कथा गोंदन जडणघडणीच्या वयात
दिवाळी अंक गोंदणसाठी समकालीन मराठी जैन कथा -
*जडणघडणीच्या वयातच… !*
लेखिका सौ. सुरेखा कटारिया - मा. उपप्राचार्य भारतीय जैन संघटना चिंचवड पुणे, 33.
मो नं. 9822745030
----------------------------------------
निर्झरा, “अगं मोक्षा आश्रमातील अनाथ मुलांची आणि वानप्रस्थ आश्रमातील आजी आजोबांच्या व्यथांची कथा जाणली, की मग आपलं दुःख अगदी हलकं होतं.स्वतःला सावर."मोक्षा तुला एक प्रश्न विचारू?"
मोक्षा,“हो विचार ना. "
“ कोंबडीचं नाव काढताच तू एवढी का चवताळून उठतेस?”
"या वाक्यानं मोक्षा सैरभैर झाली. निर्झरा, या प्रश्नाच्या अवतीभवती माझ आयुष्य गुंतल आहे. लग्नाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या घटनेनं अनेक आघात एका मागून एक होऊ लागले. संकटांनी जणू माझ्याकडेच मोर्चा वळविला. हे बोलता बोलता मोक्षा भूतकाळात केव्हा गेली तिचे तिलाच कळालं नाही.
"निर्झरा शाळेत,विद्यालयात असताना मी खूप अभ्यास करत नव्हते;पण प्रत्येक परीक्षेमध्ये माझा नंबर यायचा.बऱ्याच जणांना माझा हेवा वाटायचा. तारुण्याच्या पाऊलखुणा मागे सोडत असताना भविष्याची सोनेरी स्वप्न मला साद घालू लागली.मना सारखा जोडीदार मिळावा आणि घरात घातल्या जाणाऱ्या बंधनाच्या जाचातून मुक्त व्हावं.अशा तारुण्य सुलभ भावना मनात येत होत्या.
"कसली बंधन मोक्षा? "
माझ्या बाईकडे बेल्ह्याला घरात मौन पाळून ही एकमेकांच्या मनाला जाणणारा संवाद मागे पडला होता.या धार्मिक घरात 'माणूस मिथ्या सोन सत्य' हे ब्रीद घरातील प्रत्येकाच्या मनात होतं.पैसा मिळाला की सगळी सुख भर भरून येतात.असा समज होता. घरात फक्त पैसा बोलत होता. मनं मात्र मुकी झाली होती.घरात माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता. घरात आम्हाला आमची मतं मांडू दिली जात नव्हती. नीट बोलू दिलं जात नव्हतं. त्यामुळे ओघवती किंचाळणं आलं.नीट गाऊ न दिल्यामुळे सुर बेसूर झाले.आम्हाला नाचू दिलं नाही,त्यामुळे पावंल घसरत गेली.आमच्या घराची जीवनशैली फक्त पैसा पैसा आणि पैसा याच्याशी सलगी करून सतत आम्हाला बंधनात ठेवणं चाललेलं होतं. दारिद्र्याचा कोरडा दुष्काळ जेवढा भयानक तेवढाच अतिविलासाचा ओला दुष्काळ ही भयावह...! हे झालं माझ्या घरातील भईजीच, काकाजींच, भैय्याचं वागण. या जाचाला मी कंटाळले होते. अशा परिस्थितीत विद्यालयात बरोबर शिकत असणारा 'राजेश' मला भेटला आणि त्याचा तो रुबाबदार चेहरा,राहणं.त्याचा लाघवी स्वभाव पाहून मी त्याच्या मैत्रीच्या जाळ्यात अडकले. मैत्रीचे रूपांतर जवळकी मध्ये आणि या जवळकी मधूनच आम्ही एकमेकांवर कधी प्रेम करायला लागलो.हे आम्हालाच कळलं नाही. प्रेमाला आसुसलेली मी...!
घरात कोणालाही न सांगता लग्नाचा निर्णय घेतला.पण या लग्नामुळे माझ्या जगण्यावर अनेक बंधन येतील असं मला त्यावेळी वाटलंच नव्हतं.
