने कधीच विचार करत नाही. असा माझा स्वतःचा अनुभव आहे. या ठिकाणी मला एक जपानी कविता आठवते.
" जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पाहायचय,
ज्या शत्रूचा पराभव कोणी करू शकत नाही,
राग,व्देष,मत्सर या शत्रूना मला हारवायचे आहे.
जे दुःख सहनशीलतेच्या पलिकडचे आहे,
ते दुःख मला सहन करायचे आहे.
ज्या ठिकाणी धाडणी माणूस
जाण्याचं धाडस करू शकत नाही.
त्या ठिकाणी मला जायच आहे.
ज्यावेळी माझे हात पाय थकलेले आहेत
त्यावेळी मला समोर एव्हरेस्ट दिसत आहे.
त्यावेळी मला माझं एक एक पाऊल एव्हरेस्टच्या दिशेने टाकायचे आहे.
तो स्टार मला गाठायचा आहे. तो गाठण्याचा माझा निश्चय आहे.
मला संघर्ष करायचा आहे, मला नरकात जावं लागलं तरी चालेल
-पण त्याला कारण स्वर्गीय असायला हवं."
अशा प्रकारच्या भावभावना व्यक्त करणारी मुले आजपर्यंत जीवनात अनेक येऊन गेली. या शैक्षणिक गुलाबाच्या झाडांना माणुसकीच्या फांद्या फुटू लागल्या आहेत. जेव्हा अनपेक्षितपणे एखादा विद्यार्थी गाडीतून उतरून रस्त्यावर पायी चालणाऱ्या शिक्षकांना पदस्पर्श करतो,नतमस्तक होता,तेव्हा आम्हा शिक्षकांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. एकदा का मुले स्वतःला ओळखू लागली की ती स्वतःचे भवितव्य घडवू लागतात. स्वतःचा उत्कर्ष साधू शकतो. त्याचवेळी आपले कुटुंब,समाज,राज्य,देश यांचाही उत्कर्ष होत असतो. म्हणून स्वच्या जाणीवेचे बीज विद्यार्थ्यामध्ये चांगल्या पध्दतीने रुजविण्याचे काम आम्ही शिक्षक करत आहोत.
हे रूजवत असताना 'स्व' बरोबरच समाजातील बाहय स्थितीचीसुद्धा जाण मुलांना करून दिली पाहिजे.यासाठी आम्ही मुलांना मेळघाटच्या कुपोषित मुलांबरोबर, झोपडपट्टीतील मुलांबरोबर,अनाथाश्रमातील मुलांबरोबर,अंधआश्रमातील मुलांबरोबर,मूकबधिर मुलांबरोबर,राहून त्याची सुख दुःखे जाणून घेण्याचा नेहमीच प्रयत्न केला.
आपल्या अवती भोवती असणाऱ्या निसर्गाच्या पर्यावरणाकडे त्यांचे लक्ष वेधून आम्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण ऱ्हासाची जाण देऊन, पर्यावरण राखण्यासाठी नेहमीच प्रेरित केले. मुले ही मराठवाडयातील होती. परंतु या पुण्याच्या विद्येच्या माहेरी राहून बऱ्यापैकी पुणेरी होऊ लागली होती. वसुंधरेचे पर्यावरण राखण्यासाठी त्यांना अनुजा गडगे मॅडम यांनी लिहिलेली एक प्रतिज्ञा दिली. 'वसुंधरा हेच एक माझे विश्व आहे. या वसुंधरेचे पर्यावरण राखण्यासाठी मी वचनबद्ध राहीन.माझ्या वसुंधरेवरील वनस्पती, प्राणी ,स्वच्छ पर्यावरण राखण्यासाठी मी सदैव प्रयल करीन.'
अशा प्रतिज्ञेने विद्यार्थी पर्यावरणाशी जोडत असतानाच, हरित सण साजरे करणे, शिड बैंक स्थापन करणे, शालेय रोपवाटिका तयार करणे, वाढदिवसानिमित्त झाडे लावणे इ. पर्यावरण राखण्याच्या दृष्टीकोनातून प्रयल केले जातात. हे काम करताना मुले अतिशय उत्साही दिसतात. त्यामुळे मुलांचे अध्ययन व अध्यापन दृढ होण्यास चांगलीच मदत होते.
