जैन धर्म वैदिक धर्मातील फरक शलाका कटारिया
*जैन धर्म व वैदिक धर्मातील फरक*
शलाका,कटारिया-चोपडा
भगवान महावीरांचे जन्म कल्याण महोत्सव सादर करत असताना त्यांच्या विचारधारेचा अभ्यास करणे आणि समग्र सारा सार विचार करून त्यांचे आचार प्रणाली समजून घेणे महत्त्वाचं..!
माणसाचे जीवन उन्नत व्हावं त्यासाठी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही पाच व्रते त्यांच्या विचारधारेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
आपल्या देशाला प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला आहे. सध्या भारतात वैदिक, जैन, बौद्ध, शीख या देशात जन्मलेले धर्म प्रचलित धर्म तर मुस्लिम व ख्रिश्चन हे दोन्ही धर्म इतर देशातून भारतात आलेले आहेत.
डॉ. नलिनी जोशी जैन अगमाचा अभ्यासक यांनी अरिहंत जागृती मंच पुणे या पुस्तिकेमध्ये जैन धर्म वैदिक धर्माची शाखा का नाही याचे विश्लेषण केलेले आहे. त्या म्हणतात "जैन व वैदिक धर्माच्या इतिहासाचे तत्त्वज्ञानाचे आचार शास्त्राचे अवलोकन केले असता अनेक तथ्य नजरेसमोर येतात. वैदिक व जैन धर्मातील मूलभूत भेदाचेच मुद्दे प्रभावी आहे. ते वाचल्यानंतर तैलबुध्दी न्यायाधीशाच्याच काय
पण;सामान्य माणसाच्या ही लक्षात येते की जैन धर्म हा वैदिक धर्माची शाखा अगर संप्रदाय नसून एक पूर्ण वेगळा स्वतंत्र परंपरा असणारा धर्म आहे."
पुढे त्या म्हणतात, इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात होऊन गेलेल्या पतंजली मुनींनी व्याकरण- महाभाष्यात विरोधी जोड्यांची जी उदाहरणे दिली आहेत . त्यात श्रमण-ब्राह्मण अशी विरोधी जोडी दिली आहे.
नेमका यातील फरक काय आहे तर वैदिक धर्मात निसर्गाला देवता म्हणून पूजा होत होती. नंतर यज्ञयागप्रधान झाला.आरण्यक, उपनिषदकाळी तो चिंतन पर व आत्म्याला प्राधान्य देणारा. गीतेच्या काळात तो कर्तव्य कर्म प्रधान होता. पुराणकाळात तो देव देवतांच्या उपासनेवर आधारित व वृत्तवैकल्यात्मक बनला. या उलट जैन धर्म मात्र ऋषभ देवापासून महावीरांपर्यंत व महावीरांपासून आजतागाय तात्विक रूपाने तरी जसाच्या तसा राहिला आहे.
परंतु हे अभ्यासताना मनात अनेक समस्या उभ्या राहतात कारण जैन म्हणून घेणारे अनेक लोक यज्ञ करताना दिसतात.
वैदिक परंपरेत बहुतांशी चेतन व अचेतन या दोन तत्त्वांपैकी चेतनाला महत्त्वाचे स्थान दिलेले दिसते. तर अचेतनाला दुय्यम स्थान दिलेले दिसते. जैन दर्शनाने मात्र जीव व अजीव ही दोन स्वतंत्र तत्त्वे सारखीच महत्त्वाची मानली आहे.
*वैदिक धर्म क्रियाकांड प्रधान व प्रवृत्तीवर असून जैन धर्म निवृत्ती प्रधान व संन्यस्त वृत्तीची प्रशंसा करणार आहे.
*वैदिक धर्माने मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान आणि भक्ती सांगितली आहे. तर जैन धर्माने सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चारित्र्य हे मोक्षमार्गासाठी प्रतिपादन केलेले आहे.
*वैदिक धर्मातील शैव, वैष्णव इत्यादी सर्व पंथ विशिष्ट देवतांच्या भक्तीला महत्त्वाचे स्थान देतात. तर जैन दर्शनात मन, वचन, कायने केलेली आत्मशुद्धी प्रमुख मानली आहे.
*जैन धर्मामध्ये अहिंसा हा धर्माचा प्राण आहे. त्याचा सूक्ष्मतेने विचार केला आहे.जणू अहिंसा धर्म हा जैन धर्माचा पर्यायी शब्द ...!महाभारत, योगदर्शन इत्यादी ग्रंथात अहिंसेचे प्रतिपादन असले तरी जैन दर्शनाने अहिंसेला धर्माचा प्राण मानले आहे.
*सामान्य गृहस्थाने रोजच्या व्यवहारात आणण्याजोगी अनुव्रते व साधू साध्विंसाठी पूर्णपणे पालन करण्याची महाव्रते या दोन धर्माचा विस्ताराने विचार करून जैन धर्माने आपला व्यवहारिक दृष्टिकोन अधिक स्पष्ट केलेला दिसतो.
*कोणत्याही घटनेकडे गोष्टीकडे एकांगीपणाने व दुराग्रहाने न पाहता द्रव्य, क्षेत्र, काल, भाव असे चार निक्षेप जैन धर्माने सांगितले. त्यातूनच नयवाद, स्यादवाद, अनेकांतवाद क्रमाक्रमाने विकसित झाला.
वैदिक धर्म दर्शनामध्ये पृथ्वी,आप इत्यादी पंचभूतांची गणना जड तत्त्वे म्हणून केली आहे. जैन दर्शनाने त्यांना एकेंद्रीय जीव म्हटले आहे वनस्पतीकायिकांचा सूक्ष्म विचार जैन दर्शनात केलेला आहे.
मतिसुती अवधी, मती, श्रुती, अवधी, मन:पर्याय व केवल ज्ञान हे ज्ञानाचे प्रकार व त्याची सूक्ष्ममीमासा जैन दर्शनचे वैशिष्ट्य आहे.
वैदिक परंपरेत करता करविता ईश्वर मानल्याने कर्म विवेचनाला विशेष स्थान उरलेले नाही. परंतु जैन दर्शनाने कर्माला सर्वाधिक प्राधान्य दिल्यामुळे जवळजवळ स्वतंत्र कर्मशास्त्र ही शाखाच विकसित झाली. आज मी आज या कर्मशास्त्रास वाहिलेली कमीत कमी 25 ग्रंथ तरी उपलब्ध आहेत.
जैन धर्माचे वेगळेपण सिद्ध करणारे हे मुद्दे आहेत हजारो वर्ष भारतीय समाजाशी एकरूप होऊन वाढलेल्या जैन धर्माने काळाच्या ओघात इतर धर्मातूनही काही प्रथा संस्कार उचललेले असले, तरी तात्विक दृष्ट्या जैन धर्म निश्चितच वेगळा सूक्ष्म स्वतंत्र प्राचीन आहे.
साभार- जैन धर्म प्राचीन स्वतंत्र धर्म या अंकातून .डॉ. सौ नलिनी जोशी, पुणे.
संकलन सौ शलाका कटारिया- चोपडा.