प्रेमासाठी ...! माझ्या वागण्यातला,चालण्यातला, माझ्या बोलण्यातला बदल माझ्या बाईच्या लक्षात आल्यानंतर;सतत गेली सोळा वर्षतप करणारी तपस्वी माझी बाई मला सांगायची"मोक्षा,या वयात बोलणं,विचार मांडणं सोपं असतं;पण प्रत्यक्षात कृतीत उतरवणं खूप कठीण असतं. आपले विचार आणि कृती यात समन्वय असायला हवा.जगत असताना ज्या ठिकाणी प्रेमानं दोन घास खाता येतील अशी पंगत हवी आणि हक्कानं मन मोकळं करता येईल अशा जोडीदाराची संगत आयुष्यात लाभली;तर जगण्यातली रंगत वाढते. मोक्षा नदीला काठाचं बंधन असतं म्हणून नदीच रूप नदीच राहतं.वाफेला बंधनात ठेवल्यामुळेच मोठी मोठी इंजन आणि रेल्वे ही त्याच्यावर चालतात बरं. "
मी ऐकून न ऐकल्यासारखं करत असे.आता माझ्या लक्षात येतं माझी न शिकलेली बाई अनुभवाच्या शाळेतून जगण्याचे धडे मला देत होती.
मला आठवतो तो दिवस...! आम्ही सगळे सूर्यास्तापूर्वी चोविहार करायला बसलो होतो.जेवता जेवताच भईजी बाईला म्हणाले,"आपल्या मोक्षाला सांगून राजस्थान मधील भिलवाड्या येथील पोरवाल या घरंदाज घराण्याचं उत्तम स्थळ आलंय. "
हे ऐकताच मी दचकले. आणि त्याच दिवशी राजेशच्या कानावर घातलं.हे ऐकून राजेश बेचैन झाला.लगेचच त्यान घरच्या लोकांना माझ्याबद्दल इति वृत्तांत सांगितला. त्याच्या घरच्यांनी सांगितलं अरे जैन समाजातील मुली संस्कारी असतात, पैसेवाल्याही असतात. ती मुलगी सून म्हणून आपण आपल्या घरी आणू. जैन समाजातली मुलगी आहे तर मग तिच्याशीच लग्न करायचं. हे मला राजेश अगदी कौतुकाने सांगत होता. मलाही त्याचं बोलणं खरं वाटलं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या घरच्यांनी मला सून म्हणून स्वीकारण्यासाठी होकार दिला.आणि लग्नाची तयारी... ! माझ्या घरात या गोष्टीबद्दल मी चकार शब्दही बोलले नाही.
खरं सांगू का निर्झरा ,तारुण्यातले विचार, आवडी निवडी वय परत्वे बदलतात,असं मला आता वाटत. कारण दोघांना ही एकमेकांच्या गुणांच आकर्षण शरीर भोगाची ओढ. निराळ्या भिन्न वातावरणात वाढलेलो. भिन्न जाती, धर्मातून आम्ही दोघे एकत्र आलो. पण....!
"एवढं बोलून मोक्षा मोठमोठ्यानं रडू लागली. "
"मोक्षा, स्वतःला सावर रडू नकोस. रडून प्रश्न सुटत नसतो"
"हो गं...!कळतंय मला.सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा.... मी माझा हट्ट सोडला नाही!खरोखरच म्हणतात ना, प्रेम आंधळ असतं. अगदी तसाच अनुभव मला आला निर्झरा.”
मी घरातून निघून आल्यानंतर बाईची,भईजींची काय अवस्था झाली असेल? याचा विचार ही माझ्या मनाला शिवला नाही. ज्या घरात अठरा वर्ष राहिले. लहानाची मोठी झाले. शारीरिक ओढीणं म्हणा किंवा घरच्या मोठ्यांच्या जाचाला व नकाराच्या सुराला कंटाळून म्हणा...!