१९९८ ची गोष्ट. या भूकंपग्रस्त मुलांबरोबर स्थानिक मुलांना व मुलींना प्रवेश देण्यात आला. आता मात्र विद्यालयाचे वातावरण पूर्वीपेक्षाही अधिक उत्साही वाटू लागले.
सणांची धार्मिक अधिष्ठाण व पर्यावरणाचा समतोल हा निबंध लिहून आणण्यास सांगितला.मुलांनी वटपौर्णिमा,दसरा,महाशिवरात्र,गुढीपाडवा इ.सणाची माहिती लिहीत असताना या सणांसाठी वापरल्या जाणाऱ्या आपटा,वड़,कडुलिंब यासारख्या झाडाच्या फांदया पानांचा उपयोग करून या झाडांची कत्तल केली जाते व प्रदूषणही वाढते. त्याला आळा घालण्यासाठी सणवारांना झाडे तोडण्यापेक्षा झाडे लावून सण साजरा करण्याचा विचार मुलांनी आपल्या लेखणीतून मांडला.म्हणजेच स्वच्या जाणीवेबरोबरच पर्यावरणाची जाण देण्याचा प्रयल आम्ही शिक्षकांनी केला.
मुलांना स्वची जाणीव होत होती.परंतु या ‘स्व’ बरोबरच स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्यातून प्रगल्भता यावी या दृष्टीकोनातून आमची वाटचाल चालू होती.एखादा शिल्पकार ओबड धोबड दगडातून सुंदर मूर्ती घडवण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्याचप्रमाणे आमचे हे ज्ञानदानाचे कार्य सुरूच होते.
आपण हे करूयात, ते केले ते शक्य आहे, हे होऊ शकते. या सकारात्मक विचाराने प्रयल करणारी शिक्षण क्षेत्रातील काही मान्यवर मंडळी मी पाहिली आहेत. माझी ही श्रध्दा अशीच आहे की नकारात्मक बोलण्याचे परिणाम नकारात्मकच होतात. व सकारात्मक बोलण्याचे परिणाम होकारात्मकच होऊन क्रियाशीलदृष्ट्या यशाचे होतात. शिक्षण क्षेत्रात सतत होकारात्मक विचाराचा धागा असायलाच हवा. म. फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, वा. न.अभ्यंकर गुरूजीसारखी, शांतिलालजी मुथासारखी शिक्षणासाठी उभे आयुष्य खर्च करणारी, विचारसरणीची क्रियाशील, आशावादी दृष्टी ठेवून कार्य करत असल्याचा इतिहास आपल्या समोर आहे. म्हणूनच प्रश्नांनी संवाद साधत मार्गक्रमण करणे हे सूत्र शिक्षक,पालक, चालक यानी ध्यान व भान ठेवून कर्म केल्यास 'मनुष्य घडणीची' क्रिया चांगल्या पद्धतीने झाल्याशिवाय राहणार नाही .
आपणास ठाऊक आहे शिक्षण क्षेत्रात स्वल्पविराम असतात,अर्धविराम असतात, पण पूर्णविराम नसतात. राष्ट्रीय पातळीवरील नवे शैक्षणिक धोरण आले. त्यात पुनर्रचित अभ्यासक्रम आला. सेवांर्गत प्रशिक्षण योजना आली. विषय समित्यांचे कार्य गतिमान झाले.विषयावर हस्तपुस्तिका आल्या. मूल्यमापनाच्या श्रेण्या बदलल्या. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक अशा रचनांचा स्तर झाला. एकूणच शिक्षणाच्या क्षेत्रात हालचाली वाढल्या,शैक्षणिक संस्थांमध्ये वाढ झाली असली तरी मूल्यसंवर्धन होण्याऐवजी त्याची घसरण झालेली दिसते. म्हणूनच माणसे ज्ञान संपन्न होत आहेत. पण चारित्र्य संपन्न माणसाची संख्या घटत आहे.त्यामुळे मनुष्य निर्मितीसाठी अनेक गतिरोधक निर्माण झाले आहेत. त्यामुळे शाळाशाळातून सरकार वर्गाची गरज भासू लागली आहे.म्हणूनच मा. शांतिलालजी मुथा यांनी "मूल्यवर्धनाचा नियोजनबध्द असा उपकम सुरू केला आहे. तो बीड जिल्हयात प्रत्येक शाळा शाळांमधुन राबवला जात आहे. कारण मा. शांतिलालजी मुथा यांचे मत आहे, सतत नकारात्मक बोलून कामे होत नाहीत. त्यासाठी संयमाने, शांतीने योजनापूर्वक नियोजनबध्द कामे करण्याची गरज आहे."
