महाराष्ट्रातील स्त्रियांची प्रगती झाली आहे का?"
"महाराष्ट्रातील स्त्रियांची प्रगती झाली आहे का?" मला वाटते प्रगती ही थोडी सापेक्ष कल्पना आहे,कारण प्रगती चे अर्थ पाश्चात्य देशांमध्ये कसे लावतात आणि भारतातल्या मातीत कसे आहेत हा सुद्धा एक चर्चेचा विषय होऊ शकतो. प्रगती म्हणजे काय? करिअर,पैशाने प्राप्त होणारी लौकिक श्रीमंती, शिक्षण, स्वातंत्र्य, जीवनाची सार्थकता, समाज म्हणून एक होऊन जगण्याची क्षमता असे अनेक पैलू 'प्रगती' मध्ये येतात. महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्राला हुशार आणि कर्तबगार महिलांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. "ताटी उघडा ज्ञानेश्वरा" म्हणणाऱ्या मुक्ताईने आध्यात्मिक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे त्याच बरोबर"जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर " म्हणणाऱ्या बहिणाबाईने मराठी लोकसाहित्याचे दालन भावसंपन्न केले आहे.कोणतेही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या ह्या स्त्रिया आपल्या आपल्या क्षेत्रात खूप पुढे गेलेल्या होत्या.नंतरच्या काळातील उत्तम प्रशासक आणि माळवा साम्राज्याचे राज्य मोठ्या धडाडीने सांभाळणाऱ्या अहिल्याबाई होळकर ह्याही मुळात महाराष्ट्रात जन्मलेल्या. ...