त्यावेळी घरात सगळ्यांचा माझ्यावर असणारा पहारा ,हे करू नको, ते करू नको म्हणून सारखं डिवचणारी घरातली सारी मंडळी,वारंवार सूचना करणाऱ्या.. जैन स्थानकात जाण्यासाठी आग्रह. ..! माझ्या दादीजी - दादाजीचा तो कडक कायदा याला कंटाळले होते.
मला 18 वर्षे पूर्ण होताच माझ्या घरात घुसून मला नेण्यासाठी राजेश व राजेशच्या घरचे लोक आले. मी या क्षणाची वाटच पाहत होते. माझ्या घरच्यांनी याला विरोध केला असताना ही कसलाही विचार न करता मी राजेश बरोबर पोलीस बंदोबस्तात गेले मला आठवण झाली "ती रुक्मिणीला पळवून नेणाऱ्या कृष्णांची...! पण जेव्हा राधा यायची रुक्मिणीच्या जगण्यामध्ये तेव्हा मात्र तिच्या मनाची होणारी अवस्था आणि आज माझ्या मनाची होणारी ही अस्वस्थता वेगळी नव्हती.रथात बसून डौलदारपणे त्या कृष्णा सोबत जाणारी ती रुक्मिणी, तिलाही वाटत असावं केवढी मी भाग्यवान; पण नंतर तिला कळालं असेल ती एक अवस्था होती आयुष्यातली...!"माझ्या सारखी भाग्यवान जगात दुसरी कोणीच नव्हती.असं वाटत असणार तिला.ती धुंदी...!त्या धुंदीत कृष्ण मात्र धुंदवलेला दिसला नसेल तिला.कारण तो राधेत ही अडकला होता. अगदी तसंच माझही झालं होतं.”
राजेशची मैत्रीण मीनाक्षी; लग्न करून आम्ही घरात येताच अगदी लगड घालून त्याच्याशी बोलू लागली. घरातले ही तिला साथ देत होते.तिचं हे असंस्कृत असं वागणं मनाला जाचू लागलं.तेव्हा मी राजेशला विचारलं हे काय आहे?ही कोण?
तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरानं मी गोंधळून गेले.
"ती माझी प्रिय मैत्रीण आहे. जशी कृष्णाची राधा होती अगदी तशी ती माझी मैत्रीण मीनाक्षी आहे...!"
काय घडायला हवं होतं आणि काय घडत आहे.हे माझच मला कळत नव्हतं.
कोण होती ती ?"
मी जिवापाड राजेश वर प्रेम केलं आणि ही कोण. ..?
"मीनाक्षी"
'मीनाक्षी' या तीन अक्षराने मी गोंधळून गेले. राजेशकडे पाहतच राहिले. हाच का तो ज्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम केलं.सगळ्या मर्यादा तोडून, जात, धर्म, रुढी, परंपरा बाजूला ठेवून,सर्वांचा विरोध असताना घरातल्या सर्वांसमोर हाताला धरून मला घेऊन गेला.घरातील सगळे नको म्हणत असताना ही....!
बाई मोठी केविलवाणी होऊन मला अडवत होती."मोक्षा,नको जाऊस, मोक्षा थांब..!पुढे खूप मोठा खड्डा आहे गं...हे माझी तपस्वी बाई तळतळून मला सांगत होती.भईजी माझ्यावर जाम रागावले होते.चिडले होते.राजेशचे नातेवाईक साध्या वेशातील पोलिसांना घेऊन आले होते.राजेश मला घेऊन जाताना जरा बाचाबाची होऊ लागली, तेव्हा सासर्यांनी कोर्टात लग्न झाल्याचे कागद पत्र भईजींच्या समोर ठेवले. "
"अहो,अजून तिला 18 वर्षे झाले नाहीत. ती सुज्ञ नाही.असे भईजीं म्हणताच, सुज्ञ झाल्याचे कागदपत्र त्यांच्या तोंडावर फेकले."
त्यावेळी मला काय झालं होतं. ते माझं मलाच कळतं नव्हतं.मी राजेश बरोबर पोलीस बंदोबस्तामध्ये सासरच्या घरी आले.