या सगळ्या गोष्टींचा विचार करून विद्यालयात सतत नवीन नवीन उपकम राबविण्याचे काम आम्ही शिक्षक करतो.
आमच्याच विद्यालयातील निखिल नावाचा विद्यार्थी वय १३,१४ वर्षाचा असेल परंतु त्याची समज प्रौढ माणसांएवढी मोठी आहे. हा मुलगा स्वावलंबी असून गृहपाठ लेखन, शाळेला येणे, कपडयाची स्वच्छता या सर्वात तो नियमित व वक्तशीर होता. परंतु सकाळी पेपर वाटण्यासाठी व शाळा सुटल्यानंतर एका हॉटेलमध्ये कप बशा धुवून ऑर्डरनुसार चहा पोहोचवण्याचे काम तो करत होता. निखिलची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्याने वर्गशिक्षकाला अर्ज करून सकाळी शाळेत उशीरा येण्याची परवानगी घेतली होती. आम्ही ते मान्य करून त्याला परवानगी दिली. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे हे आम्ही जाणतो. कारण कष्टाने त्याच्या जाणीवेचा विकास होत होता. आता त्याला काहीही अडचण आली तरी आम्ही त्याला मदत करतो. शिक्षणाने या आंधारातून मार्ग काढीन. असा पक्का त्याला भरोसा वाटत होता. हे सारं परिवर्तन एका दिवसाचं नव्हतं. त्यासाठी कथाकथनाच्या माध्यमातून प. पु. साने गुरूजी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घरची गरीबी आणि समस्या यावर मात करून स्वावलंबनाचे शिक्षण कसे घेतले. हे लहानपणापासुन आम्ही जे बिंबवले त्यामुळेच निखिल नावाचा हा विद्यार्थी परिस्थितीची जाण ठेवून घडत गेला. एक चांगला मनुष्य घडण्याची क्रिया योग्य पध्दतीने सुरू झाल्यामुळे असे किती तरी विद्यार्थी घडले गेले. असे जरी चांगले विद्यार्थी घडवण्याचे काम अनेक शाळा करत असतील तरी सुद्धा अनेक बाल गुन्हेगार होण्यासाठी शाळा व विद्यालये कारणीभूत ठरलेली दिसतात.प्रतिवर्षी इ.१०वी आणि १२ वीच्या निरोप समारंभासाठी आम्ही हजर असतोच.२००५ चा निरोप समारंभ अजुनही माझ्या स्मरणात आहे. समारंभात टाळया, आनंद्, हास्य याने वातावरण भरून गेले होते. परंतु हे भरत असतानाच काही विद्यार्थी आपले भाव व्यक्त करण्यासाठी उभे राहिले होते. त्यांचे भाव शब्दांत व्यक्त न होता डोळयातल्या अश्रुनीच सारे काही सांगितले. बोलण्यापेक्षा स्फुंदतच होते. 'भक्ती सवाणे' नावाची विद्यार्थीनी अधिकच गहीवरून बोलत होती. निरोप समारंभात बोलण्यासाठी मी उभी राहीले.शालांत परीक्षेत पास व्हा. असा आशीर्वाद दिला व नापास झाले तरी पुन्हा परीक्षेस बसा. प्रयत्न सोडू नका 'प्रयत्नांती परमेश्वर' हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनी निरोप दिला आणि तब्बल तीन महिन्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला.नेहमी प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना एका हॉलमध्ये घेऊन या निरोपाच्या भाषणानंतर शालांत परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू लागले. 'भक्ती सवाणे' नावाची विद्यार्थीनी अतिशय चुणचुणीत विनयशील परंतु गणित हा विषय राहिल्यामुळे तिच्यावर नापास हा शिक्का बसला होता. ती हिरमुसली होती. पास झालेल्या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत होत होते. भक्ती सारखी अजुन काही मुले नापास झाली होती.काहीनी खूप मनास लावून घेतले होते. काहीनी 'ठिक है यार' 'चलता है यार' 'ऑक्टोबर को देखेंगे' असं म्हणून मनाच समाधान करून घेतलं होतं. पास झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच नापास झालेल्या विद्यार्थ्यांची वेगळी मिटींग घ्यावी व त्यांना मार्गदर्शन करावे असे मला सतत वाटत होते. अशा विद्यार्थ्यांना बोलवून त्यांना मार्गदर्शन करण्याचे ठरविले. भक्ती नापास झाली होती. खूप उदास झाली होती. त्यांच्याशी संवाद साधू लागले. "मुलांनो नापास झाले,म्हणून काय झाले. पुन्हा परीक्षेस बसा. नापास होणाऱ्यात सुद्धा गुणवत्ता असते.नाराज होऊ नका.शाळेचा नाद सोडू नका.आपल्यातले गुण शोधा. आपल्यात देखील उद्याचा एक चांगला माणूस दडलेला आहे. हे लक्षात ठेवा."