दुसऱ्याच दिवशी देव देव, जागरण गोंधळाची तयारी सुरू झाली. त्यामध्ये कोंबड्या,बकरे आणून ठेवले होते. हे मला ठाऊकच नव्हते.घरात मात्र सगळे कुजबूज करून एकमेकांशी बोलत होते. कारण राजेशनं अगोदरच सांगितलं होतं. जागरण गोंधळामध्ये कोणत्याही प्राण्याचा बळी जाणार नाही. परंतु घरात आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध तो वागू शकत नव्हता.राजेशला ठाऊक होतं. हे मला चालणार नाही. जवळच असणाऱ्या दुसऱ्या घरात राहण्याची माझी सोय केली.
देवाची उपासना करणं म्हणजे मिथ्यात्व हे आमच्या मेहतांच्या घरातील संस्कारातून माझ्यापर्यंत पोहोचलं होते; परंतु मिथ्यात्व- सम्यकत्व असल्या शब्दांचे अर्थ राजेशच्या आकलन शक्ती बाहेरचे ...!तरीही राजेशच्या प्रेमाखातीर मी देवाला जाण्यासाठी,जागरण गोंधळा साठी मान्यता दिली.परंतु जेव्हा बकरीचा आवाज माझ्या कानी पडला आणि माझा हृदयाचा ठोका चुकला. मी घाबरले.राजेशन मला जवळ घेत सांगितलं."मोक्षा घाबरू नको. इथं कसला ही अनुचित प्रकार घडणार नाही.देव देव झालं,की आपण आपलं वैवाहिक जीवन जगण्यासाठी मोकळे झालो.
"म्हणजे ...? हे काय मी नाही समजले राजेश? "
मला आठवतय,"आमच्याकडे माझ्या भैय्याच्या लग्नानंतर घरात रातेजोगाईचे गीत म्हंटले होते.आमच्याकडे लग्न झालं की गुरू महाराजांच्या दर्शनाला घेऊन जातात.सर्व मोठ्यांच्या पगेलागून आशीर्वाद घ्यायचे. मगच माझ्या भैय्याच्या व भाभीच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली होती.'आणि हे काय?'
राजेश, “मोक्षा खरं सांगू का तुला, देवाच्या दर्शनानं भौतिक संपदा किंवा मोक्ष मिळत नसतो; पण परंपरेनं चालत आलेल्या आचार,रूढी या मोठ्यांच्या म्हणण्या प्रमाणे जोपासाव्या लागतात. माझ्या आईचं एवढंच म्हणणं आहे.मोक्षा,आपल्या नव्या संसारात शांतता-समृद्धी साठी ज्या रूढी परंपरा आलेल्या आहेत त्या जोपासून सामाजिक संबंध सलोख्याचे होण्यासाठी या पालन करायला हव्यात. असं केल्याने का कोठे धर्म भ्रष्ट होत असतो?"
तेवढ्यात बकरीचा ब्याsss ब्याsss आवाज आला.मी त्याला म्हटलं,"अरे हा बकरीचा आवाज ब्याssहाsss ,ब्याssहा sss!”
राजेश,"हे आपल्याकडे नाही बाजूला असणाऱ्या खाटीक खाण्यामधून आवाज येत आहे".असे सांगून मला शांत करण्याचा प्रयत्न करत होता.
माझी विवेक बुद्धी जागृत झाली.लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी जिवंत कोंबडी हातात उलटी पकडून माझ्यासमोर आणून टाकणारा माझा दीर आणि सासूचा आदेश की, “तूच बनवायची”.
माझ्या पायाखालची जमीन सरकली.काय करावं कळेना. आणि मला तीर्थंकर नेमिनाथांची आठवण झाली. स्वतःच्या विवाह प्रसंगाच्या भोजनासाठी निरापराधी प्राण्यांची हत्या होणाऱ या कल्पनेनच नेमिनाथांना वैराग्य आलं.आणि लग्न मंडप सोडून त्यांनी गिरनारचा मार्ग धरला.
संसाराची असारता, क्षणभंगुरता आगम ग्रंथातून,साहित्यातून अभ्यासली होती.उमजली होती.आचार्यांच्या प्रवचनातून ऐकली होती; परंतु कानाने ऐकनं आणि प्रत्यक्ष जाणणं आणि जाणून जगणं त्यात खूप फरक होता.हे आज मला जाणवत होतं.आणि त्याचबरोबर राजधानीत फेरफटका मारणाऱ्या राजपुत्र सिद्धार्थ आठवले. आंधळ्या,पांगळ्या,रोगी प्रजाजनांना पाहून संसाराची असारता त्यांना जाणवली होती. त्यामुळे वैराग्य भाव उदीत झाले होते. हे सार मला आठवलं वातावरण पाहून माझ्या शरीरावर,मनावर जी आंधळ्या प्रेमाची धुंदी चढली होती,ती धुंदी, ती झिंग हळूहळू उतरू लागली. वास्तवतेच दर्शन होऊ लागलं.ती धुंदी समुद्रातील भरतीसारखी तात्कालीन होती. भरती ओसरू लागली.आणि माझ्या भविष्याच्या संसार सागरातील ओबडधोबड खडक उघडे पडू लागले.घरातल्या लोकांचं वागणं,ओबड धोबड खडका प्रमाणे मला भासू लागलं.
मी ही निर्णय घेतला,ना बेल्ह्याला बाईकडे जायचं,ना ही कोल्हापुरात सासरी राहायचं.घरात कोणाला ही न सांगता गुपचूप कसलाही विचार न करता घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असतानाच माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली माझी जिवाभावाची बालपणीची मैत्रीण सोलापुरात राहणाऱ्या निर्झराची ….!
दोघींची मैत्री अगदी दाट सायी सारखी स्निग्ध...!एकीच्या पायात काटा टोचला तर दुसरीच्या डोळ्यात पाणी यावं. लग्नापूर्वीची मोक्षाची सारी प्रेम कहानी तिला ठाऊक होती.राजेश कसा चांगल्या मनाचा आहे. हे तिला ठाऊक होतं; परंतु....!त्याचं हे विपरीत वागणं त्रासदायक ठरत होतं. राजेशन व मी दोघांनी मिळून ठरविलेली जगण्याची अहिंसेचे तत्त्व बाजूला सरकवून स्वतःच्या घरातल्या रिती भाती परंपरा पाळण्यामध्ये तो गुंतला होता. याचा मला मनोमन खूप त्रास होत होता. कुठे येऊन फसले मी? अशा अनेक प्रश्नांनी माझे मन भंडावून गेले होते. निर्झरा, मला नेहमी सांगायची "संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे.ठेच सांगून जाते लक्ष कुठे आहे. डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे. स्पर्श सांगून जातात मनात काय आहे. आणि वेळ दाखवून देते जग कसे आहे." या सासरच्या नव्या जगात याची प्रचिती मला येत होती.
बेल्ह्यात चाललेल्या अनेक धार्मिक क्रियांची आठवण मला येत होती. त्यानुसार मी नवकार महामंत्राचा जप मनातल्या मनात सुरू केला.बाईनं सांगितलेलं आठवलं अशा बाकाप्रसंगी"ओम घंटाकर्ण मंत्राचा जप करायचा.मी मनोमन ओम घंटाकर्ण मंत्राचा जप करू लागले. काय आश्चर्य भिंतीच्या वळचणीवरून भला मोठा काळा भिन्न नाग खाली येऊन पडला. घरातले सगळे घाबरले. कोणाला काय करावं ते सुचेना.मी मात्र ओम घंटाकर्णचा मंत्र मोठ्यानं जपू लागले.तो काळाभोर नाग फणा काढून फूसs फूसss करत उभा राहिला.आणि घरातल्या प्रत्येकाची जणू टेहाळणी करून हजेरीच घेत होतो.जणू पार्श्वनाथ मला वाचवण्यासाठी तिथे आले. सगळ्यांची पाचावर धारण बसली. या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी मला मार्ग दाखवण्यासाठीच जणू पार्श्वनाथ भगवान आले होते.त्यांचा हा कौल शिरोधार्य मानून कोणालाही न सांगता पळ काढायचं मी ठरवलं.इथून कसा पळ काढता येईल.कसे जाता येईल याचा विचार करू लागले.जायला कुठेच रस्ता नाही. माहेरची वाट बंद झाली.काय करू?कसं करू?या विचाराने मी हैराण झाले.मन सैरभैर होऊ लागलं. मी पुन्हा ओम घंटाकर्णचा मंत्र जपू लागले.