मुलांनो, दर वर्षी १०वी १२वी नापास होणाऱ्या मुलांची संख्या १० लाखापेक्षाही जास्त असते. कारण या परीक्षांचे निकाल ५०% सुद्धा नाही म्हणजे मुलांचे अर्धे जग अंधारात व शिक्षकाची ५०% बाजु अंधारात आहे. त्यामुळे तुम्ही एकटेच नापास झाले आहात हा विचार सोडून द्या. कसलीही गरज लागली तर आमच्याशी संपर्क साधा. या वक्तव्याने मुलांना धीर आला आणि पुन्हा जोमाने कामाला लागली. त्यातील भक्ती सवाणे हीने कला शाखा निवडून पुढे चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली. व पिंपरी चिंचवड येथील 'श्री' चॅनलवर ती वृत्त निवेदिका म्हणून काम करत आहे. विद्यालयात असताना 'कार्यकमाचे सूत्र निवेदन' करण्याच्या कलेचे पोषण आणि भरण विद्यालयात झाल्यामुळे या गुणाच्या आधारावर ती आज चांगली वृत्तनिवेदिका म्हणून कार्य करताना दिसते. तिची आम्ही विद्यार्थ्यांसमोर मुलाखत घेतली असता तिला विचारले "तू नापास झाली तेव्हा तुझ्या मनात काय विचार आले ."
भक्ती म्हणाली "नापास झाले तेव्हा मला खूप वाईट वाटले परंतु विद्यालयातील शिक्षकांनी मला योग्य मार्गदर्शन केल्यामुळे व मी जर पास झाले असते तर मी इंजिनिअर किंवा डॉक्टर इकडेच वळाले असते.माझ्यात असणाऱ्या कलेला त्यामुळे वाव मिळाला नसता. व मनासारखे काम करू शकले नसते. नापास झाल्यामुळेच मी कला शाखा निवडू शकले व माझ्यात असणाऱ्या गुणांचा योग्य असा उपयोग माझ्यासाठी व समाजासाठी करू शकले नसते."
तिच्या या बोलण्याने सारे विद्यार्थी विचारात पडले. हे पाहून मी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व म्हटले "मुलांनो जे होते ते चांगल्यासाठीच." ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी यांच्या शाश्वत असणारी नीतिमूल्य यांच्यावर दृढ विश्वास वाढवण्याचं जबरदस्त काम आम्ही शिक्षक करत आहोत.
अरे माणसा माणसा कधी होशील माणूस...!या बहिणाबाईंनी विचारलेल्या प्रश्नाला सक्रियतेन सकारात्मकतेन उत्तर देण्याच काम शैक्षणिक संकुलन भारतीय जैन संघटना व आणि शिक्षक करीत होतो.करीत आहोत.
स्नेहसंमेलन,काव्य संमेलन, साहित्य संमेलन, नाट्यछटा, स्पर्धा, नाट्यछटालेखन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदिंडी, चर्चासत्रे, प्रश्नमंजुषा, विविध विषयावरील परिसंवाद असे एक नव्हे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांच्या घडणीसाठी आम्ही राबवलेले आहे त्यातूनच अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संकल्पना पुढे आली आणि या साहित्य संमेलनामध्ये अनेक दिग्गज लेखकाने कवींनी कवयित्रींनी हजेरी लावली.
आजपर्यंत 15 अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संम्मेलने घेण्यात आली आहेत. अकराव्या स्त्री साहित्य संमेलनाचे उद्घाटन मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला.
क्रमशः