माझ्या मनाने कौल दिला.आता इथे राहायचं नाही.आपलं सारं जीवन वयावच्च सेवेसाठी समर्पित करायचं.मनाला स्थिर करत आयुष्यभर ब्रह्मचारी व्रत पाळून भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा संदेश जीवनभर जगायचा...!मी सासरच्या घरात घडत असणारा इतिवृत्तांत निर्झराच्या कानी टाकला.
माझी उदासीनता पाहून राजेश मला समजवायचा,"बर का मोक्षा पाण्यात आणि मनात खूप साम्य आहे,दोन्ही गढूळ असतील तर दोन्ही आयुष्य संपून टाकतात.दोन्ही उथळ असतील तर धोक्याकडे ओढतात...!जर पाण्याला बांध घातला तर पाणी संथ आणि मनाला बांध घातला तर माणूस संत होतं.राजेशची वाणी एक आणि करणी एक याचा पडताळा मला येत होता.
मोठ्या शिताफिनं, घरात चाललेल्या गोंधळाचा फायदा घेऊन अंगावरच्या कपड्यानिशी मी पलायन केले.माझी जीवा भावाची मैत्रीण निर्झराकडे धाव घेतली.
सोलापूर मध्ये निर्झरा चालवीत असलेल्या वाणप्रस्थाश्रमात व अनाथ आश्रमात सेवा देण्यासाठी खूप काळजीपूर्वक,कोणालाही माहित न पडता मी रुजू झाले.
आज हे काम करत असताना मला आनंद तर मिळतोच.परंतु जेव्हा जेव्हा बाईची आठवण येते. तेव्हा बाईच्या सहवासातील ते क्षण आठवतात.किती रात्र झाली तरीही तिच्या खोलीत गेल्याची चाहूल लागून क्षणात जागा होणारा तिचा तो स्वर,“अजून झोपली नाहीस का ग..?”अशी विचारपूस करणाऱ्या माझ्या बाईच्या त्या वात्सल्याच्या ऊबेला मी पोरकी झाले.
निवांत क्षणी चिंतन करत असताना मी किती चुकीची वागले. राजेशच्या बाबतीत व त्याच्या घरातल्या लोकांच्या बाबतीत मला आलेली प्रचिती विचार करायला लावणारी . खरंच ….! बालपणातून तारुण्यात पदार्पण करताना पाकळी पाकळीतून उमलणार मन चहुबाजूनी फुलून यायला हवं. वाहणाऱ्या मंद झुळकांबरोबर त्याने सुगंधाची उधळण करताना देखील संयम राखून विवेक वृत्तीनं जगाव.यौवनाचा स्पर्श होताना सुद्धा प्रयत्नपूर्वक संयम राखून जो जगतो,वागतो.त्यांचं उमलन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करत.परंतु माझ्या सारख्या अविचारी चंचल मनाने पुढचा मागचा विचार न करता घेतलेला निर्णय माणसाला, होत्याचं नव्हतं करून टाकतो. या विचारांन व्याकुळ होऊन मी मात्र अस्वस्थ...!
माझ्या हट्टी स्वभावामुळे माझ्याबरोबर सर्वांनाच त्रास झाला होता.मलाही त्याचे दाहक चटके सोसावे लागत आहेत. याची जाण ठेवून मी सतत विवेक ठेवून वागू लागले.केवढा फरक होता,कोल्हापूरच्या मोहिते पाटलांच्या घरी व माझ्या माहेरी बेल्हायातील मेहताच्या आचारात- विचारात, रहें-सहें खाण्या- पिण्यात, राहण्यात तेवढ्यात पोस्टमन आवाज करत आला. आणि माझी तंद्रीच भंग पावली.
"पोस्टमन.!पोस्टमन..!! निर्झरा बाहेर गेली. पोस्टमनने बरीच पत्र निर्झरेच्या हाती दिली. साडीच्या पदराला हात पुसत पुसत अरिहंत ss अरिहंतsss चा जप करत एक एक पत्र वाचू लागली.त्यातील बरीच पत्रे माझ्या सांत्वन व अभिनंदनपर लिहिली होती. वाचता वाचता तिचे डोळे पाणवले.एका पत्रावर तिची नजर खीळली.पुन्हा पुन्हा ते एकच पत्र वाचले आणि वाचत असतानाच मला आवाज दिला."मोक्षा अगं हे पत्र तुझ्यासाठी आल आहे. जरा बघ तरी...!
“कोणाचं पत्र आहे ?"
“अगं तुझ्या भईजींचं.”
मोक्षा, “माझ्या भईजींचं…! काय भईजीच? "
तिने आधीरपणे पत्र जवळजवळ निर्झराच्या हातातून काढूनच घेतलं.
“अगं अगं थांब मोक्षा ते पत्र फाटेल."
मनातल्या मनात मोक्षा पत्र वाचू लागली.
अधीर होऊन निर्झरा म्हणाली, "अगं...मोक्षा ते पत्र मोठ्याने वाच मलाही ऐकायचं आहे."
मोक्षा लोकमत वृत्तपत्रात आलेली मुलाखत वाचली.
साठलेल्या भावना आश्रुवाटे झरू लागल्या जीवन कृत कृत्य झाल्यासारखे वाटलं. आमच्या इथे आलेली ही तुझी मुलाखत...!
*अनंत अनंत भव फिरून हामनुष्य जन्म मिळाला आहे. आत्म्याला झालेला कर्मबंध कर्मनिर्जनानेच नाहीसा होतो. आचार्य आनंदऋषींच्या प्रवचनामध्ये ऐकलेली अशी अनाकलनीय वाक्य मला अचानक आठवतात.कधी उमा स्वामींच तत्वार्थ सूत्र तर कधी कुंदकुंदचा समयसार वाचण्यातही तितकंच मन रमत जातं.जीवनात घडलेल्या वेगवेगळ्या प्रसंगाचे आत्मपरीक्षण करीत असताना समाजात अशा माझ्यासारख्या किती तरी मोक्षा स्वतःच्या आतताई स्वभावामुळे आयुष्यचा तुरुंग करून बसतात. अविवेकी वागण्यामुळे पंख मिटून घुसमटत आहेत. यासाठी लहानपणापासून केलेला अहिंसेचा संस्कार महत्त्वाचा… म्हणूनच घुसमटून मरण्यापेक्षा पंखातल्या बाळानिशी सर्वस्व पणाला लावून उडान करायचं ठरवलं.ते बाई भईजींच्या संस्कारानं, शिकवणीनं. स्वतःच आकाश आश्रमाच्या माध्यमातून शोधलं. पण सतत बाई- भईजींच्या आठवणीनं मन व्याकुळ व्हायचं.प्रत्यक्ष न दिसणार परंतु भूतकाळातील अनेक गोष्टी आपल्याबरोबर फरपटत नेणाऱ्या वादळी ऊर्जेसारखं हे मन,नेहमी बाईच्या कुशीत जाऊन विसावत असे.संवेदनानेच मनाचा विस्तार होतो.करुणेनं कार्याला खोली येते. त्यामुळे मनातल्या समृद्धीचा रियाज होतो. आणि तुला पत्र लिहायला बसलो.
जय जिनेन्द्र
“चिरंजीव मोक्षा तुला खूप खूप आशीर्वाद..!
वि. वि.
तीर्थंकरांच्या कृपेने आम्ही इकडे खुशाल आहोत; परंतु नेहमी तुझ्या उणिवेच्या जाणीवने मन उदास व्हायचे. जिनेश्वराच्या कृपेने वर्तमानपत्रातील तुझी बातमी, मुलाखत वाचली आणि मन भरून आलं. मोक्षा तुझा पत्ता लोकमत वृत्तपत्राच्या ऑफिस मधून मिळाला. त्यांना लाख लाख धन्यवाद..!
कारणही तसंच आहे. तू घर सोडल्यानंतर तुला हे पहिले पत्र लिहीत आहे. अहिंसेच पालन करण्यासाठी पूर्ण आयुष्य पणाला लावणारी माझी मुलगी मोक्षा,माझी कन्या,आमच्या जीवाचा तुकडा. ..! मोक्ष प्राप्तीसाठी तीर्थंकरांनी केलेलं कार्य तुझ्या नावाप्रमाणेच तू करत आहेस. तुझ्या उमलत्या वयामध्ये पैसा कमविण्याच्या नादात तुला पुरेसा वेळ आम्ही देऊ शकलो नाही. योग्य मार्गदर्शन करू शकलो नाही.फक्त बंधन घालून मुलांच्या जीवनात नंदनवन फुलत नसतं. हे उशिरा लक्षात आलं मोक्षा. तुझ घसरत गेलेलं पाऊल तू तुझ्या कर्तव्याने, पुरुषार्थाने व आम्ही केलेल्या संस्कारानं वेळीच सावरलं.म्हणून आज जिनशासनची सेवा करत आहे. काय उपमा देऊ आणि तुझं काय कौतुक करू हेच मला समजत नाही.
‘ पद्मश्री पुरस्कारासाठी निवड-मोक्षा बाहुबली मेहता.’
मोक्षा बाहुबली मेहता यांनी वानप्रस्थाश्रमातील केलेलं विशेष कार्य विचारात घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे देण्यात येणार आहे. या मथळ्याखाली आलेली वृत्तपत्रातील बातमी वाचली. तुझी मुलाखत वृत्तवाहिन्यांवर ऐकली, वाचली मन गलबलून आलं.तुला केव्हा भेटू असं झालं आहे. तुझी बाई, तुझी सारखी आठवण काढून रडत असते.'माझी मोक्षा माझी मोक्षा' .भगवान महावीरांची शिकवण तू आचरणात आणत आहेस.हे सारं वाचून,ऐकून आम्ही उभंयता तुला भेटायला सोलापूरला येत आहोत.भेटी अंती सर्व बोलू….
मोक्षा तुझं हार्दिक अभिनंदन...!
तुझेच भईजी… बाई...!
बाहुबली मेहता .
आज भईजींच पत्र...! माझा विश्वासच बसेना. पुन्हा पुन्हा पत्र वाचून.निर्झराला मिठीच मारली.
************************************************************************
जैन स्थानकवासी समाजातील विशिष्ट शब्दांचे अर्थ
मिथ्यात्व - खोट्या मान्यता
सम्यकत्व - समता भाव
नेमिनाथ - तीर्थंकर
वैराग्य भाव--- त्यागी जीवन जगण्याचे भाव
नवकार महामंत्र- विश्व कल्याणाची प्रार्थना
ओम घंटाकर्ण हा एक मंत्र आहे.
जिनेश्वरा-राग, द्वेष, मोह, माया यांना जिंकणारे
तीर्थंकर- राग, द्वेष, मोह, माया यांना जिंकून तीर्थाची स्थापना करणारे- साध्वी, साधू, श्रावक, श्राविका
उमा स्वामींच तत्वार्थ - उमा स्वामींनी लिहिलेला आगमग्रंथ तत्वार्थ
कुंदकुंदचा समयसार - कुंद कुंद स्वामींनी लिहिलेला समय सार आगम ग्रंथ
वर्ष तप- एक दिवस निर्जली उपवास एक दिवस पारण असं वर्षभर स्वीकारलेलं वर्ष तप सोळा वर्षाचे वर्षतप- लगातार सोळा वर्षे केलेली ही तपसाधना
कर्मबंध- केलेल्या कर्माचा झालेला बंध तो पुण्य बंध किंवा पापबंघ ही असू शकतो.
कर्म निर्जरा- केलेल्या कर्माची तपान आपल्या पुण्यकर्मान पाप बंधातून मुक्तता म्हणजे निर्जरा